मराठवाडय़ातील नेते नेहमीच मागच्या बाकावर बसविण्याची संघटनात्मक व्यूहरचना शिवसेनेकडून अनुसरली जात असल्याने मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर, डॉ. जयप्रकाश मुंदडा आणि आमदार संजय शिरसाट हे विस्तारयादीत आपले नाव असावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. मराठवाडय़ात शिवसेनेचे ११ आमदार आहेत. मात्र, मराठवाडय़ात एकही मंत्रिपद नसल्याने या विस्तारात त्या यादीत जाण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
सत्तेमध्ये व संघटनात्मक स्तरावरील पदांवर वर्णी लावताना  मराठवाडय़ातील नेत्यांकडे शिवसेनेकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष होते. मराठवाडय़ातील एकाही नेत्याकडे संपर्कप्रमुखाची जबाबदारी नाही. स्थानिक पातळीवर नेतृत्वाला बळ देण्याऐवजी मुंबईकरांच्या आवर्जून नेमणुका होतात. परिणामी बीड व लातूर जिल्ह्यात शिवसेनेला एकदाही राजकीय यश मिळाले नाही. या वेळी विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्याने शिवसेनेला तारले. या जिल्ह्यात शिवसेनेचे हेमंत पाटील, नागेश पाटील आष्टीकर, सुभाष साबणे व प्रताप पाटील चिखलीकर हे चार आमदार आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी वर्णी लागावी, असा सूर आहे. यात सुभाष साबणे १९९९ मध्येही आमदार होते. तर प्रताप पाटील चिखलीकर दोन वेळा आमदार असले तरी ते नुकतेच शिवसेनेत आले आहेत. हिंगोलीतून ज्येष्ठत्वाच्या आधारे डॉ. जयप्रकाश मुंदडा हे देखील दावा सांगत आहेत. अडचणी काळात पक्ष टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेवर सेनेची एकहाती सत्ता असल्याने केलेल्या कामाची पावती मिळू शकेल, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
जालना जिल्ह्यातून अर्जुन खोतकर यांचा दावाही प्रबळ मानला जातो. विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाडय़ात मराठा समाज नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे या समाजाचा चेहरा  मंत्रिपदासाठी पुढे आणला जाऊ शकतो. या पूर्वीही खोतकर १९९५ मध्ये मंत्री होते. त्यामुळे या वेळी त्यांची वर्णी लागेल, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम शिवसेनेत वाखाणले जाते.
मराठवाडय़ातील नेत्यांना महत्त्वाच्या वेळी डावलेले जाते, अशी भावना सेनेच्या अनेक नेत्यांमध्ये आहे. राजकीय विश्लेषकही सेनेच्या या व्यूहरचनेवर नेमकेपणाने बोट ठेवतात. या अनुषंगाने बोलताना जयदेव डोळे म्हणाले, ‘काँग्रेसवगळता इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी मराठवाडय़ाकडे दुर्लक्षच केले. शिवसेनेतील नेते नेहमीच भावनिक राजकारण करतात. मराठवाडय़ातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा अभाव आहे. प्रश्न समजून घेण्याची क्षमताही कमी असल्याने त्यांचा संघटनात्मक पातळीवरील वरिष्ठपदी विचार केला गेला नाही. अभ्यासापेक्षा भावनिक राजकारण करण्यावरच भर राहिल्याने त्यांचा मोठा प्रभावही दीर्घकाळ दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाकडून मराठवाडय़ातील नेत्यांची फारशी दखल घेतली गेली नसावी.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena marthwada ignore
First published on: 17-11-2015 at 03:35 IST