News Flash

इतिहासपुरुष मी!

या आणि अशा कितीतरी नोंदी मी बंकरमधल्या माझ्या डायऱ्यांमध्ये करून ठेवल्या आहेत.

काळावर ठसा उमटवला पाहिजे आणि इतिहासाने आपली दखल घेतली पाहिजे असे मला नेहमीच वाटते. किंबहुना, माझा तो शौकच आहे. लोकांनी आपल्याबद्दल माहिती ठेवली पाहिजे, उत्सुकता बाळगली पाहिजे. आणि माझे आयुष्य हे सध्याच्या काळालाच नाही, तर भविष्याला दिशा देणारे आहे याची कुठेतरी नोंद व्हायला हवी असे मला मनापासून वाटते. माझा असा अनुभव आहे की, आपल्या असलेल्या-नसलेल्या कर्तृत्वाचा गाजावाजा करणारे लोक लोकांच्या लक्षात राहतात. आणि कानाखाली आवाज काढणारे किंवा विध्वंस करणारे तर जास्तच लक्षात राहतात. खूप गंभीरपणे विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, हे दोन्ही आपल्याला जमणारे नाही. विध्वंस मला जमणार नाही. आणि खूप कर्तृत्व गाजवायचे ठरवले तर खूप मेहनत करावी लागेल, या कल्पनेनेच मला दमायला होते. आणि पुन्हा माझे कर्तृत्व लोक लक्षात ठेवतील की नाही याची मला खात्री नाही. कारण मी आणि अमिताभ बच्चन आम्हा दोघांची नावे एकदा मतदार यादीतून वगळली गेली होती. आता आमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, इतकी साधी नोंद जिथे ठेवली जात नाही, तिथे आपल्या इतिहासाची हे बरोबर नोंद ठेवतील म्हणून कसा विश्वास ठेवणार?

मला असे लक्षात आले आहे की, तुमच्या असण्याबद्दल जर तुम्ही गोंधळ निर्माण करू शकलात तर लोकांना तुमच्याबद्दल काहीच्या काही उत्सुकता वाटते आणि मग खूप सारे लोक तुमच्याबद्दल संशोधन करत राहतात आणि त्यानिमित्ताने तुम्हाला लक्षात ठेवले जाते. याच कारणाने मोहेंजोदारोमधला बैल आणि नर्तकी अजरामर झाले आहेत. मी तर याच मोहेंजोदारोमधल्या बैलाच्या स्मृतीप्रीत्यर्थ जल्लिकट्टूचे आयोजन केले जाते, अशी पुडी चेन्नईत सोडून दिली आहे. आजपासून पुढे काहीशे वर्षांनी माझ्यावर जे संशोधन करतील, किंवा माझे चरित्र लिहू इच्छित असतील, त्यांच्या मनात गोंधळ उडवून देऊन दीर्घकाळपर्यंत लोकांच्या स्मृतीत राहण्याच्या कामाला मी सध्या वाहून घेतले आहे.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी एक ३०० फूट बंकर खणून तिथे माझे काही कागद- ज्याला नंतर दस्तावेज समजले जाईल- ते पुरून ठेवले आहेत. सहजासहजी एखादी गोष्ट सापडली तर लोकांना ती महत्त्वाची वाटत नाही. त्यामुळे पुरून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. माझ्या दस्तावेजांमध्ये मी माझे एक ‘फेक’ बिल दडवून ठेवले आहे. ज्यावर लिहिलेले आहे- तुळतुळीत दाढी.. आणि रकमेच्या जागी ‘बारा हजार बोकड’ आणि टॅक्सच्या जागी ‘तीन हजार कोकरू’ असे नोंदवून ठेवले आहे. यावरून दाढी करायला माझ्या काळात किती खर्च यायचा, याचा अंदाज माझे इतिहासकार लावू शकतील. जोपर्यंत माझा जन्म कधी आणि कुठे झाला याबद्दल गोंधळ होत नाही तोपर्यंत इतिहास लेखकांना आपण महत्त्वाचे वाटत नाही हे माझ्या लक्षात आलेय. त्यामुळे ककोसस पर्वत, पाथर्डी आणि अंटाक्र्टिका इथली माझी तीन ‘फेक’ बर्थ सर्टिफिकेटे मी बनवून ठेवली आहेत. बसूदेत माझ्या इतिहासकारांना जगप्रदक्षिणा करत! या प्रत्येक बर्थ सर्टिफिकेटवर मी माझ्या नावात थोडा बदल केलाय. एकावर ‘सवाई मंदारराव’, एकावर ‘फोर्थ मंदार’ आणि एकावर ‘मंदार दी बोनो’ अशी नावे लिहिली आहेत. मंदार एक होता की ही एकाच मंदारची तीन नावे आहेत, की या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, यावर बसूदेत इतिहास लेखकांना तीन-चारशे वर्षे घोळ घालत. भारतातल्या इतिहास लेखकांना गंडवायला मी १२ घरांऐवजी १६ घरांची कुंडली स्वत:साठी बनवून घेतली आहे आणि ती बंकरमध्ये पुरून ठेवली आहे. आणि चार एक्स्ट्रा घरांमध्ये ‘असूदेत, काय करून घेणार आहे, बस बोंबलत आणि मनमौजी’ या चार ग्रहांचा उल्लेख करून ठेवलाय. इतिहासकारांबरोबर भविष्यातल्या खगोल अभ्यासकांनासुद्धा कामाला लावायची तरतूद मी करून ठेवलीये.

