औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा मृतदेह रविवारी रांजणगाव येथील तलावात सापडला आहे. दीपक संजय आहिरे (वय १३), राहुल सुभाष सावळे ( वय १४), प्रकाश विजय राजपूत (वय १३) अशी या मुलांची नावे आहेत.

शुकवारी  ४ वाजण्याच्या सुमारास तिघेही खेळण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, रात्री उशीरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी इतरत्र शोध घेतला. पण कुठेही त्यांचा तपास लागला नसल्याने अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याची तक्रार एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आज तिन्ही मुलाचा मृतदेह रांजणगाव येथील पाझर तलावात आढळून आला. मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात आहे की, घातपात याचा पोलीस तपास करत आहेत.