मंदिरे आणि मशीद उघडावीत या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने गणेश विसर्जनादिवशी शहरातील खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांना निवेदन देण्यावरून उडालेला गोंधळ निस्तारल्यानंतर शहागंज येथील मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेल्या खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. मंदिरे उघडण्यासाठी पुजाऱ्याला निवेदन आणि त्या विरोधात शिवसेना उतरल्यामुळे औरंगाबादमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मशिदीमध्ये नमाज अदा करू असा इशारा दिल्यानंतर बुधवारी खासदार जलील दुपारी मशिदीजवळ पोहोचले. मशिदीजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान मंदिर-मशीद उघडण्याच्या मागण्यासाठी सुरू असणारे हे आंदोलन महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी केला आहे.

नियमांचे पालन करू पण आता मंदिरे उघडा आणि मशिदीमध्ये नमाज अदा करू द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे करत शहागंज येथील मशिदीमध्ये नमाज अदा करू, असा इशारा खासदार जलील यांनी दिला होता. मात्र, आधी मंदिरे उघडावीत आणि नंतर नमाज अदा करू अशी भूमिका घेतली असल्याचे सांगत त्यांनी खडकेश्वर भागातील महादेव मंदिराच्या पुजाऱ्याला निवेदन देण्यासाठी मंगळवारी कार्यकर्ते पाठविले. गणेश विसर्जन असल्याने पोलीस बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असल्याने खासदार जलील यांनी मंदिराकडे जाऊ नये अशी विनंती पोलिसांनी केली होती. एमआयएमचे अरुण बोर्डे आणि कार्यकर्ते मंदिरात येणार असे कळताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरेही या भागात पोहोचले. पोलीस आयुक्तांसह सारे मंदिराजवळ आले. त्यामुळे या आंदोलनाचे स्वरूप मोठे होऊ नये म्हणून पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. एमआयएम आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे पोलिसांनी प्रकरण नाजूकपणे हाताळले. दरम्यान मंगळवारच्या या आंदोलनानंतर बुधवारी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेल्या खासदारांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. नियमांचे पालन करू असे मौलवींनीही म्हटल्याने बुधवारी खासदार जलील यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.

शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येत असल्याचे दिसताच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनीही मंगळवारी अचानकच या आंदोलनाच्या वेळी हजेरी लावली. कळसाचे दर्शन घेऊ असे म्हणत ते मंदिराभोवती जमले. या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, ‘महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षातील ठरलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून या आंदोलनाकडे पाहावे लागेल. या पूर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकांना राजकीय मदत केल्याचे उदाहरणे आहेत.’

मंदिरे उघडावीत आणि मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी मिळावी ही मागणी आता औरंगाबादमधून जोरदारपणे होत आहे. शिवसेना-एमआयएम-मनसे एकाच मागणीसाठी पुढे येत असताना एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र दिसत असून भाजपनेही घंटानाद आंदोलन केले तरी त्याला संघर्षांची किनार नव्हती. करोना काळातील आंदोलन तीव्र करण्याचा सपाटा सेना-एमआयएम-मनसे-भाजप सुरू ठेवला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका मांडताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आता खासदार जलील यांचा जनाधार कमी होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मुस्लीम कार्यकर्त्यांची ताकद लक्षात घेता त्यांना आता समर्थन गोळा करण्यासाठी काही तरी करणे भाग होते. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले असेल. पण मंदिरे चालू करावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही ते म्हणाले.