माझ्या डायऱ्या हा फारच महत्त्वाचा दस्तावेज असणार आहे. मी १८४५, १९५६, २०१६, २१७० या सालच्या डायऱ्या छापून घेऊन त्या बंकरमध्ये पुरून ठेवल्यात. त्यातल्या प्रत्येक पानावर खच्चून माहिती खरडून ठेवली आहे. मी साधारण तीनशे वर्षे जगलो असा समज तत्कालीन लोकांचा व्हायला हवा. यात साधारण खालीलप्रमाणे नोंदी आहेत..

‘‘सर किताबाचा स्वीकार करा म्हणून राणीचे दूत आले होते. त्यांना ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिले. राणी कोण मला किताब देणार? मला जर वाटले तर मीच ‘किताब देईन राणीला. परत राणीने विषय काढला नाही.’’

‘‘डुकराच्या मांसाचा वापर करून काडतुसे बनवणे इंग्रजांनी थांबवायला पाहिजे. पण ते ऐकत नाहीत. एखाद्या वेळी तोंड फुटेल तेव्हा कळेल.’’

‘‘अहिंसा हा एकमेव लढण्याचा मार्ग आहे, असे आज मी एका कृश माणसाला सांगितले. ‘तू फक्त हे मी तुला सांगितले आहे, हे कुठे बोलू नकोस,’ असेही बजावले आहे. बघूयात काय करतो ते.’’

‘‘चर्चिलला ई-मेल केला. लब्बाड आहे माणूस. ई-मेल कसे करतात, हे जगात कोणाला माहीत नाही अजून. मीपण कोणाला सांगणार नाहीये. लोक ई-मेल करायला लागले तर पोस्ट बंद पडतील. मी फक्त चर्चिलशी ई-मेलने संपर्क साधून आहे.’’

‘‘सायमन कमिशनबरोबर गेलो नाही हे बरेच झाले असे आता वाटते. लोक ऐकत नाहीत आजकाल.’’

‘‘माउंटबॅटनबरोबर घोडेस्वारी केली. घोडा ठीक चालवतो हा बाबा. पण माणूस बरोबर नाही. इथे देशभर आंदोलन चालू असताना हा बाबा मला आज संध्याकाळी काय प्रोग्रॅम आहे? असे आमंत्रण देत होता. मला खूप वेळ इंग्रजी बोलायला लागले की थकायला होतं. मला माहितेय, की याला काही माझे प्रेम नाही; पण फुकटात माझ्याकडून आंदोलकांची माहिती काढायला बघतो. आणि बाहेर आलो की लोक यांच्याबद्दल माझ्याकडून माहिती विचारत राहतात. मला काय कळत नाही की काय, की यांना म्हाताऱ्याबद्दल नाही, तर लेडीबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे म्हणून? मीही उगाच ‘हो’ही नाही आणि ‘नाही’ही नाही असा सूचक हसतो. ‘हो’ही नाही आणि ‘नाही’ही नाही असे मोघम मला आता हसता यायला लागले आहे. लेडी माउंटबॅटनकडूनच शिकलो.’’

