06 August 2020

News Flash

Ishita

बेळगावनजीक नदीपात्रात तेरा मृत अर्भके सापडली

येथील राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या संकेश्वरनजीक हिरण्यकेशी नदीपात्रात १३ अर्भके सापडली आहेत. कोल्हापूरपासून साठ कि.मी अंतरावर असलेल्या संकेश्वर तालुक्यातील या घटनेने आरोग्य खाते हादरून गेले आहे. एका वाटसरूने ही माहिती पोलिसांना दिली असता ही बाब उघडकीस आली. आज सकाळी या व्यक्तीस तेथून जात असताना ही अर्भके दिसली. तेथे एकूण तेरा अर्भके आज सापडली आहेत.

चुकीच्या उपचारांमुळे बाळ दृष्टिहीन झाल्याने डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल

चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे एका दोन वर्षांच्या मुलीला दोन्ही डोळे गमवावे लागल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी दत्त चौकातील वरद नवजात शिशू व बाल रुग्णालयातील डॉ. विक्रम दबडे यांच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘गाव तिथे शाखा, घर तेथे राजसैनिक’ मोहीम ताकदीने हाती घ्या- वसंत गिते

काँग्रेसने सर्वसामान्य जनतेचा वापर केवळ सत्ता भोगण्यासाठीच केला आहे. तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात लढण्याची हिंमत करावी. सर्वसामन्यांचा पक्ष म्हणून मनसेकडून जनतेच्या अपेक्षा असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी ‘गाव तिथे शाखा आणि घर तेथे राजसैनिक’ ही मोहीम कार्यकर्त्यांनी ताकदीने हाती घ्यावी असे आवाहन ‘मनसे’ चे आमदार वसंत गिते यांनी केले.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे- दिलीप वळसे-पाटील

उन्हातान्हात काम करणाऱ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असून, कामगार भरती, अनुकंपा तत्त्वावरील कामगारांचे प्रश्न, स्वतंत्र वेतनश्रेणीबाबत कंपनी व्यवस्थापनाने लक्ष घालण्याची गरज आहे. या प्रश्नांसाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील असून, काही प्रश्नांची सोडवणूक केली आहे. प्रलंबित प्रश्नांसाठी फेब्रुवारीमध्ये तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन, ऊर्जामंत्री व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होईल असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

किणी येथील टोलनाक्याची जमावाकडून मोडतोड

स्थानिक कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आणि स्थानिक कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील टोलनाक्याची दोन वेळा जमावाकडून मोडतोड करण्यात आली. सलग तीन सुट्टय़ांमुळे वाढलेली वाहतूक या प्रकारामुळे प्रदीर्घ काळ खोळंबल्याने विस्कळीत झाली होती.

शिक्षकांची अनावश्यक प्रशिक्षणे कमी करणार- महावीर माने

शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबरोबर शिक्षकांची अनावश्यक प्रशिक्षणे कमी करण्याचा विचार करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे नूतन प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीच्या वतीने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

सलग तीन दिवस सुटीने कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी

प्रजासत्ताकदिनापासून सलग तीन दिवस सुट्टी असल्याने करवीरनगरी पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. महालक्ष्मी मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, नरसोबाची वाडी या धार्मिक ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे. ऐतिहासिक पन्हाळा, गगनबावडा येथेही पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारली

दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनत चाललेल्या सोलापूरचे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांची तडकाफडकी बदली झाली असून, त्यांच्या जागेवर नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. गेडाम हे कडक शिस्तीचे पारदर्शी आणि धडाकेबाज निर्णय घेणारे सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे सामान्य नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. तर ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

बालमहोत्सव

महिला व बालविकास विभागातील निवासी संस्थेतील मुलामुलींचे शासकीय चाचा नेहरू बालमहोत्सव कार्यक्रम उद्या प्रजासत्ताकदिनापासून तीन दिवस सुरू राहणार आहेत. कागल येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या डी. एड. कॉलेजच्या प्रांगणात याचे आयोजन केले आहे.

