मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ असून मोर्च्याच्या छत्राखाली समाज संघटित झाला आहे. या एकवटलेल्या समाजाचा राजकीय फायदा घेण्यासाठी कोणी मोर्च्याचे नाव वापरून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध राहील, अशी भूमिका काही समन्वयकांनी येथे स्पष्ट केली. राजकीय पक्षासाठीही मराठा क्रांती मोर्चा हे नाव वापरू नये, असे आवाहन करून समाजामध्ये कोणी संभ्रम निर्माण करणार असतील तर अशांवर समाज नाराज होऊन धडा शिकवेल, असा इशाराही येथे बुधवारी आयोजित पत्रकार बैठकीत देण्यात आला.

मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याची भूमिका काही समन्वयकांनी मांडली. या भूमिकेला विरोध करताना येथील क्रांती मोच्र्याचे समन्वयक म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांच्या पहिल्या स्मृतिदिनीच (२३ जुलै) निवडणूक लढवणार असल्याची भूमिका काही समन्वयकांनी घ्यावी, हे दुर्दैवी आहे. कोपर्डीतील घटनेनंतर समाज हा मराठा क्रांती मोर्च्याच्या सामाजिक चळवळीखाली एकवटला. त्यामध्ये सर्व पक्षीय संघटनाही एकत्र आल्या. राज्यात ५८ मोर्चे काढण्यात आले. त्या माध्यमातून समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एक चळवळ उभी राहिली. आरक्षणाच्या मागणीला काही प्रमाणात यश आले असले तरी आणखीही १८ मागण्यांची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. सरकारकडून मराठा आरक्षणाचा प्रस्ताव अजूनही केंद्राकडे पाठवण्यात आलेला नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.

मराठा क्रांती मोर्च्याच्या नावाखाली निवडणूक लढवण्याची भूमिका घेऊन कोणी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये. त्यामुळे मराठा मतांचे ध्रुवीकरण होईल आणि चुकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. राजकारणाच्या डावपेचात समाजाचे नुकसान होईल, अशी भूमिका घेऊ नये, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. क्रांती मोर्चा कोणालाच पािठबा देत नाही. कारण ही सामाजिक चळवळ आहे. समाजाची दिशाभूल कोणी करणार असेल तर सहन केले जाणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.

पत्रकार बैठकीस डॉ. शिवानंद भानुसे, किशोर चव्हाण, दाते पाटील, सुरेश वाकडे, सुकन्या भोसले, विजय काकडे, विकी राजे पाटील आदी उपस्थित होते.