अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्याऐवजी बुधवारी रात्री शासकीय विश्रामगृहात त्यांचा पाहुणचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडतानाचे चित्रीकरणही प्रसारित झाले आहे. या सरबराईत कदम यांच्यासाठी पोलिसांनी बंद बाटलीतील पाण्यासह बिर्याणीचीही व्यवस्था केल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांच्या ताब्यातील आमदार कदम यांच्या नावाने विश्रामगृहात एक खोली आरक्षित करण्यात येऊन त्यावर ‘शासकीय दौरा’ अशी नोंद करण्यात आली आहे. साडेतीनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपीची पोलिसांनी ठेवलेली बडदास्त चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आमदार कदम यांना न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी रात्री पावणेदहा वाजता शहर पोलीस ठाण्यात अर्ज करून आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार शहर पोलिसांच्या डायरीत आमदार कदम यांना पोलीस कोठडीत ठेवून गुरुवारी म्हणजे आज पहाटे सहा वाजता घेऊन गेल्याची नोंद आहे. मात्र, सकाळी अकराच्या सुमारास कदम यांना शासकीय विश्रामगृहातून पोलीस अधीक्षक कार्यालयात घेऊन गेल्याचे चित्रीकरण प्रसारित झाल्यामुळे हा शाही पाहुणचाराचा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्रीच कदम यांना विश्रामगृहात आणण्यात आले. तेथे बाटलीबंद पाण्यासह बिर्याणीचीही व्यवस्था करण्यात आली. सकाळी अंघोळीसह नाष्टा, चहा झाल्यानंतर अकराच्या सुमारास त्यांना नेण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ काढता पाय घेतला. हे चित्रीकरण करणाऱ्या कॅमेऱ्याला आडवा हात लावून, ‘सहकार्य करा’ असे सांगत रोखले. याबाबत शहर पोलिसांनी सांगितले की, ‘रात्री कदम यांना कोठडीत ठेवण्यात आले होते. सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी त्यांना घेऊन गेले, तो त्यांच्या तपासाचा भाग आहे.’ गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कदम यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली आहे.

आमदार रमेश कदम यांना बीड येथे रात्रभर कोठडीमध्येच ठेवण्यात आले होते. सकाळी त्यांना चौकशीसाठी काही सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाण्याची आम्हाला मुभा असते. चौकशीसाठी सहसा विश्रामगृहांचा उपयोग केला जातो. कदम यांची चौकशी मी माझ्या कार्यालयात केली होती. बीडमध्ये ती विश्रामगृहात केली आहे. त्यात काहीही अवैध नाही. चुकीचेही नाही.’’ संजयकुमार (राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख)

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla ramesh kadam government restroom marathi articles
First published on: 21-07-2017 at 01:26 IST