थंडीचे दिवस होते. परिसर बर्फाने आच्छादलेला होता. इंग्लंडमधील त्या लहानशा कौंटीमध्ये एडवर्ड नावाचा एक दहा-बारा वर्षांचा मुलगा त्याच्या आईबरोबर राहायचा. वर्षांतले आठएक महिने तर त्याच्या गावात नुसता बर्फ आणि पाऊसच पडायचा.

ख्रिसमसचा सण जवळ येऊन ठेपला होता. त्यामुळे आज गावात भरणाऱ्या आठवडी बाजाराची रंगत काही निराळीच होती. तिथे एडवर्डच्या आईचा स्टॉल होता. मदतीला एडवर्डही होता. कसलातरी विचार करीत स्टॉलमधून बाहेर येताना तो पुढे चालणाऱ्या एका आजीबाईला जोरात धडकला. त्या आजीच्या हातामध्ये एक टोपली होती, ज्यात काचेच्या लहान-मोठय़ा बरण्या होत्या. त्यातल्या काही खाली पडून फुटल्या. काही इकडे-तिकडे घरंगळत गेल्या. आजीलाही मार लागला. ती धप्पकन खालीच बसली.

‘‘दिसत नाही का रे तुला?’’ आजी खेकसली.

‘‘सॉरी! मी खरंच नाही पाहिलं तुला.’’ एडवर्ड उरलेल्या बरण्या पटापट टोपलीमध्ये भरत म्हणाला.

‘‘झालेल्या नुकसानीची भरपाई करून दे.’’ आजी जवळजवळ त्याच्यावर ओरडलीच.

‘‘माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत. पण तू सांगशील ते काम करून मी नुकसानभरपाई करून देईन.’’ एडवर्डने तिला मदतीचा हात दिला. आजी त्याच्या मदतीने हळूहळू उभी राहिली. ती कमरेत चांगलीच वाकली होती, पण एरवी धष्टपुष्ट होती. डोक्यावर बांधलेल्या स्कार्फमधून तिचे पांढरे केस डोकावत होते.

‘‘ठीक आहे. मग चल माझ्या स्टॉलवर. माझा माल विकायला मला मदत कर.’’ एडवर्डकडे दुसरा पर्यायच नव्हता. आईला घडलेला सर्व प्रसंग सांगून तो आजीबरोबर तिच्या स्टॉलच्या दिशेने गपगुमान चालू लागला.

बाजारामध्ये एका कोपऱ्यात आजीचा मार्मलेड, जाम, टॉफी वगैरेंचा स्टॉल होता. त्या पदार्थानी भरलेल्या तिच्या लाल, पिवळ्या, केशरी बरण्या अगदी आकर्षक दिसत होत्या. गिऱ्हाईकांना ‘टेस्ट’ करण्यासाठी तिने सगळे पदार्थ ‘पेपर-कप्स’मधूनही भरून ठेवले होते. जो तिचा पदार्थ एकदा चाखून पाही, तो तिच्याकडून किमान दोन तरी बरण्या नक्कीच घेऊन जाई. म्हणता म्हणता संध्याकाळपर्यंत आजीचा सगळा माल संपला. नफाही भरपूर झाला. दिवसभरात एडवर्डने आजी सांगेल तशी तिला अगदी मनापासून मदत केली.

संध्याकाळी बाजार संपल्यावर आजीने एडवर्डला उरलेलं सामान तिने आणलेल्या हातगाडीवर चढवायला सांगितलं. ‘‘आजी, तुला इथे आधी कधीच पाहिलं नव्हतं.’’ एडवर्ड उत्सुकतेने म्हणाला.

‘‘जास्त चौकशी करू नकोस. ती हातगाडी घेऊन चल माझ्या घरी.’’ आजी पुन्हा खेकसली.

दोघे निघाले. वाटेत एडवर्डचं घर लागलं. त्याला खरं तर घरी जायचं होतं, पण आजीला काही विचारण्याची त्याला हिंमतच होत नव्हती. त्याच्या घरापासून पाच-सहा गल्ल्या सोडून आजी एका अरुंद गल्लीत वळली. गल्लीच्या शेवटी एक ‘गेट’ होतं. आजीने ते उघडलं तर पलीकडे भरपूर झाडांमध्ये दडलेली एक टुमदार बंगली होती. गेटमधून शिरताच एडवर्डला विविध फळांचा एक अलौकिक मिश्र सुगंध आला. स्ट्रॉबेरी, संत्रे, सफरचंद अशा बऱ्याच फळांनी गच्च भरलेली झाडं तिथे होती. इतक्या थंड प्रदेशात एवढी हिरवळ पाहून एडवर्डला विलक्षण आश्चर्य वाटलं.

आजीने बंगलीचं दार उघडलं. दोघे स्वयंपाकघरात आले. तिथेही भरपूर रंगीबेरंगी बरण्या सुबकपणे रचल्या होत्या. आजीने त्याला एका बरणीतलं ऑरेंज मार्मलेड आणि ब्रेड खायला दिला. दिवसभरात एडवर्डने काहीच खाल्लं नव्हतं. आजीच्या या अचानक प्रेमळपणाचं त्याला नवल वाटलं.

‘‘आहाहा! मस्त!’’ काही क्षण एडवर्ड त्या स्वर्गीय चवीमध्ये हरवला.

