छत्रपती संभाजीनगर :  राज्य शासनाकडून उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मद्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली असून, ‘बसण्या’साठी परमिट रूमचे दर परवडत नसलेल्या शौकिनांची पाऊले खुल्या मैदानांकडे वळू लागली आहेत. परिणामी परमिट रूममधील नियमित ग्राहकांच्या संख्येत ३० ते ४० टक्क्यांची घट झाली असून, रात्रीच्या वेळच्या अंधारातही मात्र मैदाने गजबजल्याचे चित्र दिसू लागले आहे.

राज्य शासनाने मद्यविक्रीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट), परवाना शुल्क आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्क वाढवले आहे. मूल्यवर्धित कर ५ वरून १० टक्के, परवाना शुल्कात १५ टक्के तर भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर (आयएमएफएल) उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. या नव्या दराने बाजारपेठेत येणारे मद्य अद्याप अनेक ठिकाणी आलेले नाही. ज्यांच्याकडे साठा आहे ते जुन्या दराने विक्री करत असले तरी बिअरबार आणि परमिट रुममध्ये एखादा पेग घेण्यासाठी येणाऱ्यांवर सेवाकर वाढलेला आहे.

परमीट रुममध्ये  जाऊन नियमित मद्य घेणाऱ्यास वरील निर्णयामुळे दररोज शंभर रुपयांपेक्षा अधिकच्या किमतीची झळ बसू लागली आहे. यापूर्वी एखाद्या ब्रॅण्डच्या दारू बाटलीची खरेदी किमत वाईन शाॅपमध्ये १६० रुपये होती. ती आता नव्या दरानुसार २३० ते २५० रुपयांपर्यंत वाढली आहे. हीच बाटली परमिटरूममध्ये भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावरील वाढ केलेल्या ६० टक्क्यांच्या दरानुसार ३३० रुपयांनी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे ‘ तळीरामांना’  शंभर ते दीडशे रुपये अधिक मोजावे लागतात. परिणामी परमिट रूमपेक्षा मैदाने ‘बसण्या’साठी जवळ केली जात असल्याचे हे चित्र शहरांमध्ये दिसू लागले आहे.

सध्या परमिट रूम व्यावसायिकांकडे जुना माल शिल्लक असल्याने नियमित ग्राहक येत आहे. त्यांची संख्या अद्याप तरी कमी झालेली नाही. परंतु येत्या काळात वेगळे चित्र दिसू शकेल. शिवाजी पाटील, अध्यक्ष, परमिट रूम व बिअरबार असोसिएशन.

काही ब्रॅण्ड मिळत आहेत, तर काही मिळत नाहीत. उत्पादन शुल्कात दर वाढ झाल्यामुळे आता ३० ते ४० टक्के ग्राहक कमी झाले आहेत. – नितीन शेट्टी, परमिट रूमचालक.

शहरात किती खुले भूखंड आहेत, याची आकडेवारी महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. – संजय चामले, अधिकारी, महानगरपालिका.