25 February 2020

News Flash

फटकळोपनिषद

एकतर्फी प्रेमभंग झालेल्या लोकांपेक्षा मनातल्या मनात कुढत बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

 

लोक काहीच्या काही भंगार विषयांवर संशोधन करीत राहतात, त्यामुळे काही महत्त्वाचे आणि तातडीचे विषय संशोधनाच्या कक्षेबाहेर राहतात, हा माझ्या नेहमीच तक्रारीचा विषय असत आला आहे. म्हशीवर गर्भसंस्कार केले तर त्याचा रेडकूच्या भावविश्वावर काय परिणाम होतो, हा माझ्या मते कमी प्राधान्याचा विषय असायला हरकत नाही. मात्र अशाच विषयांवर संशोधनाची चळत आपण उभी करत चाललो आहोत हे निश्चितच फार वेदनादायी आहे. स्पष्ट बोलणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा त्रास कमी होतो का? या विषयावर फार तातडीने संशोधन करायला हवे असे माझे स्पष्ट मत आहे. या विषयावर काही संशोधनात्मक मते व्यक्त करायला मी फार अधिकारी मनुष्य आहे असे मला खूप आतून वाटते आहे, कारण माझा स्वत:चा या विषयावर अजिबात अभ्यास नाही. ‘अभ्यासोनि प्रकटावे’ ही मागास अपेक्षा कालबा ठरल्यानंतर माझ्यासारख्याची फार मोठी सोय झाल्याचे मला मान्यच करायला हवे. त्यामुळे स्पष्ट बोलणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो किंवा कसे या विषयावरचे माझे चिंतन मी आज मांडणार आहे.

स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास कमी होतो आणि त्यांना दीर्घायुष्यही लाभते असेच मला आढळून आले आहे. एक फार चांगली गोष्ट आहे. एक राजा असतो आणि त्याचा एक फार लाडका पोपट असतो. राजा तासन्तास त्या पोपटाकडे पाहत बसायचा आणि त्याचे चोचले पुरवत बसायचा. त्याचे पोपटावरील प्रेम जगजाहीर होते. त्या समर्थाघरच्या पोपटाचे वृद्धापकाळाने निधन होते. आता ही बातमी राजाला देणार कोण? राजा तर वेडापिसा होईल अशी साऱ्यांचीच भीती असते. अमात्य जातो आणि म्हणतो, ‘महाराज पोपट महाशय मौनात गेलेत आणि विचार करत बसलेत त्यामुळे ते कोणाशी बोलत नाहीयेत.’ राजा म्हणतो, ‘काही तरी काय! प्रधान तुम्ही बघून या.’ प्रधान जातो. पोपट पिंजऱ्यात मरून पडलेला असतो, त्यालाही तीच अडचण, पोपट मेलाय हे राजाला सांगायचे कसे? तो राजाला सांगतो, ‘महाराज बरे झाले तुम्ही मला पाठवले, पोपट महाशय मौनात वगरे नाही ते तर ध्यानाला बसलेत. पोपट महाशय मोठे सिद्ध पुरुष आहेत त्यामुळे ते ध्यानात बसून विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करताहेत.’ शेवटी कोणी तरी लहान मुलगा पिंजऱ्यात डोकावतो आणि ‘अरे हा पोपट तर मेलाय’ असे जोरात ओरडतो आणि मग राजाला कळते की पोपट मेला आणि इतरांचीही सुटका होते, अशी काही तरी ती गोष्ट आहे. ही गोष्ट मला मोठीच सूचक गोष्ट वाटत आलेली आहे.

पोपट मेला आहे असे सांगायचे भय किंवा संकोच नक्कीच या गोष्टीतल्या अमात्य, प्रधान या लोकांच्या हृदयावरचा ताण वाढवत असणार. हृदयाला पीळ पडणे असा मराठी वाक्प्रचार आहे तो मला मोठा सूचक वाटतो. काहीही स्पष्ट बोलायचे टाळले की हृदयावर ताण पडतो आणि हृदयाला पीळ पडतो आणि जर आपल्याला स्पष्ट बोलता आले तर हृदयावरील ताण हलका होतो आणि एक पीळ सुटतो असे ते गणित आहे. हृदयाला खूप पीळ पडत गेले की हृदयावरील ताणही वाढत जाणार आणि आणि या ताणाने हृदयविकाराचा झटका येणार हे सत्य मानायला जागा आहे.

एकतर्फी प्रेमभंग झालेल्या लोकांपेक्षा मनातल्या मनात कुढत बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि हे कुढत बसणे मुख्यत: काही तरी बोलून दाखवायचा संकोच यामुळे अनेकांना येते असा माझा दावा आहे. किती तरी दर्जेदार लोक मागे का पडतात याची कारणे शोधली तर स्पष्ट बोलून दाखवायचा संकोच करतात म्हणून मागे पडतात, असेच दिसून येईल. एका अभिनेत्याने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, मला नाटकात काम करायचे आहे हे मला कधीही माझ्या शाळेतल्या नाटकाच्या सरांना सांगता आले नाही. मी खूप वेळा मनातल्या मनात चडफडायचो, पण मला नाटकात भाग घ्यायचाय हे सांगायची माझी कधीही हिंमत झाली नाही. शाळेत शिक्षक काही तरी प्रश्न विचारतात आणि उत्तर येत असूनही हात वर करायची हिंमत न करणारे सगळेच या पीळ वाढवणाऱ्यांच्या कॅटेगरीत मोडतात.

