मांडकी गावासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांचं आंदोलन तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आंदोनलाचे समन्वयक मनोज गायके यांनी यासंदर्भात माहिती दिली. नारेगाव येथील कचरा डेपोवर कचरा टाकण्यास विरोध करत नागरिकांनी बेमुदत आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचले होते. कचरा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र, रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून चार महिन्यांची मुदत मागण्यात आली. त्यानंतर वॉर्डातील कचऱ्याचे वॉर्डात व्यवस्थापन करणार असल्याचं सांगण्यात आलं. मुदत देण्यासाठी नागरिकांनी सकारात्मकता दाखवत आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले, अशी माहिती गायके यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बागडे यांच्या मध्यस्थीमुळे तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कचऱ्याच्या मुद्यावरुन निर्माण झालेला आक्रोश तात्पुरता निवळला आहे. चार महिन्यांच्या मुदतीवर गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन स्थगित केलं. महापौर भगवान घडामोडे यांच्या वॉर्डात ज्या पद्धतीनं कचऱ्याचं नियोजन केलं जातं. त्या पद्धतीनं संपूर्ण शहरभर उपक्रम राबवला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. शहरातील कचरा नारेगाव कचरा डेपोवर टाकू दिला जात नसल्यानं महापालिका प्रशासनाकडून बीड रोडवरील आडगाव येथे कचरा टकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी कचऱ्यांच्या सर्व गाड्या बीड रोडवरच अडवून ठेवल्या. त्यामुळे कचरा प्रश्नावर पालिकेची चहुबाजूने कोंडी झाली. त्यानंतर बागडे यांच्या मध्यस्थीने ही कोंडी फुटली. पालिका प्रशासनाला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against garbage depot aurangabad
First published on: 15-10-2017 at 20:01 IST