छत्रपती संभाजीनगर : चाॅकलेट, चोकोबार, आईस्क्रीम, विविध प्रकारच्या बिस्किटांपासून ते घट्ट रस्सा (ग्रेव्ही), बिर्याणी, पिझ्झा, वाइन-बीअरपर्यंतचे खानपान, उंची किमतीचे परफ्युम, ब्रश-पेस्ट, शेरवानी यांसारख्या कपड्यांसह राहणीमान हे निर्विवाद माणसांचे आहेत, यात नावीन्य असे काही नाही. परंतु वरील सर्व पदार्थ, वस्तू या पाळीव श्वान, मांजरीसाठीही उपलब्ध असून, त्याची खास ‘पेट शाॅप्स’मध्ये जाऊन हौसेने खरेदी करणाराही वर्ग मोठा आहे. परिणामी ‘पेट’ क्षेत्रासाठीचा उत्पादित माल ते विक्रीपर्यंतची वार्षिक उलाढाल दोन अब्जांवर असून, अनेक नामवंत कंपन्याही निर्मितीमध्ये उतरल्याने २०३० पर्यंत ही उलाढाल सहा अब्जांपर्यंत (६०० बिलियन) जाईल, असे उद्दिष्ट ठेवून वाटचाल सुरू आहे.

एकीकडे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ‘सर्वोच्च’ स्थानी पोहोचलेला असताना आणि त्यांच्याबाबत एक निश्चित धोरण ठरवण्यावर मंथन सुरू असताना पाळीव श्वान, मांजरांबाबतच्या क्षेत्रात बरीच मोठी उलाढाल आणि आधुनिकताही आल्याचे चित्र समोर आले आहे. वाढते श्वान, मार्जार वंशावरील प्रेम आणि त्यांना कुटुंबातील एक सदस्य मानून काळजीही वाहिली जातेय. त्यांच्यासाठी आता खास ‘पेट सलून’ही निघाल्या आहेत. गजबजलेल्या चौकांमध्ये आकर्षक अक्षरांचे ठोकळे लावून फलक झळकत असलेल्या ‘पेट-सलून’मध्ये पाळीव श्वान, मांजरांचे केशकर्तन केले जाते.

यासाठी खास ‘लाख’मोलाचे आयुध असून, अंगावरचे केस वाळवण्यासाठी विदेशी बनावटीचे ऑटोमॅटिक कॅबिनेट ड्राय ग्रूमिंग हे यंत्रही आहे. नख कापणी यंत्र, शाम्पू, कण्डिशनर, विशिष्ट साबण, परफ्युम, कपडे, खास गादी, जाडी चटई, ब्रशसह दात घासण्यासाठीची पेस्ट, सायंकाळी काही चटपटा खाण्यासाठी खास बिस्किटे, चटक-मटक पातळ ग्रेव्हीचे पॅकेट, गळ्यातले आकर्षक पट्टे, घरात एकट्या जीवाला सोडून माणसांना बाहेरगावी जावे लागत असेल, तर खायची-प्यायची व्यवस्था अगदी मापात करणारे यंत्र, स्वच्छ पाणी, प्रातर्विधीसाठी एका आकर्षक अन् खाशा डब्यात आयात केलेली वाळू, विष्ठा उचलण्यासाठीची सुपली, कंगवे, बिर्याणीसाठीचा मसाला, मांजरीसाठी मुलांची शाळेची पिशवी असते तशी सॅक, अशा किमान दोन हजार वस्तू सध्या उपलब्ध असून, त्यांची किंमत ५०-१०० रुपयांपासून तीन-चार हजारांपर्यंत आहे.

या साखळीतील एक ग्राहक अंजूम मिरासजी म्हणाल्या, की मी मांजरीसाठी बऱ्याच वस्तू खरेदी करते. महिन्याकाठी पाच हजारांची खरेदी होते. मुंबईत वास्तव्य असले, तरी येथील लेकीकडे मांजरीच्या ओढीने दर महिन्याला येणे होते आणि मांजरीसाठी कपड्यांसह इतरही खरेदी केली जाते. पाळीव श्वान, मांजरासाठीचा आहार, उपयोगी वस्तू असे दोन हजारांवर प्रकार पेट बाजारपेठेत उपलब्ध असून, त्यांच्या उत्पादनात जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्याही उतरल्या आहेत. पाळीव श्वानांचा विमा काढून देण्याच्या व्यवसायातही एक आघाडीची कंपनी आहे. दोन अब्ज (बिलियन) रुपयांची सध्या उलाढाल आहे. २०३० पर्यंत सहा अब्जांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठरवण्यात येत आहे. श्वान, मांजरांचे केशकर्तन, स्वच्छता आता आधुनिक यंत्रांद्वारे केली जात आहे. – ऋत्विक अग्रवाल, व्यावसायिक