सोलापुरात तीनदिवसीय योग प्रशिक्षण शिबिर

शहरातील विजापूर रस्त्यावर नवीन आरटीओ कार्यालयाजवळ ज्ञानसंपदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात येत्या २७, २८ व २९ जानेवारी रोजी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र प्रभारी सुधा अळ्ळीमोरे या योग प्रशिक्षण देणार आहेत.

बार्शीत दोन महिलांना ‘धूम’ टोळीने लुटले

बार्शी येथे दोन महिलांच्या गळय़ातील दोन लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दोन गंठण ‘धूम’ टोळीने हिसका मारून पळवून नेले. मोटारसायकलवरून भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळय़ातील किमती दागिने लांबविण्याचे प्रकार वरचे वर वाढत असून हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे. बार्शी येथे कोठारे इमारतीसमोर मीना शहाजी पवार (वय ४०, रा. कसबा पेठ, बार्शी) या रस्त्यावरून पायी एकटय़ा चालत जात असताना दोघा अज्ञात चोरटय़ांनी काळय़ा रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळय़ातील चार तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले.

व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बुद्धिबळ खेळाचा उपयोग महत्त्वपूर्ण- भाग्यश्री ठिपसे

व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बुद्धिबळ खेळाचा उपयोग महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळ खेळाचा समावेश व्हावा, यासाठी पालक व शिक्षकांची पूरक मानसिकता होणे गरजेचे आहे. त्यासाठी माझे प्रयत्न राहतील असे मत ग्रँडमास्टर व अर्जुनपदक विजेती भाग्यश्री ठिपसे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी बाबा इंदुलकर, अरुण मराठे उपस्थित होते.

प्रतीकात्मक पुतळय़ास ‘शॉक ट्रिटमेंट’

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज शिवाजी चौक येथे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या बेजबाबदार आणि िहदू जनतेच्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ास ‘शॉक ट्रिटमेंट’ देऊन पुतळय़ाचे दहन करण्यात आले.

कुर्डूवाडीत मोटार अपघातात मुंबईच्या तिघा तरुणांचा मृत्यू

कुर्डूवाडी येथे बाहय़वळणावर रस्त्याच्या कठडय़ावर भरधाव वेगातील मोटार आदळून घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही मृत मुंबईचे रहिवासी होत.
राहुल सत्यपालसिंग सबरवाल (वय २५, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), सलीम करीम शेख (वय २५, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) व शेख आझाद शेख अली (वय २७, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. मृत राहुल बसरवाल हे होंडा सिटी (एमएच ०६-एम ३०) ही मोटार घेऊन मुंबईहून बार्शीमार्गे कळंबकडे निघाले होते. परंतु वाटेत पहाटेच्या वेळी कुर्डूवाडी येथे पंढरपूर चौकात रस्त्याच्या कठडय़ावर सदर भरधाव वेगातील मोटार आदळली आणि हा अपघात झाला.

एव्हीएच केमिकल प्रकल्प बंद करण्याची मागणी

हलकर्णी (ता.चंदगड) एमआयडीसीमध्ये होऊ घातलेल्या एव्हीएच केमिकल प्रकल्प आरोग्यास घातक असून तो बंद करावा, या मागणीकरिता सुमारे १ हजार मजरे कार्वे ग्रामस्थांनी गावापासून प्रकल्पस्थळापर्यंत मोर्चा काढला. चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीच्या एव्हीएच कंपनी विरोधातील धरणे आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलन केले.

समीर हम्पी, श्रीनिवास जरंडीकर एकत्ररीत्या अपक्ष उमेदवारी लढविणार

अखिल महाराष्ट्र नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत पुणे विभागातून समीर हम्पी आणि श्रीनिवास जरंडीकर यांनी एकत्ररीत्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना परिषदेचे माजी कार्यकारिणी सदस्य योगेश सोमण व नियामक मंडळाचे माजी सदस्य प्रकाश यादव यांनी निवडणुकीत पुन्हा न उतरता पािठबा जाहीर केला आहे. पुणे विभागाच्या १८ नाटय़ परिषद शाखांचा दौरा करून या जोडगोळीने उमेदवारीचे वेगळेपण पटवून देऊन विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

