बिपीन देशपांडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : निर्यातबंदी आणि भरमसाठ झालेल्या कांद्याच्या उत्पादनामुळे सध्या राज्यातील दर गडगडलेले असून खरेदीसाठी केरळमधील काही व्यापारी राज्यात फिरत आहेत. औरंगाबादेतील कांद्याचे आगर असलेल्या गावांमध्ये जाऊन केरळच्या व्यापाऱ्यांनी खरेदीची बोलणी सुरू केली होती. मात्र, त्यांचाही दर पसंती न उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यास नकार दिला.

औरंगाबादजवळील निपाणी, आडगाव अशा काही गावांना कांद्याचे आगर म्हणून ओळखले जाते. गंगापूर, वैजापूर तालुक्यातही कांद्याचे मोठे लागवड क्षेत्र आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे १५ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. एकटय़ा पैठण तालुक्यातच दोन हजारांवर हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र आहे. तर त्यापेक्षा दुप्पट क्षेत्र गंगापूर, वैजापूर तालुक्यात आहे.  निपाणीमधील पडून असलेल्या ५० ट्रक  कांद्याची खरेदी करण्यासाठी केरळमधील काही व्यापारी येऊन गेले. मात्र, त्यांनी साधारण तेराशे रुपये क्विंटलचा दर देऊन कांदा खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. ज्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडे दर्जेदार कांदा आहे, त्यांनी तेराशे रुपये क्विंटलच्या दराने विक्री करण्यास नकार दिला. केरळच्या व्यापाऱ्यांना निर्यातक्षम कांद्याचीच गरज होती. दर्जेदार कांद्याला किमान २० ते २५ रुपये किलोचा दर मिळणे अपेक्षित आहे, असे आडगावचे शेतकरी विश्वंभर हाके यांनी सांगितले. हाके यांच्याकडे साधारण ४०० पेक्षा अधिक क्विंटल निर्यातक्षम कांदा पडून आहे. केरळच्या व्यापाऱ्यांनी हाके यांच्याशीही संपर्क केला होता. मात्र, दर अगदीच पाडूून मागितल्याने विक्री करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याची दोन हजार शंभर क्विंटलने आवक झाली होती. त्याला किमान शंभर रुपये तर कमाल एक हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. सर्वसाधारण दर साडे सातशे रुपये क्विंटलएवढा मिळाला. ज्या शेतकऱ्यांना पैशांची निकड आहे ते कांदा बाजार समितीत आणून विक्री करत आहेत. तर कांदाचाळीतून काही शेतकरी साठवणुकीची व्यवस्था करत आहेत.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा कांदाचाळीसाठी ५२ हजार ९२४ अर्ज आलेले होते. प्रतिवर्षी मागील चार वर्षांत सरासरी दीड हजार कांदाचाळी जिल्ह्यांत आहेत. महाडीबीटीमधून सध्या ६९० चाळींना अनुदान देण्यात आले आहे.

अल्पदरामुळे उत्पादन अडकले..

औरंगाबादजवळील निपाणी गावामध्ये साधारण शंभरपेक्षा अधिक एकरवर कांद्याची लागवड केली जाते. एकटय़ा निपाणीमध्येच सध्या ५० ट्रक म्हणजे साधारण अडीचशे टन कांदा पडून आहे. केरळमधील व्यापाऱ्यांनी देऊ केलेल्या अल्पदराला उत्पादकांनी नाकारले आहे. सर्वच ठिकाणी हे चित्र आहे.

कांदा मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांकडे पडून आहे. उत्पादित कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकरी कांदाचाळीतून साठवणूक करत आहेत.

 विशाल साळवे, मंडळ कृषी अधिकारी

गावात केरळचे व्यापारी कांदा खरेदीसाठी येऊन गेले. मात्र,अपेक्षित दरामुळे व्यवहार होऊ शकला नाही. गावात सध्या ५० ट्रक कांदा पडून आहे.

विष्णू भालकर, निपाणी

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion rate in maharashtra fall due to high production and export ban zws
First published on: 15-07-2022 at 06:31 IST