टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय एसयूव्ही पंचचं एकमात्र काझीरंगा एडिशन लाँच करणार आहे. या गाडीचा लिलाव आयपीएल २०२२ दरम्यान होणार आहे. टाटाने पंचच्या नवीन एडिशनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या एक शिंग असलेल्या गेंड्याच्या धर्तीवर या मॉडेलची रचना करण्यात आली आहे. टाटा मोटर्स या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रायोजक आहे. यासाठी कंपनीने वन ऑफ पंच तयार केली आहे. पंचचं एकमेव एडिशन टॉप-स्पेस क्रिएटिव्ह ट्रिमवर आधारित असेल अशी अपेक्षा आहे.

टाटा पंचच्या स्पेशल एडिशनच्या बाह्य भागाला मेटोर ब्राँझ रंगात रंगवण्यात आला आहे. काही कॉस्मेटिक बदल वगळता नविन एडिशन पंचच्या नियमित मॉडेलसारखी दिसते. टाटा पंचचं मॉडेल खास गेंडा बॅजसह येते, जी मागील विंडस्क्रीन आणि ग्लोव्ह बॉक्समध्ये ठेवली आहे. पंचच्या नवीन काझीरंगा एडिशनमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन इंजिन ६००० आरपीएमवर ८५ बीएचपी आणि ३३०० आरपीएमवर ११३ एनएमचा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. मात्र, या स्पेशल एडिशन मॉडेलमध्ये इंजिन मॅन्युअल की ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. पंचची AMT आवृत्ती ‘ट्रॅक्शन-प्रो मोड’ सह येते. यात क्रूझ कंट्रोल आणि आयडल स्टार्ट-स्टॉप सिस्टम देखील मिळते. टाटा पंच इको आणि सिटी या दोन ड्रायव्हिंग मोडसह देखील येतो. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, टाटा पंचला अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेसह ७-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, हवामान नियंत्रणसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

टाटा मोटर्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच केली होती. कारमेकर पंच चार ट्रिममध्ये ऑफर करते. यात प्युअर, अॅडव्हेंचर, एक्म्प्लिश्ड आणि क्रिएटीव्ह यांचा समावेश आहे. या कारची सुरुवातीची किंमत ५.६४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ८.९८ लाख रुपये आहे. गेल्या वर्षी, ग्लोबल NCAP ने क्रॅश चाचणीत पंचाला पंचतारांकित रेटिंग दिले आहे. त्यामुळे भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे.