MG AIR EV : देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ही मागणी पाहता अनेक कार कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे वळल्या आहेत आणि नवनवीन कार लाँच करत आहेत. आलिशान एसयूव्हीने ग्राहकांची मने जिंकणारी एमजी कंपनी आता देशात स्वस्त इलेक्ट्रिक कार उपलब्ध करणार आहे. एमजी एअर ईव्ही असे तिचे नाव असून ती २०२३ मध्ये लाँच होणार. विशेष म्हणजे, ही कार आकाराने मारुती सुझुकीपेक्षाही छोटी असणार आहे.

हे आहेत फीचर

एमजी एअर ही इंडोनेशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वुलिंग एअर ईव्हीवर आधारित असेल. भारतीय बाजारपेठेसाठी तिच्यामध्ये काही बदल करण्यात येणार आहे. मात्र, तिचे बॉक्स सारखे डिजाईन कायम राहण्याची शक्यता आहे. कारची व्हिलबेस २ हजार १० एमएम आहे. ती मारुती सुझुकी आल्टोपेक्षा लहान असणार आहे.

(टाटाने पंचमधून ‘हे’ महत्वाचे फीचर हटवले, इंधन बचतीवर होणार परिणाम)

लहान असली तरी कारचा आतील भाग प्रशस्त असेल. कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह मोठे टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम असेल. तसेच उच्च व्हेरिएंटमध्ये सॉफ्ट टच मटेरिएल देखिल मिळण्याची शक्यता आहे. करची किंमत १० लाखांपासून सुरू होईल.

बॅटरी आणि रेंज

एमजी एअर ईव्हीमध्ये २५ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे. हा बॅटरी पॅक फुल चार्जिंगवर १५० किमीची रेंज देऊ शकतो. कारच्या पुढील व्हिल्सना शक्ती देणाऱ्या सिंगल इलेक्ट्रिक मोटरची क्षमता ३५ ते ४० बीएचपीची असेल. शहरात फिरण्यासाठी इतकी शक्ती फायदेशीर ठरेल. २५ किलोवॉट हवरचा बॅटरी पॅक ६.६ किलोवॉट एसी चार्जरच्या सहायाने ५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. एमजी फास्ट चार्चिंग फीचर देखील देऊ शकते.