‘‘माझ्या आईचाही मार्मलेड जाम बनवण्याचा व्यवसाय आहे. पण त्यांना या चवीची सर नाही. तुझ्या बागेत आहेत तशी फळंही आम्हाला कधी मिळत नाहीत. पण इतक्या थंड प्रदेशात ही सगळी फळं तू उगवतेस तरी कशी?’’ एडवर्डचा आवाज थोडा उदासवाणा झाला.

तेव्हा आजीने एक झक्कासपैकी गिरकी घेतली. तशी वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि भरपूर धूळ उडाली. एडवर्डने मटकन् डोळे मिटले. त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर ती आजीबाई नसून उभी होती एक सुंदर, नाजूकशी परी! तिचे लांबसडक काळेभोर केस वाऱ्यावर डोलत होते. तिने चंदेरी गाऊन परिधान केला होता. तिला चिमुकले रूपेरी पंख होते. चंद्रकिरणांत तिचा चंदेरी मुकूट लखलखत होता.

‘‘मी प्रिन्सेस मायरा. दूर ताऱ्यांमध्ये वसलेल्या एका परीराज्याची मी राजकुमारी.’’ एडवर्ड डोळे विस्फारून तिच्याकडे पाहतच राहिला. तो खूप घाबरलाही होता.

‘‘मला माझ्या विमानात बसून पृथ्वीचा फेरफटका मारायला खूप आवडतं.’’ मायरा तिच्या हातांची बोटं हवेत फिरवत म्हणाली. त्याबरोबर बाजारातून आणलेल्या त्या हातगाडीचं रूपांतर एका ताऱ्यांनी जडलेल्या पांढऱ्याशुभ्र विमानात झालं.

‘‘यावेळी माझं विमान नेमकं तुझ्या गावात उतरलं. काल रात्री फेरफटका मारताना तुझं आणि तुझ्या आईमधलं संभाषण माझ्या कानावर पडलं. तुम्हाला पैशांची खूप अडचण आहे, मालाची विक्री होत नाहीये. नवा माल आणायला पैसे नाहीत. घराचं भाडंही थकलंय. मग म्हातारीचा वेश करून मी तुमच्याबद्दल गावात माहिती मिळवली. तुम्ही दोघे किती मेहनत घेता हे समजलं. तेव्हाच मी ठरवलं की तुम्हाला मदत करायची. आज मार्केटमध्ये तुझं काम स्वत: बघून मी हे पक्कं करून टाकलं. एरवी मी अशी नुसती कुणाचीच मदत करत नाही.’’

‘‘ही बंगली, झाडं यापूर्वी मी इथे हे कधीच पाहिलं नव्हतं.’’ एडवर्डने विस्मयाने विचारलं.

‘‘तेसुद्धा मी माझ्या जादूने तयार केलंय,’’ असं म्हणत मायराने पुन्हा हातांची बोटं हवेत फिरवत एक मोठी टोपली प्रकट केली आणि ती एडवर्डकडे दिली.

‘‘ही एक जादूची टोपली आहे. जेव्हा तुला मार्मलेड, जाम वगैरे बनवायला फळं हवी असतील तेव्हा ती किती पाहिजेत त्याचा आकडा तू या टोपलीमध्ये रात्री झोपण्यापूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी ती टोपली तुला मालाने भरलेली मिळेल. त्यांच्यापासून बनलेल्या पदार्थाची चव अशीच स्वर्गीय असेल. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. फक्त एकच अट आहे की, जेवढं पाहिजे तेवढंच मागायचं. कसलीही हाव नको. नाही तर ती टोपली एकदम सर्वसाधारण टोपली बनून जाईल. कबूल?’’ एडवर्डने होकारार्थी मान डोलावली.

मायरा छान हसली. तिने पुन्हा एक गिरकी घेतली आणि तिच्या विमानात बसून ती नाहीशी झाली. तिच्याबरोबरच तिथली बंगली, झाडं, फळं सगळंच गायब झालं. आता त्या जागी फक्त बर्फच बर्फ होता. एडवर्ड ‘आ’ वासून समोर घडणाऱ्या चमत्काराकडे बघत राहिला. सावरल्यानंतर तो धावत घरी गेला आणि त्याने आईला सगळं सविस्तर सांगितलं.

त्या रात्री झोपण्याआधी दोघांनी त्या जादूई टोपलीमध्ये शंभर संत्र्यांच्या ‘ऑर्डर’ची चिठ्ठी लिहून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखरच ती टोपली तेवढय़ा संत्र्यांनी भरलेली होती. दोघे खूश झाले. काही दिवसांतच त्यांचं ‘ऑरेंज मार्मलेड’चं पहिलं उत्पादन तयार झालं. तसंच त्यांनी स्ट्रॉबेरी, मिक्स फ्रूटचे जामही बनवले.

ख्रिसमसच्या दोन दिवस आधी भरलेल्या आठवडी बाजारात एडवर्ड आणि त्याच्या आईने पुन्हा त्यांचा स्टॉल लावला. यंदा छान विक्री झाली. एडवर्ड आणि त्याच्या आईसाठी हेच मोठं ख्रिसमस गिफ्ट होतं.

दुपारी बाजारात माल विकून झाल्यावर फेरफटका मारताना त्याच पूर्वीच्या कोपऱ्यात एडवर्डला ती आजी वेगवेगळ्या खेळण्यांचा स्टॉल लावून बसलेली दिसली. आजीनेही त्याच्याकडे पाहिलं आणि हसली. दोघांनी लांबूनच एकमेकांना ‘थम्स-अप’ केलं..

mokashiprachi@gmail.com