सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं असून रोज नवनवे शोध समोर येत आहेत. गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत वेगाने वाढ होत आहे. अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. आता त्यात इलेक्ट्रिक एअरक्राफ्टचीही भर पडणार आहे. रोल्स रॉइसच्या ऑल इलेक्ट्रिक एअरक्राफ्टला जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक वाहन म्हणून घोषित केलं आहे. तीन किलोमीटरहून अधिक अंतरासाठी त्याचा सर्वाधिक वेग ५५५.९ किमी प्रतितास होता. कंपनीने सीमेन्सचा ई-एअरक्राफ्ट एक्स्ट्रा ३३० एलई एरोबॅटिकचा विक्रम मोडला आहे. या विक्रमी कामगिरीदरम्यान या विमानाचा कमाल वेग ६२३ किमी प्रतितास होता. या वेगामुळे ते जगातील सर्वात जलद उडणारे ई-एअरक्राफ्ट बनले आहे. या नवीन विश्वविक्रमाची अधिकृतरीत्या फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनलने (FAI) पडताळणी केली आहे. एजन्सी जागतिक एरोनॉटिकल आणि अंतराळवीर रेकॉर्ड नियंत्रित करते आणि प्रमाणित करते. सीमेन्सच्या ई-विमानाने २०१७ मध्ये २३१.०४ किमी प्रतितास वेगाने उड्डाण केले होते.

इलेक्ट्रिक एअरक्राफ्टमध्ये ४०० किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. ही मोटर ५०० अश्वशक्तीपर्यंत पॉवर निर्माण करते. या विक्रमी उड्डाणाच्या वेळी वैमानिकाव्यतिरिक्त रोल्स-रॉइसचे फ्लाइट ऑपरेशन्सचे संचालक फिल ओ’डेल देखील विमानात उपस्थित होते. “ऑल-इलेक्ट्रिक फ्लाइटचा जागतिक विक्रम मोडण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. हे माझ्या कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि संपूर्ण संघासाठी एक अविश्वसनीय कामगिरी आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं. “हा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. जो ‘जेट झिरो’ला प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल. त्यामुळे हवा, जमिन आणि समुद्रातील वाहतूक डिकार्बोनाइज होईल”, असं रोल्स रॉइसचे सीईओ वॉरन ईस्ट यांनी सांगितलं.

दुसरीकडे, यूकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या बॉसकॉम्बे डाउन येथील प्रायोगिक इलेक्ट्रिक विमानाने १५ किमीहून अधिक अंतर ५३२.१ किमी वेगाने गाठलं होतं. यापूर्वीचा विक्रम २९२.८ किमी प्रतितास होता. तसेच २०२ सेकंदात कमीत कमी वेळेत तीन हजार मीटर उंची गाठण्याचा विक्रमही केला होता.