एखादा अगदी जवळचा आणि महत्त्वाचा माणूस आपल्याशी बोलतो आहे, त्याच्या दातांचा वास येतो आहे. त्या वेळेला आपण काय करता? त्याला तसे स्पष्ट सांगता की तसेच सहन करत राहता? किंवा एसी खोलीत कोणी तरी वास मारणारे मोजे घालून आलाय त्याला तुम्ही मोजे बाहेर काढून ये असे स्पष्ट सांगता की वास सहन करीत तो कधी तरी निघून जाईल अशी वाट बघत राहता? या प्रश्नांची उत्तरे सहन करीत राहतो अशी असतील तर प्रसंगागणिक हृदयाचा पीळ वाढत चालला आहे अशा निष्कर्षांपर्यंत यायला काहीच हरकत नाही. स्पष्ट नाही म्हणता न येणे हे हृदयाला पीळच काय हृदयावर घडय़ाच घालायची व्यवस्था करते. एकाने मला सांगितले होते की, त्याचा पगार झाला की त्याचा बराचसा पगार हा जवळच्या लोकांना उधार पसे देण्यातच खर्च होतो. दर वेळेला त्याच्या जवळचे मित्र किंवा नातलग पगारानंतर काही तरी कारण काढून येतात आणि यांच्याकडून उधार घेऊन जातात. पुरेसा पगार असताना याचा महिना ओढग्रस्तीत जातो, पगार कमी का आणला म्हणून बायको चिडते आणि आठ दिवसांत आणून देतो म्हणून घेऊन जाणारा कधीच वेळ पाळत नाही आणि हा चांगल्या पगाराचा धनी बाराही महिने चणचण सहन करतो. त्याला विचारले की, तू ज्यांना पसे देतो आहेस ते तुझ्या जवळचे आहेत का? तर तो म्हणाला नाही, सगळेच काही फार जवळचे नाहीयेत मग तू त्यांना का पसे देतो आहेस.

अडचणीला आपण नाही मदतीला गेलो तर ते काय म्हणतील?

तू जर कधी अडचणीत असशील तर हेच सगळे मदतीला येतील का?

काही सांगता येत नाही.

तू त्यांना नाही म्हणू शकतोस का?

एक मोठी शांतता – बहुतेक नाही.

कधीच नाही?

हं, बहुतेक कधीच नाही!

एकदा तू पसे दिलेस आणि त्याने वेळेवर नाही परत केले तर पुढच्या वेळेला त्याला देशील का?

पुन्हा एक, जिचा अर्थ होकार हाच आहे अशी मोठी शांतता.

मी माझ्या संपर्कातल्या हृदयविकाराचा त्रास होणाऱ्या लोकांचा अभ्यास केला तेव्हा मला असे आढळून आले, की ज्यांना सगळे जग फटकळ म्हणून ओळखते त्यातल्या खूप कमी जणांना हृदयविकाराला तोंड द्यावे लागले होते. आणि ज्यांना मी मनमिळाऊ, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे किंवा सहनशील म्हणून ओळखत होतो त्यांतल्या बहुतेकांना हृदयविकाराला तोंड द्यावे लागत होते. सतत लोकांचे पसे उधार घेऊन गुजराण करणारे हृदयविकारापासून मुक्त होते आणि उधार देणारे रक्तदाबाच्या गोळ्या घेत होते. फटकळ असणे किंवा तुम्ही त्यांना स्पष्टवक्तेही म्हणू शकता, तसे असणे हे नुसतेच फायद्याचे नाही तर आरोग्यवर्धकही आहे, हे तुमच्या लक्षात येईल. भीड ही भिकेची जननी आहे हे आपल्याला आतापर्यंत माहीत होते, पण भीड ही अनारोग्याचे निमित्तही आहे हे माझ्या संशोधनाचे फलित आहे.

आपल्या प्राचीन फटकळोपनिषदात स्कंध सोळामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याचा फार चांगला उपाय सुचवला आहे. पूर्वीच्या काळीही ऋषीमुनी जेव्हा तपस्या करायचे तेव्हा काही मुनी कायम राजाश्रय अनुभवायचे, चांगले चांगले राजपुत्र वगरे फक्त त्यांचेच शिष्य व्हायचे आणि ते शिष्य गादीवर बसल्यावर त्याच ऋषींना राजर्षी वगरेचा दर्जा मिळायचा आणि बाकी बहुतांश ऋषी जंगलातून सरपण गोळा करून आण, कमंडलू घासूनपुसून स्वच्छ ठेव, वाघाची कातडी सोलून सगळ्यांच्या बसायची सोय कर असल्या फुटकळ कामाला जुंपले जायचे. सगळ्यांनीच तपस्या एकत्र केली, अंगावर वारूळंही सगळ्यांनीच चढवून घेतली तरी काही जण पहिल्या दिवसापासून अनुदानित तर काही जणांवर कायम विनानुदानित राहायची वेळ का येते या प्रश्नाने जेव्हा ऋषी अस्वस्थ झाले तेव्हा त्यांनी फटकळोपनिषद लिहिले.

