आई राजा उदो उदोचा जयघोष व संबळाच्या निनादात तुळजाभवानी मंदिरातील होम कुंडावर धार्मिक विधीने (अजाबळी) शारदीय नवरात्र उत्सवाचे घटोत्थापन झाले आणि नवरात्रोत्सवाच्या प्रथम चरणाची सांगता झाली. या वेळी मंदिर परिसर असंख्य भाविकांच्या उपस्थितीने भक्तीभावाने न्हाऊन निघाला.
सकाळी ११ वाजता सिंदफळ येथील देवी भक्ताने या धार्मिक विधीसाठी आणलेल्या आजाचे पूजन करण्यात आले. तत्पूर्वी देवीचे मुख्य पुजारी संभाजीराव पाटील यांनी तुळजाभवानीचे नित्योपचार करून धुपारती केली. मिरवणुकीने होमकुंडाजवळ आल्यानंतर धार्मिक विधीच्या अजाचे पूजन करून तहसील कार्यालयातील शिपायाच्या हस्ते अजाबली देण्यात आला. यानंतर घरोघरी कुलधर्म कुलाचाराप्रमाणे नवरात्रोत्सवाची सांगता झाली. सायंकाळी बऱ्हाणपूर येथून आलेल्या पलंग पालखीची मिरवणूक किसान चौक, पावणारा गणपती या भागातून झाडपिडे या निवासस्थानापासून निघून आर्य चौक, महाद्वार चौकातून शुक्रवारच्या पहाटे चारच्या सुमारास मंदिरात दाखल होते. पालखीत तुळजाभवानी मूर्ती ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा पार पडतो. या वेळी उपस्थित भाविक लक्ष लक्ष हातांनी कुंकवाची उधळण करतात. सीमोल्लंघन सोहळय़ानंतर शुक्रवारी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू होते. ही श्रमनिद्रा पाच दिवस चालते. अश्विनी पोर्णिमेच्या पहाटे मंगळवारी (दि. २७) श्री तुळजाभवानीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होते. नित्योपचार पूजा आश्विनी पोर्णिमेच्या मानाच्या काठय़ासह छबीना होतो व अश्विनी पोर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा होतो.
कोजागरी पौर्णिमेदिवशी
शिवाजी महाद्वारातून प्रवेश
शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सोलापूरहून मोठय़ा संख्येने भाविक येतात. यातील कळसदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना राजे शिवाजी महाद्वारातून प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर संस्थानने कळविले आहे.
तुळजाभवानी दर्शनासाठी सोलापूरहून मोठय़ा संख्येने भाविक पायी चालत येतात. यातील बहुसंख्य भाविक कळसदर्शन करून परततात. भाविकांना कळसदर्शन घेणे सोयीचे व्हावे, या साठी राजे शिवाजी महाद्वारातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. डॉ. नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे-घाटे, संस्थानचे इतर पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी यांच्या बठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या मार्गावर जि. प. आरोग्य यंत्रणेच्या वतीने ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्रे, आरोग्य तपासणी पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2015 रोजी प्रकाशित
घटोत्थापनाने तुळजाभवानी नवरात्र उत्सवाची सांगता
तुळजाभवानी मंदिरातील होम कुंडावर धार्मिक विधीने (अजाबळी) शारदीय नवरात्र उत्सवाचे घटोत्थापन झाले आणि नवरात्रोत्सवाच्या प्रथम चरणाची सांगता झाली.
Written by दया ठोंबरे

First published on: 23-10-2015 at 01:56 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuljabhawani navratra mahotsav completeness