महात्मा बसवेश्वर पुतळा निर्माण कृती समितीच्या ‘जिल्हा बंद’च्या आवाहनाचा मंगळवारी फज्जा उडाला. समितीने सोमवारी काढलेल्या मोर्चाच्या शेवटी अनुचित प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी सर्वत्र कडक उपाय योजत परिस्थिती नियंत्रणात राखली. आतापर्यंत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. प्रकाश कौडगे व इतर २० जणांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कौठा परिसरात नियोजित जागीच उभारण्याच्या मागणीसाठी संबंधित समितीने मोठा मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले, पण मोच्रेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मनपा आयुक्तांनी रस्त्यावर यावे, अशी मागणी नेत्यांकडून अचानक पुढे आल्याने तब्बल ३ तास पेच निर्माण झाला. यात आयुक्तांनी कणखरपणा दाखविल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसह नेत्यांची नाचक्की झाली. मोर्चाच्या शेवटी काही कार्यकर्त्यांनी दगड, बाटल्या फेकल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. लाठीमारात १५ हून अधिक जण, तसेच दगडफेकीत पोलीस उपअधीक्षक संजय निकम, निरीक्षक सुनील निकाळजे यांच्यासह दोन होमगार्ड व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
मोर्चात समाजाचे डॉ. अहमदपूरकर महाराज सहभागी झाले होते. मनपा आयुक्तांनी त्यांचा अवमान केला, असा मुद्दा पुढे आणून कृती समितीने मंगळवारी जिल्हा बंदचे आवाहन केले, पण सकाळपासूनच दैनंदिन व्यवहार सुरू झाले. व्यापारी प्रतिष्ठान, ऑटो रिक्षा, सार्वजनिक, खासगी वाहतूक, उपाहारगृहे सुरू होते. ‘बंद’च्या आवाहनाचा कुठेही परिणाम दिसला नाही. तरोडा नाक्यापासून काही कार्यकर्त्यांनी ‘बंद’साठी फेरी काढली. या फेरीतील काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करताच पोलिसांनी त्यातील ५ जणांना ताब्यात घेतले.
दुसऱ्या घटनेत शहरातील बाफना परिसरात एका एसटी बसवर दगडफेक झाली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी दिवसभर शहरात फिरत होते. त्यामुळे आंदोलकांची नाकेबंदी झाली.
पुतळा कृती समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन देण्यात आले. मनपाच्या डिसेंबर २०१२मधील ठरावानुसार बसवेश्वरांचा पुतळा नियोजित जागी न उभारल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदनावर भास्करराव खतगावकर, आमदार हेमंत पाटील, प्रताप पाटील, नागेश आष्टीकर, सुभाष साबणे, तुषार राठोड, गंगाधर पटणे, ओमप्रकाश पोकर्णा, प्रकाश मारावार, प्रकाश कौडगे, दत्ता शेंबाळे, दिलीप कंदकुत्रे आदींच्या सहय़ा आहेत.
महापौर शैलजा स्वामी, किशोर स्वामी प्रभृती सोमवारी मनपा कार्यालयात होते. आंदोलनकर्त्यांच्या आरोपांवर खासदार अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही महिन्यांपूर्वी खासदार चव्हाण यांनी येथे विराट मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर चव्हाण यांच्यासह नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन निवेदन दिले होते. याकडे लक्ष वेधत, असा सुज्ञपणा कालच्या मोर्चातील सत्ताधारी नेत्यांनी का दाखवला नाही, असा सवाल काँग्रेसच्या किशोर स्वामी यांनी केला. कृती समितीने दिशाभूल चालवली असल्याचे त्यांनी नमूद केले. या मंडळींना जनाधार नाही, हे मंगळवारी सर्व सुरळीत व्यवहारातून दिसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले, त्यास काँग्रेस पक्षच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी पत्रकार बैठकीत केला.