शेतीमालास योग्य भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. सध्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ नव्हे, तर ‘माती अडवा पाणी जिरवा’ संदेश देणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
भारत विकास प्रतिष्ठानच्या वतीने उमरगा तालुक्यातील कवठा येथे ५ कोटी लिटर क्षमतेच्या वाटर बँकेच्या पाण्याचे पूजन हजारे, तसेच जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, अभिनेता रितेश देशमुख, संयोजक विनायक पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी विलास कुलकर्णी या शेतक ऱ्यास गाईचे वाटप करण्यात आले. हजारे म्हणाले की, पाणी व पावसामुळे गावची अर्थव्यवस्था बदलते. त्यामुळे गट-तटाचे राजकारण न करता गाव एकसंध ठेवणे गरजेचे आहे. वाढत्या कूपनलिकांचे प्रमाण धोकादायक असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कडक नियमावली करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली आहे. सरकारने या मागणीचा विचार केल्यास पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही.
राजेंद्रसिंह राणा म्हणाले की, शेतकरी आत्महत्या केवळ निराशेतूनच होतात. मात्र, आत्महत्या करून शेतकऱ्यांनी जीवन संपविण्यापेक्षा कसलीही तमा न बाळगता जीवन जगावे. मराठवाडा पूर्वी उसासाठी प्रसिद्ध होता. यातून पाणीउपसा अधिक झाल्याने मराठवाडा दुष्काळी ठरला आहे. ६५ टक्के पाणी उष्णतेने निघून जाते. त्यामुळे हे पाणी जिरविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पाण्याचा एक थेंब वाया जाणार नाही, या साठी काळजी घ्यावी.
रामकृष्णपंत खरोसेकर, सरपंच राजश्री मडोळे, उपसरपंच गुलाब पाटील, विजयकुमार सोनवणे, माजी सभापती अक्षरताई सोनवणे, बलभीम पाटील, वामनराव सूर्यवंशी, प्रगतिशील शेतकरी पवार, मोहन कचरे, शहाजी पाटील, नाना भोसले, प्राचार्य दिलीप गरूड आदींसह १०० गावचे सरपंच, शेतकरी उपस्थित होते. कवि योगीराज माने यांनी सूत्रसंचालन केले, तर मलंग गुरूजी यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soil cross water soak
First published on: 29-03-2016 at 01:20 IST