शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातील विसंगतींची खिल्ली उडवणारे, तसेच तात्कालिक घटनांतले विरोधाभास हेरणारे आणि त्यातल्या चेष्टेच्या जागा शोधणारे मिश्कील, गमतीशीर सदर..

सरकारतर्फे जोही संवाद साधला जातो तो मी खूपच गांभीर्याने घेतो. प्रत्येक सरकारी जाहिरात मी गांभीर्याने पाहतो, वाचतो किंवा ऐकतो. माझ्या या स्वभावामुळे मला एकदा गंभीर प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते.

मी तेव्हा नाशिकमध्ये राहत असे आणि कॉलेजमध्ये शिकत होतो. मी सकाळी पेपर उघडला तर त्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन छापले होते. गेल्या तीन-चार दिवसांत एका माकडाने शहरात धुमाकूळ घातला होता. त्याची खूपच दहशत पसरली होती. ज्याला कुणाला त्या माकडाचा ठावठिकाणा ठाऊक असेल त्याने ताबडतोब शासनाला कळवावे असे आवाहन त्यांनी केले होते.

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे स्कूटरवर बाहेर पडलो आणि शहरातल्या मुख्य चौकात आलो. त्यावेळी एक माकड माझ्या समोरून रस्ता ओलांडून पळत गेले. मला लगोलग माझ्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्या लक्षात आले की संबंधितांना माकडाबद्दल कळवणे गरजेचे आहे. मी वेळ न दवडता पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे बाकडय़ावर बसलेल्या पोलिसासमोर उभा राहिलो. त्याने मला आपादमस्तक न्याहाळले व हातात एक कागद दिला. त्यावर नाव, लिंग, वय, हल्लीचा पत्ता इत्यादी माहिती लिहायला सांगितली. मी यातले काहीही मला माहीत नाही असे सांगितले. त्यावर त्याने माझ्याशी हुज्जत घातली. मला खरोखरच त्या माकडाचे नाव, लिंग, वय, पत्ता माहीत नव्हता.

मी जिल्हाधिकाऱ्यांचे नाव घेतल्यावर त्याने मला गांभीर्याने घेतले. म्हणजे तुम्ही खबर द्यायला आला आहात? असे त्याने विचारले. मी जिल्हाधिकाऱ्यांना मदत करायला आलोय असे सांगितले.

बसा! त्याने मला इशारा केला. साहेब, बसायला वेळ नाही. तुम्ही चला आणि माकडाला पकडा.. मी त्याला विनवले.

साहेब, तुम्ही शिकलेसवरलेले दिसता. माकडाची खबर पोलीस स्टेशनला नाही, तर वन विभागाला द्यायची असते, इतकेही तुम्हाला समजत नाही?

मी खजील झालो. माकडाची खबर वन विभागाला द्यायला हवी, हे मला लक्षातच आले नाही. मी आपला खुळ्यासारखा पोलिसांकडे जाऊन त्यांना त्रास दिला. मी त्याची माफी मागितली. वन विभाग कुठे आहे हे मला माहीत नव्हते. मी त्यालाच पत्ता विचारला आणि त्या दिशेला स्कूटर वळवली. दरम्यान माकड मोकाट फिरते आहे आणि आपल्यामुळे त्याला पकडायला उशीर होतो आहे, या जाणिवेने मी शरमलो. माकडाची खबर कुठे द्यायची याची खबर नसणारे लोक आपल्या देशात राहतात ही गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांना समजली तर ते आपल्याला हाकलून तर देणार नाहीत, असाही विचार मनात आला. पण शेवटी आपण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे करतो आहोत हे ते लक्षात घेतील असेही वाटले. मी वन विभाग कार्यालयात पोहोचलो. मला माकडाने दिव्य दर्शन दिल्याला आता तास उलटला होता. शहर संकटात होते. माकड मोकाट होते. आणि मी अजून योग्य माणसासमोर पोचलो नव्हतो. मी यावेळी केबिनमधल्या अधिकाऱ्यासमोर थेट जाऊन उभे राहायचे ठरवले. नमस्कार साहेब, मी एक तासापूर्वी माकडाला पाहिले. तुम्ही ताबडतोब चला, माकडाला ताब्यात घ्या आणि शहराला संकटातून मुक्त करा.

माकडाशी आमचा संबंध येत नाही.

साहेब, ते माकड माझ्याही संबंधातले नाही, पण त्याला पकडणे गरजेचे आहे. वन विभाग आपला माकडाशी काही संबंध नाही असे म्हणू शकत नाही. तुम्ही ताबडतोब त्या माकडाला ताब्यात घ्या!

हे बघा साहेब, आम्ही सामाजिक वनीकरणवाले आहोत. आमचा झाडांशी संबंध आहे. झाडावरच्या माकडांशी नाही. तुम्ही शिकलेसवरलेले दिसता. तुम्हाला इतकेही कळत नाही?

साहेब, मी तुम्हाला शपथेवर सांगायला तयार आहे, की माकडाची खबर देताना घ्यावयाची काळजी या विषयावर एकही धडा आम्हाला शिक्षणात नव्हता. मला कृपया सांगा- माकड कोण पकडेल?

