14 December 2017

News Flash

हिरवा चाफा

‘‘लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?’’

भरत गोडांबे | Updated: October 8, 2017 2:34 AM

‘‘लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?’’

बालमित्रांनो, या गाण्याच्या ओळी कदाचित तुम्ही ऐकल्या नसतील, पण तुमच्या आई-वडिलांना किंवा आजोबा-आजींना विचारलंत तर ते नक्की तुम्हाला सांगतील. या ओळी अक्षरश: खरे करणारे हे सुगंधी फूल म्हणजे- ‘हिरवा चाफा’.

हिरवा चाफा ही वेलवर्गीय सदाहरित वनस्पती असून ती भारतातील सदाहरित तसेच निमसदाहरित पट्टय़ात आढळते. याचे शास्त्रीय नाव Artabotrys hexapetalus (अर्टाबॉट्रस हेग्झापेटालस) असे आहे.

हिरव्या चाफ्याच्या वेलीला वर्षभर फुले येतात. परंतु पावसाळ्यात विशेष बहर येतो. फूल आधी हिरव्या रंगाचे असते. त्यामुळे ते हिरव्यागार पानांमध्ये चटकन दिसून येत नाही. पाकळ्यांचा रंग काही दिवसांनी बदलतो आणि तो पिवळा होतो. हिरव्यागार पानांत ही पिवळीधम्मक फुले खूप शोभून दिसतात. या फुलाला खूपच मनमोहक सुवास असतो. काहीसा गोडसर असणारा हा सुगंध मनाला प्रसन्नता प्रदान करतो. तसेच वातावरण उल्हसित करतो. फुलाला सहा पाकळ्या असतात. पाकळ्या काहीशा मांसल असतात. फुलामध्ये पाकळ्यांची रचना फार सुंदर असते. दोन रिंगपैकी पहिल्या रिंगमध्ये तीन पाकळ्या असतात आणि दुसऱ्या रिंगमध्ये तीन पाकळ्या असतात. पहिल्या रिंगच्या दोन पाकळ्यांच्या मध्ये दुसऱ्या रिंगची पाकळी असते. फुले जमिनीकडे तोंड करून लटकलेली असतात. फुलांना खूप मनमोहक असा सुगंध येतो. त्यामुळेच याचा वापर सुगंधी तेल व ऊदबत्ती बनविण्यासाठी केला जातो. पुष्पौषधीमध्ये देखील फुलांचा वापर करतात. या पाकळ्यांचा चहादेखील केला जातो. इतर औषधांमध्ये देखील त्याचा वापर करतात.

फूल गळून पडले, की त्या ठिकाणी फळांचा घोस लगडतो. फळे साधारण मध्यम आकाराच्या बोराइतकी असतात. फळे हिरवी आणि पक्व झाली, की ती पिवळसर होतात. त्यांना गोड सुगंध असतो. प्रत्येक फळाच्या फुलाच्या आत एक बी असते. फळे आपण खात नाही. पण माकडे तसेच पक्षी ही फळे खातात. बियांपासून नवीन झाडांची निर्मिती करता येते.

पाने गर्द हिरव्या रंगाची असून त्यांचा वापर औषधात केला जातो. वेलीला आधारासाठी हुकासारखा भाग असतो. तो हूक दुसऱ्या झाडावर अडकवून वेल वाढते. वेलीची उंची जास्तीत जास्त २० मीटपर्यंत असू शकते. या हुकांचा मासे पकडण्यासाठी गळ म्हणून देखील वापर करता येतो.

वेलीची वाढ होत असताना बुंध्याकडील भाग जाड होत जातो, त्यामुळे ही वेल मजबूत होते. हिरव्या चाफ्याचा सुगंध असलेली अगरबत्ती, अत्तरे खूप लोकप्रिय आहेत. पुष्पौषधीमध्ये देखील या फुलांचा वापर होतो. शोभेची वनस्पती म्हणून याची लागवड केली जाते.

आपल्या सुंदर रूप, रंग आणि सुगंधाने सगळ्यांना भुरळ घालणारा हा हिरवा चाफा आपापल्या सोसायटी, शाळा परिसराची शोभा वाढवण्यासाठी आपल्या हरितधनात आजच सामील करून घ्या.

– भरत गोडांबे

bharatgodambe@gmail.com

First Published on October 8, 2017 2:34 am

Web Title: articles in marathi on artabotrys hexapetalus