रमजान ईद काही दिवसांवर आली तशी शबानाची गडबड सुरू झाली. घराची साफसफाई, कपडे धुणे, जाळी-जळमटं काढणं.. रेश्मा या कामात मदत करत होती. रेहाना लहान असल्याने तिची काही मदत होत नसे. चुण्यात हिरवा रंग घालून घराला आतून-बाहेरून रंग देऊन झाला. हातात जे काही पैसे होते ते खर्च झाले होते. मुलांना सालाबादप्रमाणे कुणीतरी दिलेल्या कपडय़ांवर भागवावं लागणार होतं. रेश्माला असे जुने कपडे घालणं जीवावर येई. ‘‘आम्मे, मजे ऐसे जुने कपडे नको गे देते जाऊ. मजे नै पसंद. लोगां कायकू ऐसे जुने कपडे देते?’’

शबानाकडे याचं उत्तर नसायचं. खैरात म्हणून काही लोक जुने कपडे देत. आता रेश्माला कसं सांगणार, की नवे कपडे घेणं आपल्याला परवडत नाही. ती गप्प राहायची. ईद चार दिवसांवर आली तशी शबाना अस्वस्थ झाली. ईदचा बाजार आणायचा होता. तिच्या दूरच्या एका खालाने रेश्मा अन् रेहानासाठी कपडे दिले होते. त्याची चिंता नव्हती. पण शिरखुम्र्याचं काय? काजू, बदाम नाही घातले तरी किमान बेदाणे, खोबरं, शेवया तर घालाव्या लागतील. हे सामान कसं आणायचं?

‘‘आजी सुनो तो, ईद के सामान का क्या करने का?’’ शबाना नवऱ्याला म्हणाली.

‘‘उधार आनुया.’’ शबाना या उत्तरावर गप्प झाली. आपल्याला कुणीही उधार देणार नाही हे तिला माहिती होतं.

तिची चिंता वाढत चालली होती. रेश्मा तिची तगमग बघत होती.

‘‘आम्मे, ये ईद नै आई तो अच्छा हुईंगा ना गे?’’

‘‘क्यू री मरी, क्या हुया?’’

‘‘आगे देक तो, अभी अपने पास शिरखुर्मे का सामान लाने पैसे नै, कां से लाने के पैसे?’’

शबाना चिडली. रेश्माचा हा नेहमीचा चोंबडेपणा तिला आवडायचा नाही. ‘पोर फार गुणाची आहे, पण तोंडाचा पट्टा वाईट..’ असं ती नेहमी रेश्माविषयी बोलायची.

मेहमूदने मालकाकडे ईदसाठी पैसे मागितले. मालकाने स्पष्ट नकार दिला. मेहमूद म्हणजे रेश्माचे अब्बा. रेश्मा सर्व पाहत होती. आता तिला राहवेना. तिच्या काही ओळखीच्या घरी तिने ईदसाठी घर धुण्याचं, कपडे धुण्याचं काम करून दिलं. खूश होऊन त्यांनी तिला जास्तीचे पैसे दिले. पण तेवढय़ाने काही होणार नव्हतं. तेव्हा तिने आपले साठवलेले पैसे बाहेर काढले. सगळे मिळून ४०० रुपये झाले. एवढय़ात सामान येईल की! ती मनोमन खूश झाली. तिने पैसे अम्मीच्या हाती दिले. अम्मीजवळचे काही पैसे मिळून सामान आणायला दोघी मिळून गेल्या. गल्लीतल्या चार ओळखीच्या लोकांना बोलवायचं म्हणून रेश्मा सगळ्या गल्लीत निरोप देऊन आली. दूध, साखर, शेवया, बदाम, खोबरं, बेदाणे, डालडा सगळं सामान आणून झालं. अम्मीने रेश्माच्या केसातून हात फिरवला.

‘‘लई गुनाकी हाय मेरी लाडो.’’ असं म्हणून तिने दोन्ही हात कानशिलावर नेऊन कडाकडा बोटं मोडली. रेहाना खूश होती. या वर्षी तिला बदाम खायला मिळाले होते. ईदचा दिवस उगवला. नमाज झाली अन् सगळ्या गल्लीत एकमेकांना भेटायला लोकांची गर्दी झाली. रेश्मा आलेल्यांना पाणी, शिरखुर्मा देत होती. तिला आज खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं. अम्मी आल्या-गेल्याजवळ तिचं कौतुक करत होती.

बघता बघता दिवस मावळला. मगरीबची Aजान झाली. नमाज पढून अम्मीने दोन्ही मुलींना जवळ बोलावलं.

‘‘हात आग्गे करो.’’

दोघींनी हात पुढे केला. अम्मीने दोघींच्या हातावर ५०-५० रुपयाच्या नोटा ठेवल्या.

‘‘ये कैकू गे आम्मे?’’

‘‘Bद्दी है रे लाडो.. ईद के दिन बडे लोग बच्चों को देते रहते. आमी आई-बाप म्हणून एवढंच देऊ  शकतो.’’ असं म्हणून Aम्मीने डोळ्याला पदर लावला.

रेश्माने उठून अम्मीची पापी घेतली.

‘‘आम्मे, मौलाना बोले.. मोठय़ा माणसांनी दिलेली चीज ही त्यांची दुआ असते. ती सगळयात मोठी असते. आम्मे, ये तेरी दुआ है. ईद की दुआ. अब रोने का नै.’’

छोटय़ा  रेहानानेही अम्मीला पापी दिली. अम्मी खुदकन् हसली.

तिने दोघींना आपल्या मिठीत घेतलं अन् पटापट त्यांचे पापे घेत राहिली.

farukskazi82@gmail.com