लातूरकरांचा प्रत्येक दिवस पाणीप्रश्नाची नवी समस्या घेऊन उगवतो आहे. गेल्या चार वर्षांपासून पाणीप्रश्नाची तीव्रता वाढली, पण ६ महिन्यांपासून यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. परंतु ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ याचा अनुभव लातूरकर घेत आहेत. लातूरकरांना उन्हाळय़ात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असताना प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्याहीपेक्षा सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने याला प्राधान्य दिले नाही. मुख्यमंत्र्यांपासून सर्वच घटकांकडून या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने दखलपात्र प्रयत्न झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
नागपूर अधिवेशनानिमित्ताने उजनीचे पाणी लातूरकरांना मिळावे, यासाठी चार दिवस महापौर व नागरसेवकांनी धरणे धरले. आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला. महापौर अख्तर शेख यांनी उजनीचे पाणी मिळविण्याचा ‘ध्यास’ घेत केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या प्रधान सचिवांची भेट घेतली. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना महापौर परिषदेच्या निमित्ताने भेटून पाणीप्रश्न कानावर घातला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांनाही लक्ष घालण्याची विनंती केली. राहुल गांधींचा अपवाद वगळता महापौरांसोबत शिवराज पाटील चाकूरकर यांचे सुपुत्र शैलेश होते. चाकूरकरांना ज्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, तेव्हा उजनीचे पाणी लातूरकरांना देऊ असे आश्वासन रूपाताई पाटील निलंगेकर यांनी दिले होते. पराभवानंतर चाकूरकर गृहमंत्री झाले, मात्र सत्ता गेल्यानंतर ते आपल्या मुलाकरवी उजनीचे पाणी मिळावे यासाठी लक्ष घालत आहेत.
विलासराव देशमुख यांच्याकडे साडेसात वष्रे मुख्यमंत्रिपद होते. त्यांनाही उजनीच्या पाण्याच्या प्रश्नात हात घालण्यात यश मिळाले नाही. आमदार देशमुख यांनी उजनीचे पाणी लातूरकरांना देण्याचे श्रेय राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारने जरूर घ्यावे. मात्र, पाणी द्यावे अशी भूमिका मांडली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, भाकप, माकप, मनसे, रिपाइं अशी सर्वच मंडळी लातूरकरांना उजनीचे पाणी मिळावे, अशी भूमिका घेत आहेत. वास्तविक, हा एक-दोन वर्षांत मार्गी लागणारा प्रश्न नाही. नजीकच्या काळात लातूर मनपा वगळता दुसरी निवडणूक नाही. त्यामुळे राजकीयदृष्टय़ा हा प्रश्न लोंबकळत राहणार, हे नक्की. पाणीप्रश्नावर राजकारण करणार नसल्याची भाषा प्रत्येकाच्या तोंडात असली, तरी जो तो नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
आगामी (२०१९च्या) विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आतापासूनच आखली जात आहे. एमआयएम पक्षाची भूमिका मोठी असणार, हे गृहीत धरून आतापासूनच त्या पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा लातुरात केली जात आहे. शिवसेनेने आतापासूनच वाघाची भीती दाखवण्याचे काम सुरू केले आहे. मनपा निवडणुकीत पाणीप्रश्नाचा वापर करण्यासाठी भाजपसह सर्वच नियोजन करीत आहेत. पाण्यासाठी आतापर्यंत काय केले, हा प्रश्न काँग्रेसला विचारला जात आहे. राष्ट्रवादीची मंडळीही आक्रमकपणे मदानात आहेत. जो तो आपापल्या ताकदीने राजकारणाचे फासे टाकत आहे. काँग्रेसला मात्र पालिकेत वर्षांनुवष्रे स्पष्ट बहुमत असूनही प्रशासनावर पकड घेता आली नाही. अंतर्गत हेव्यादाव्यातच गुंग असल्यामुळे बचावाचा पवित्रा घ्यावा लागत आहे. उजनीचे पाणी येईल तेव्हा येईल, पण सध्या पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नाही. या प्रश्नाचा गुंता सोडवण्यास सर्व जण एकत्र असल्याचा देखावा निर्माण केला जात असला, तरी जो तो पायात पाय घालण्याचे डावपेच आखत असल्याचे चित्र आहे.
बारामतीच्या जावयाकडून अपेक्षा!
बारामतीकरांनी सत्तेचा लाभ घेत बारामतीचा अभूतपूर्व विकास केला, दूरदृष्टी दाखवली. तीच दृष्टी बारामतीचे जावई असणाऱ्या आमदार दिलीपराव देशमुखांनी दाखवावी, अशी लातूरकरांची अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political will water hanging
First published on: 17-02-2016 at 03:24 IST