साहेब, माकड पकडण्यासाठी वन विभागांतर्गत स्वतंत्र वन्यजीव विभाग आहे. तिथे जा आणि तक्रार करा. तो विभाग शेजारील इमारतीतच आहे, ही खूशखबरही त्यांनी दिली. मी त्यांचे आभार मानले आणि बाहेर पडलो. एकदा माकड पकडले गेले की आपण वन विभागाचे सगळे विभाग नीट समजावून घेतले पाहिजते असे मी मनोमन ठरवले. शेजारच्या इमारतीच्या समोर मोठ्ठा पिंजरा होता. तो पाहून मला भरून आले. आपण दीड तास वाया घालून का होईना, पण योग्य ठिकाणी पोचल्याची माझी खात्री पटली.

मी एका केबिनमध्ये शिरलो. तिथे एक गरोदर अधिकारी बाई फोनवर बोलत होत्या. आता या बाई कशा काय माकडाला पकडणार, हा विचार मनात आला आणि मी जागीच थिजलो. बाई कोणाशीतरी रिसॉर्टमध्ये कॅम्प फायरला जाण्याबद्दल बोलत होत्या. त्यांनी मला नजरेनेच बसा असे खुणावले. मी बसलो. पाचेक मिनिटे त्यांचा फोन चालला होता. माझ्या डोळ्यासमोर रहदारी, जिल्हाधिकारी, माकड, बाहेरचा पिंजरा, बाईंची अवस्था गरगरा फिरायला लागले. मी उभा राहिलो आणि जोरजोरात ‘माकड.. माकड’ ओरडायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी फोन ठेवला आणि त्रासिकपणे माझ्याकडे पाहिले.

आजच्या पेपरमध्ये माकड मोकाट सुटल्याचे आणि नागरिकांनी त्याला पकडून देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे.

नाही. अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही!

तुमच्यासमोर जो पेपर पडला आहे त्यातही हे छापून आले आहे म्याडम!

जिल्हाधिकारी महसूलवाले आहेत. महसूलवाल्यांचा माकडाशी काय संबंध?

म्याडम, पण माकड तुमच्या खात्याशी निगडित आहे की नाही?

हो, आहे.

मग काहीतरी करा आणि त्याला पकडा.

मला सांगा, ते लाल तोंडाचे होते की काळ्या?

म्याडम, मी त्याच्या तोंडाचा रंग पाहिला नाही.

मी तुम्हाला तेच सांगतेय, की तुम्ही माकड नाही, दुसरेच काहीतरी पाहिलेय.

म्याडम, माफ करा. मी त्याचा तोंडाचा रंग पाहिला नाही, पण मी खात्री देतो, की ते माकडच होते. तुम्ही कोणालातरी हा पिंजरा घेऊन पाठवा.

माकड पकडायला तुम्ही सांगता आहात ना?

मी नाही, जिल्हाधिकारी सांगताहेत.

मोठय़ा अधिकाऱ्यांचे नाव घेऊन सरकारी कामात हस्तक्षेप करू नका.

म्याडम का वाद घालताय? तुम्ही कोणाला तरी पाठवा. आपण जे दिसेल ते माकड पकडू.

ठीक आहे. आपण सोमवारी सकाळी जाऊ.

अहो, पण का?

शनिवार-रविवार सुट्टी आहे.

अहो, पण आज शुक्रवार आहे. आज का नाही?

आज पिंजरा ओढायला चालक नाही.

का? आता तो कुठे गेलाय?

वनमंत्री आज शहरात आहेत. तो त्यांच्या प्रोटोकॉलच्या गाडीवर गेलाय. तो आता सोमवारीच येईल.

मग माकडाचे काय करायचे? म्याडम, मी माझ्या आयुष्यातले दोन तास खर्च केलेत माकडाला पकडून देण्यासाठी. आपण त्याला पकडू शकलो तर माझ्या वेळेचे सार्थक होईल.

अहो, तुम्ही दोन तासांची बात करता, मला तर दहा वर्षे झाली २ी१५्रूी मध्ये. माकड पकडणे म्हणजे सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला?

ठीक आहे, मी निघतो. बघा, जर वनमंत्री आज लवकर गेले तर शक्यतो आजच माकड पकडा.

थांबा !!!

या फॉर्मवर तुमचे नाव, गाव, घराचा पत्ता, फोन नंबर आणि ओळखणाऱ्या दोन प्रतिष्ठित लोकांचे नंबर लिहून द्या?

का, माझा काय संबंध?

माकडाची खबर कोणी आणली?

मी.

माकड पकडले जावे असे कोणाला वाटते?

मला.

माकड वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत विशेष प्राणी म्हणून सूचित आहे. त्याला दुखावले किंवा त्याला त्रास झाला तर सात वर्षांची सजा, दोन लाख दंड किंवा दोन्ही होऊ  शकते.

पण मी माकडाला इजा पोहोचवलेली नाही.

मग कामधंदे सोडून माकडाला बघत का बसला होतात? आज सोडते मी तुम्हाला. तुम्ही त्या चौकात जा आणि लोकांना सांगा, की त्या माकडाला इजा पोहोचवू नका. जर का दरम्यानच्या काळात माकडाला काही झाले तर तुमचा नंबर आणि पत्ता माझ्याकडे आहेच.

मी मान खाली घालून बाहेर पडलो.

देशभक्ती हे मला खूप उच्च मूल्य वाटत आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देशसेवेचा माझा अपराध गंड घालवायची आयती संधी दिली होती. पण मी असा करंटा, की त्याही संधीचे सोने करता आले नाही. देशसेवा हा महागडा शौक आहे, हेच खरे!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com