पुण्याहून अंबाजोगाईस येत असलेल्या बस व ट्रॅक्टरची धडक होऊन सहा प्रवासी जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळअंबा पाटीजवळ घडली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने बसची उजवी बाजू कापली गेली. मृतांमध्ये आजी-आजोबासह नातू व पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळअंबा पाटीजवळ गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. खेड आगाराची बस (एमएच २० बीएल २५८१) पुण्याहून अंबाजोगाईकडे येत होती. बसमध्ये १३ प्रवासी होते. भरधाव बसला समोरून येणारे दोन ट्रॉलीचे ट्रॅक्टर (एमएच २३ क्यू ३२६५) आडवे आले. ट्रॅक्टरची दुसरी ट्रॉली बसच्या उजव्या भागात अडकून या भागाचा पत्रा कापला गेला. त्यामुळे या बाजूला बसलेल्या ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे अशी : रोहन बालकिसन हारे (वय २१, जवळगाव, तालुका अंबाजोगाई), काशिनाथ संभाजी देवकते (वय ६५), त्यांची पत्नी मुक्ताबाई (वय ६०, शिवणखेड, तालुका चाकूर, जिल्हा लातूर), नातू धीरज बालाजी दर्शने (वय २०, कोपरा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर), केज येथील पोलीस कर्मचारी श्रीनिवास दिगंबर कुलकर्णी (वय ४३) व अन्य एक अनोळखी व्यक्ती. बसचा अंबाजोगाई हा शेवटचा थांबा राहिला असताना २० मिनिटांच्या अंतरावर ६ प्रवाशांवर काळाने झडप घातली.
अपघातात बसचालक आर. जी. नागरगोजे (वय ३०, येवलवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड), वाहक रखमाजी दादाराव काळदाते (वय ३०, आनंदवाडी, तालुका परळी), विजयकुमार भिकनराव कुलकर्णी (वय २५, पुणे), अतुल लक्ष्मणराव लोमटे (वय २६, अंबाजोगाई) गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
ट्रॅक्टर ट्रॉलीने बस कापली; बीडमध्ये सहा ठार, ४ गंभीर
पुण्याहून अंबाजोगाईस येत असलेल्या बस व ट्रॅक्टरची धडक होऊन सहा प्रवासी जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळअंबा पाटीजवळ घडली.
Written by बबन मिंडे
First published on: 31-10-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six died in tractor trolley and bus accident