राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब बाबत केलेल्या वक्तव्यावरचा वाद शमलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणखी एक मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगजेबाच्या महालाचे संवर्धन करा, अशी मागणी किरमाणी यांनी केली आहे. तर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने या मागणीला जोरदार विरोध करण्यात येत आहे. किरमाणी यांनी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांना पत्र लिहून सदर मागणी केली. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन करावे, असे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटले आहे पत्रात?

राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमाणी यांनी पत्रात म्हटले, “शहरातील किले-ए-अर्क हा मुघल शासक ‘सम्राट औरंगजेब’ ने सण १६५० मध्ये बांधला होता. आज तो महाल-राजवाडा जीर्ण अवस्थेत पडून आहे. या महालाचे कालांतराने नुकसान झाले असून, शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याने गतवैभव गमावले आहे. या परिसरात शाही मस्जिद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मस्जिद व मर्दाना महालचा समावेश आहे. किले-ए-अर्कमध्ये आजही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए-आम, दिवानची खास जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष व हमाम खानेचे अवशेष आज ही बघू शकता”

या पत्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली की, “जी-२० अंतर्गत शहराच्या सुशोभीकरणामध्ये व स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये या किले-ए-अर्कचा समावेश करावा. देखभालीचा अभाव असल्याने या महालाची स्थिती बिघडली आहे. एके काळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन व्हावे, त्यांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आज अत्यंत गरज आहे. या महालाला पुनर्संचयित केल्यास, ते आपल्या ऐतिहासिक शहराचे आणखी एक पर्यटन स्थळ बनू शकते. अशा संरचना अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शासनास लाभधारक ठरू शकते”, अशी मागणी इलियास किरमाणी यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.

विनोद पाटील काय म्हणाले

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी या मागणीचा निषेध केला आहे. ते म्हणाले, आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. औरंगजेब हा क्रूर होता. त्यांनी आपल्या वडीलांना कैद केले, भावाचा खून केला. त्याचा इतिहास आपण तरुण पिढीला दाखविणार आहोत का? आधी जितेंद्र आव्हाड यांचे औरंगजेब बाबत वक्तव्य आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्याची अशी मागणी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःचे आत्मचिंतन केले पाहीजे, अशी टीका पाटील यांनी केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp demands preserve aurangzeb old palace in aurangabad new controversy rise kvg
First published on: 08-02-2023 at 23:21 IST