पुढेपुढे करणारे आणि स्पष्ट बोलायला न घाबरणारे ऋषी राजर्षी बनताहेत आणि बुजणारे गुणवत्तावान ऋषी मागे पडताहेत या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मंत्र फटकळोपनिषदात सांगण्यात आले आहेत. स्पष्टवक्तेपणा हा काही जणांत जन्मजात असतो, त्यांना तो त्यांच्या जन्माने मिळतो त्यामुळे स्पष्टवक्तेपणा ही फक्त जन्माने मिळणारी गोष्ट आहे या गरसमजात अनेक जण राहतात. परंतु हे अगदी खोटे आहे. स्पष्टवक्तेपणा हे एक तंत्र आहे आणि ते मेहनतीने शिकता येऊ शकते. थोडी साधना केली तर आपण स्पष्टवक्तेपणाच्या मार्गावर चालू शकतो.

फटकळोपनिषदात सांगितल्याप्रमाणे आधी एक यादी बनवायला घ्यावी. ज्या ज्या लोकांशी आपल्याला स्पष्ट बोलायला भीड पडते त्यांची नावे लिहून काढावीत. यामध्ये समोरच्याचा अधिकार मोठा आहे किंवा जे मोठय़ा पदावर आहेत त्यामुळे ज्यांच्याशी बोलायला भीड पडते त्यांची एक यादी बनवावी आणि आपण स्पष्ट बोललो तर जे दुखावले जातील याची भीती वाटल्यामुळे बोलायला भीड पडते त्यांची एक वेगळी यादी बनवावी. तपस्येला सुरुवात करण्यापूर्वीच हे लक्षात ठेवावे की, ज्यांचा अधिकार किंवा पद मोठे आहे त्यांच्याशी स्पष्टपणे बोलण्याची कला शिकणे हे तुलनेने सोपे आहे, पण भावना दुखावल्या तर नाही ना जाणार असे ज्यांच्याबद्दल वाटते त्यांच्याशी स्पष्ट बोलायची कला शिकणे फार कठीण आहे, पण ते शक्य नक्कीच आहे. ही यादी बनवल्यावर एकेका माणसाशी पूर्वी झालेला संवाद आठवावा, त्यात कुठून आपली विकेट पडायला सुरुवात झाली ते संभाषण आठवावे आणि तशा प्रकारच्या प्रसंगात नक्की कुठून आपण समोरच्याच्या प्याद्याला घाबरून आपला वजीर मागे घ्यायला सुरुवात केली होती तेही आठवावे. आपण काय बोललो की आपले म्हणणे नेमके समोरच्याला कळेल ती वाक्ये तर पाठच करून जावीत आणि योग्य वेळ येताच म्हणून टाकावीत. बोलून टाकल्याने माणसाचे जितके नुकसान होते त्यापेक्षा जास्त नुकसान मनातल्या मनात तेव्हा का बोललो नाही या विचारात कुढण्याने होते. समोरच्याला स्पष्ट बोलताना सुरुवातीला शब्दांची जुळवाजुळव करावी लागेल, कदाचित पाठही करावे लागेल, नंतर नंतर स्पष्ट बोलायची आपली भीड आपोआप चेपत जाईल आणि पाणी वाहते होईल. एखादा गँगस्टर जसा टिप्पून टिप्पून शत्रूला मारतो तसे टिप्पून टिप्पून ज्यांच्याशी बोलायचे आजवर दडपण येत होते त्यांना पकडून पकडून सुनावून टाका.

जोरात वारा आल्यावर जसा पतंगाच्या चक्रीचा मांजा वेगाने मोकळा होत जातो, तसा वेगाने हृदयाचा पीळ मोकळा होत जाईल आणि स्पष्टवक्तेपणात एक सहजता येईल.

फटकळोपनिषदात हे नोंदवले आहे की, सत्य आणि स्पष्ट बोलण्याने कधीही आपला माणूस तुटत नाही आणि जर तो तुटलाच तर हे पार्था, अजिबात खंत करू नकोस, तो कधी ना कधी तुटणारच होता, तो तुझा कधी नव्हताच असे समज आणि आपल्या स्पष्टवक्तेपणाच्या वाटेवरचा प्रवास उतू नको मातू नको आणि मुख्य म्हणजे सोडू नकोस.

हे पार्था, हृदयाने करण्याजोगी किती तरी इंटरेस्टिंग कामे असताना कोणत्या तरी टुकार ताणाच्या दबावाखाली त्याला ठेवणे हा हृदयाचा अगदीच गरवापर आहे रे!

mandarbharde@gmail.com

First Published on October 22, 2017 3:01 am

Web Title: research on unuseful issues
Next Stories
1 तुला सांगतो भाऊ..
2 आमचं घडय़ाळ वेगळं असतं!
3 दु:खी माणसाचा सदरा
Just Now!
X