‘सहकारी सूतगिरण्यांना देशभरात विजेचे दर एकसमान असावेत’

सहकारी सूतगिरण्यांना देशभरात विजेचे दर एकसमान असावेत, सूतगिरण्यांना पुरेसे खेळते भांडवल मिळावे, हँक, यार्न निर्बंध काढून टाकावेत याकरिता अखिल भारतीय सहकारी सूतगिरण्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सूतगिरण्यांतील या समस्यांवर मार्ग निघाल्यास त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे, असे मत या महासंघाचे अध्यक्ष आर. एन. देशपांडे व उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील प्रश्नांवर महिलांचे करवीर निवासिनीला साकडे

कोल्हापुरातील टोल आकारणी रद्द होऊ दे, थेट पाईप लाईन योजना साकारली जाऊ दे, हद्दवाढीचा निर्णय लवकर होऊ दे असे गाऱ्हाणे शहरातील महिलांनी शुक्रवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला घातले. जिल्ह्य़ातील पाच नद्यांचे पाणी कलशाव्दारा मिरवणुकीने आणून त्याचा अभिषेक देवीला घालण्यात आला. महिलांचे हे अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. यामध्ये ३ हजारांहून अधिक महिलांचा समावेश होता.

कोल्हापुरात २५, २६ रोजी खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धा

युवक मित्र व विद्या प्रबोधिनी यांच्या वतीने २५ व २६ जानेवारी रोजी येथे खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कुरुक्षेत्र चषकासाठी होणाऱ्या या स्पर्धेसाठी ७० हजार रुपयांची बक्षिसे आहेत. विजेत्यास १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे.

विद्या वाकळे यांना पीएच. डी.

विद्या वाकळे-चंद्रनाथन यांनी शिवाजी विद्यापीठास सादर केलेल्या ‘अ स्टडी ऑफ मेजर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हायलाईटिंग इंडियन पेटेंट, कॉपीराईट्स, ट्रेडमार्क अँड डिझाईन लेजिस्लेशन वुईथ स्पेशल रेफरन्स टू दी राईट्स इनफ्रीजमेंट्स रेमिडीज अँड इम्प्लीमेंटेशन ऑफ दिज लेजिस्लेशन्स’ या विषयाच्या प्रबंधास मान्यता देऊन डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन लॉ ही पदवी प्रदान केली आहे. कोल्हापूरचे प्रसिध्दकायदेतज्ञ डॉ. संतोष अरविंद शहा यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.

कार्यक्रम, भेटीतून उदयनराजेंकडून ‘लोकसभे’ची मोर्चेबांधणी

खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यासाठी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, खासदार निधीतील कामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे रविवारी अधिवेशन

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे १६ वे द्विवार्षिक महाअधिवेशन कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणात येत्या रविवारी (दि. २०) आयोजित केले असून, सकाळी साडेअकरा वाजता पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रामकिसन सोळंकी हे असणार आहेत. महाअधिवेशनाला सुमारे १५ हजारावर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांची उपस्थिती राहील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापुरात आजपासून भीमा फेस्टिव्हल

चॅनल बी च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त यंदाच्या भीमा फेस्टिव्हलअंतर्गत राजर्षी शाहू खासबाग मैदान येथे १९ व २० जानेवारी या दोन दिवशी अनेक नामवंत कलाकारांचा कलाविष्कार सादर होणार आहे.‘कलापूरचे व्यासपीठ-रसिकांना पर्वणी’ हे ब्रीदवाक्य घेऊन यंदा चॅनल बी च्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त भीमा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

कृष्णा कारखान्यातर्फे राजारामबापूंना आदरांजली

कृष्णा सहकारी साखर कारखान्यातर्फे दिवंगत लोकनेते राजारामबापू पाटील यांना २९ व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सेक्रेटरी उदय मोरे, संचालक ब्रम्हानंद पाटील, महिंद्र मोहिते, सुभाष शिंदे, अशोकराव जगताप, संदीपराव पाटील, उदय शिंदे, संभाजीराव दमामे, पांडुरंग पाटील, वसंतराव साळुंखे, सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Just Now!
X