News Flash

अलेक्सा आणि केटीच्या मैत्रीची गोष्ट!

माझी अकरा वर्षांची मुलगी एक दिवस नेटफ्लिक्सवरच्या लहान मुलांच्या सेक्शनमधलं काहीतरी बघत होती.

अलेक्सा आणि केटीच्या मैत्रीची गोष्ट!

|| मुक्ता चैतन्य

माझी अकरा वर्षांची मुलगी एक दिवस नेटफ्लिक्सवरच्या लहान मुलांच्या सेक्शनमधलं काहीतरी बघत होती. मी सहज तिच्या शेजारी जाऊन बसले, तितक्यात टीव्हीच्या पडद्यावर दोन मुली आल्या. दोघींना टक्कल होतं. या टीन एजर्स मुली स्वत:साठी एका दुकानात निरनिराळ्या रंगांचे आणि स्टाईलचे विग बघत असतात. या सीनमुळे माझी उत्सुकता वाढली आणि मीही सीरिअल बघायला बसले.

सीरिअलचं नाव- ‘अलेक्सा अ‍ॅण्ड केटी’.

ही गोष्ट आहे अलेक्सा आणि केटीची. तुमच्यासारखीच टीनएजर असणाऱ्या अलेक्साला कॅन्सर झालेला असतो. केमोथेरपीत तिचे केस जातात. केटी तिची घट्ट मत्रीण. अगदी फाफे. आपल्या मत्रिणीचे कॅन्सरच्या उपचारात केस गेले म्हणून तिनंही स्वत:चं टक्कल करून घेतलेलं असतं. मी बघत असलेल्या सीनची ही पाश्र्वभूमी. मला तो सीन बघून ‘अलेक्सा अ‍ॅण्ड केटी’ ही सीरिअल खूपच आवडली. कॅन्सरसारखा अतिशय संवेदनशील विषय किती सहजपणे त्यात हाताळला गेला होता. अनेकदा आपल्या वर्गात, ग्रुपमध्ये कुणालातरी एखादा आजार होतो, हात मोडतो किंवा कुणाच्या घरातली मोठी माणसं आजारी पडतात; अशा वेळी या आजारांचा तुमच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. अर्थात त्याबद्दल तुमच्याशी उघडपणे बोलायला अनेकदा मोठय़ांनाच घाबरायला होत असतं. मोठे घाबरतात आणि गप्प बसतात. पण ‘अलेक्सा अ‍ॅण्ड केटी’सारख्या सीरिअल्स किंवा ‘तारे जमींपर’सारखे सिनेमे मोठय़ांच्या दृष्टीने वाटणारे अवघड विषय सोपे करून तुमच्यापर्यंत आणतात. कॅन्सर म्हटलं की जिथे पालकच धास्तावतात, तिथे या आजाराबद्दल मुलांशी बोलणं तर दूरच! पण ‘अलेक्सा अ‍ॅण्ड केटी’ कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सहजपणे समोर आणते. अलेक्साची ट्रीटमेंट, तिच्या मित्र-मत्रिणींच्या प्रतिक्रिया, तिची स्वप्नं आणि केटीबरोबर असणारी घट्ट मत्री अशा अनेक गोष्टी या वेब सीरिअलमधून पुढे येतात.

मुलं लहान आहेत असं म्हणून अनेक गोष्टी आजही पालक मुलांशी बोलत नाहीत. खरं तर तुम्ही मुलं खूप हुशार असता, संवेदनशील असता जगण्यातल्या मोठय़ांना अवघड वाटणाऱ्या गोष्टी समजून घेण्याची सहजता मोठय़ांपेक्षा अधिक तुमच्यात असते. पण मी वर म्हटलं तसं मोठे जरा घाबरट असतात. त्यामुळे ते तुम्हाला अनेक गोष्टी सांगत नाहीत.

इंटरनेटच्या जगात मुलांसाठीही उत्तमोत्तम सिनेमे आणि वेब सीरिअल्स आहेत. मोठय़ांसाठी बनवलेल्या सास-बहू सीरिअल्स तुम्ही बघण्याची अजिबात गरज नाही. आई-बाबांच्या मदतीने ऑनलाइन उपलब्ध असलेल्या वेब सीरिज आणि सिनेमे तुम्ही शोधू शकता. आता यूटय़ूबने ‘यूटय़ूब किड्स’ म्हणून वेगळं अ‍ॅप सुरू केलं आहे. त्यामुळे मोठय़ांच्या यूटय़ूबवर जायची गरजच नाही. यूटय़ूब किड्सवरून तुम्ही खास तुमच्यासाठी असलेल्या सीरिअल्स आणि सिनेमे बघू शकता. आपल्या हातात स्मार्टफोन आहे तर त्याचा चांगला वापर करू या. उगाच काहीतरी बघत बसण्यापेक्षा चांगलं तेच बघू या ना!

रेड अलर्ट

१) अनेकदा अ‍ॅप्स डाउनलोड केलं की सतत जाहिरातींचा मारा सुरू होतो. काही वेळा या जाहिराती चुकीची माहिती देणाऱ्या, चुकीच्या साइट्सच्याही असू शकतात. त्यामुळे असे अ‍ॅप्स लगेच फोनमधून काढून टाका. कारण अशा अ‍ॅप्समुळे तुमचा फोन आणि तुम्ही धोक्यात येऊ शकता.

२) एखादं अ‍ॅप तुम्हाला खूप भारी वाटत असेल, पण तुमच्या आई-बाबांनी ते डाऊनलोड करायला परवानगी दिली नाही तर त्यांच्याशी भांडू नका. वाद घालू नका. उलट ते नाही का म्हणतायेत हे विचारा. त्यात काय धोका आहे ते विचारा. आई-बाबा नाही म्हणतात त्याला काही कारण असतं ते समजून घेऊ या, नाही का!

३) तुम्ही जे काही डाऊनलोड करणार आहात त्याची माहिती आई-बाबांना असली पाहिजे. आपण जे काही बघू ते छान, माहिती देणारं, चांगलं मनोरंजन करणारं आहे ना, याची खात्री करून घ्या. हातात गॅजेट आहे त्याचे फायदे आहेत तसे तोटेही, त्यामुळे आपण फायद्यांचाच विचार केला पाहिजे.

 

मित्र-मत्रिणींनो, तुम्ही १३ वर्षांच्या स्पर्श शहाचा व्हिडीओ नक्की बघा. मी त्याची लिंक देतेच आहे. स्पर्श स्वत: उत्तम गाणी लिहितो, गातोही. जन्मत: त्याला ब्रिटल बोन्स नावाचा आजार होता. म्हणजे जन्मत: त्याच्या शरीरातली १३० हून अधिक हाडं मोडलेली होती. अतिशय वेदनादायी अशा या आजारातूनही हा तुमच्यासारखाच चिमुकला सावरला आणि आज तो त्याच्या गाण्यांतून, भाषणांतून लहानांबरोबर मोठय़ांनाही प्रेरणा देत असतो. त्यांचे व्हिडीओज तुम्हाला यूटय़ूबवर बघायला मिळतीलच. शिवाय ही https://www.youtube.com/watch?v=bC0hlK7WGcM लिंकही वापरू शकता.

muktaachaitanya@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 3:43 am

Web Title: alexa and katie
Next Stories
1 पावसाळी बर्गर
2 शाळेची गंमत..
3 हितशत्रू : ‘एवढंच?’
Just Now!
X