‘‘एकदाचा देश स्वतंत्र झाला. फार काम पडले मला दरम्यानच्या काळात. मंत्रिमंडळाच्या धकाधकीपासून दूर राला हवे. देशनिर्मितीच्या कामात आता झोकून देईन म्हणतो.’’

‘‘हरिवंशराय बऱ्या कविता करतो. आज तो त्याच्या मुलाला घेऊन आला होता- माझ्या पायावर घालायला. मी त्याला ‘मोठा हो’ असा आशीर्वाद दिला. हा मुलगा फार मोठा होईल. पण भंगार लोकांचा सहवास याने टाळायला हवा, हे हरिवंशरायला सांगितले आहे.’’

‘‘चंद्रावर जाऊन आलो. कंटाळवाणी जागा आहे. पावसाळ्यात पण जितके खड्डे रस्त्यावर पडत नाहीत तितके खड्डे आहेत. माझ्या तर पाठीत उसणच भरली. मी अजिबात परत तिथे जाणार नाही. मला तिथे जे कपडे घालायला दिले होते तेही आवडले नाहीत. शौचाला जायची मोठीच अडचण होते असल्या कपडय़ांत. आणि त्यात आपण काय करतोय, हे चोवीस तास बघत असतात पृथ्वीवरचे संशोधक. चोंबडे आहेत आमचे संशोधक. त्यांना चंद्रावर काय आहे, त्यापेक्षा मी तिथे काय करतोय, यातच जास्त इंटरेस्ट आहे. बोगस लोक आजूबाजूला असण्याचा शापच आहे मला. चंद्रावर पण माझ्याबरोबर काय बोगस लोक दिले होते. एकाला तर मी भिरकावूनच देणार होतो चंद्रावरून. पण नंतर तो विचार सोडून दिला. चंद्रावर गुन्हा केला तर केस कुठे करतील? चंद्र कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो? आणि मुख्य म्हणजे शहर की ग्रामीण?’’

‘‘काश्मीर, समान नागरी कायदा, राम मंदिर यावरचा रामबाण तोडगा पंतप्रधानांना दिला. त्यांनी मागच्या पंतप्रधानांप्रमाणे खांदे उडवले आणि माझ्याच खांद्यावर थोपटले. मीही मग फार ताणले नाही.’’

‘‘खलबत्ता, हिंडालियमचे भांडे, हळद आणि गोमूत्र यांचा वापर करून घरच्या घरी अण्वस्त्रे बनवायची सोपी पद्धत मी शोधून काढली आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नैर्ऋत्य दिशेला क्षितिजावरच्या निळ्या रंगात एक आकृती प्रकट होईल. ही आकृती हेच घरच्या घरी अण्वस्त्रे बनवायचे डिझाइन असेल.’’

‘‘अंबानींना किती वेळा नाही म्हणणार? सारखे माझ्याकडे पैसे मागतात. बरं.. दोन भाऊ ! एकाला दिले की दुसऱ्याला पण द्यावेच लागतात. साडेपंधरा लाख कोटी नोटा छापल्या होत्या, त्यापैकी साडेचौदा लाख कोटी लोकांनी ब्यांकेत आणून भरले. मी आधीच सांगत होतो, की हा फार प्रामाणिक लोकांचा देश आहे. इथे कोणाकडेही काळा पैसा नाही.’’

या आणि अशा कितीतरी नोंदी मी बंकरमधल्या माझ्या डायऱ्यांमध्ये करून ठेवल्या आहेत. आणि काम अजूनही सुरूच आहे. भविष्यकाळातील पाचपन्नास संशोधकांच्या पोटाची सोय मी लावून देणार आहे. माझ्या काही डायऱ्या, ‘सवाई मंदारराव’ लिहिलेले माझे जरीचे बनियन आणि माझे तीन-चार गॉगल मी जगाच्या विविध कोपऱ्यांत पुरून ठेवले आहेत. ‘बंकर टुरिझम’ म्हणून हे सगळे बघायला लोक येतील आणि परत परत गोंधळात पडत राहतील. तेव्हा मला माझ्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

मंदार भारदे – mandarbharde@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2017 1:01 am

Web Title: how to live a more meaningful life
Next Stories
1 मराठी NRI
2 जिल्हाधिकारी  आणि  माकड
3 पेंग्विनचे मरण आणि बिचारे शासन!
Just Now!
X