रूपाली ठोंबरे

‘‘अरे, तो बघा ओम. तोपण आला वाटतं. ए ओम, तूपण ये ना!’’

रोहितने मदानात जाणाऱ्या ओमला बोलावलं. ओमसुद्धा लगेच हात दाखवून धावत त्या घोळक्यात मिसळून गेला. सायली, रोहित, समीक्षा आणि ओम अशी चौकडी आज खूप दिवसांनी एकत्र आले होते. नुकतीच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि ती सर्वानीच मजेत घालवली होती. पुन्हा तोच अभ्यास सुरू झाला होता. सुट्टी संपल्याची खंत आणि सुट्टीतल्या गमतीजमती त्या सर्वाच्या गप्पागोष्टींमध्ये व्यक्त होत होत्या.

‘‘मी तर संपूर्ण सुट्टीभर मामाकडे गेले होते. आणि तिथेच खूप मज्जा केली आम्ही. दिवाळीच्या सणासोबतच गावी राहायची मौज काही निराळीच. मामीनं कित्ती फराळ केला होता! खूपच.’’

सायली अगदी हावभाव करत सर्वाना एकेका पदार्थाचं वर्णन करून सांगत होती. मग इतरांनीही आपल्या गमतीजमती सांगण्यास सुरुवात केली. ते सांगता सांगता रोहित म्हणाला, ‘‘मी तर खूप सारे फटाके फोडले. फुलबाज्या, पाऊस, चक्र आणि अजून काय काय..’’

‘‘अरे, पण त्यानं तर प्रदूषण होतं ना रे? माझी आई सांगते की, फटाके नाही फोडायचे. त्याने त्रास होतो. आणि मूकप्राण्यांना तर अजिबात त्रास द्यायचा नाही. मी पाहिलं दादा, तू त्या दिवशी आपल्या मोतीच्या शेपटीला फटाका बांधून कसा त्रास देत होतास ते. बरं झालं, जोशीकाकांनी ते पाहिलं आणि बिचारा मोती वाचला.’’

ओमने रोहितची चूक सर्वासमोर अशी निदर्शनास आणली आणि त्याला रोहितदादाच्या रागाला सामोरं जावं लागलं. हे आधी माहीत असूनसुद्धा ओम मोठय़ा हिम्मतीनं त्याच्या चुकीच्या कृत्याबद्दल बोलून दाखवत होता, याचं सायली आणि समीक्षा दोघीनांही कौतुक वाटत होतं. पण रोहितचा राग दूर कारण्यासाठी सायलीनं लगेच विषयांतर केलं.

‘‘अरे ओम आणि समीक्षा तुम्ही दोघं तर इथेच होतात ना? तुम्ही काय केलं या सुट्टीत? खूप कंटाळला असाल ना इथेच राहून?’’

‘‘हो इथेच होतो. पण आम्ही तर खूप काही केलं. तुम्हाला पाहायचं आहे का ते?’’

ओम लगेच एक उडी मारून समोर आला.

‘‘पाहायचं म्हणजे? तुम्ही असं काय केलं जे पाहायला मिळणार?’’ -रोहित.

‘‘घरी चला, मग दाखवतो तुम्हाला.’’ असे म्हणत ओम पुढे चालू लागला आणि त्यामागोमाग सायली, समीक्षा आणि रोहीतसुद्धा ओमच्या घरी पोहोचले. ओमच्या आईनं सर्वाचं गार सरबत आणि फराळ देऊन स्वागत केलं. ओमनं धावत पळत आत जाऊन एक मोठी वही आणली. मुखपृष्ठावर एक मोठ्ठं झाडाचं चित्र होतं. फुलांनी बहरलेलं ते झाड हसत होतं.. काही तरी बोलत आहे असा भास होत होता. त्याचं शीर्षक होतं- ‘नवा मित्र’.

‘‘वाह.. हे काय आहे गं समीक्षा? नवा मित्र?’’

सायलीनं उत्सुकतेनं विचारता विचारता त्या वहीची पानं उलटवण्यास सुरुवात केली. त्यातली माहिती, चित्रं पाहून तीही प्रभावित झाली. रोहितनंसुद्धा उत्सुकतेनं वहीत डोकावलं.

‘‘तुला शाळेत प्रोजेक्ट बनवायला सांगितला होता का?’’

‘‘नाही नाही. हा फक्त समीक्षादीदीचा नाही, माझापण प्रोजेक्ट आहे.’’

ओमच्या या उत्तरामुळे रोहित आणि सायली या दोघांच्याही चेहऱ्यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.

‘‘सायली, रोहित हो. हा आम्ही दोघांनी मिळून बनवलेला ओमचा प्रोजेक्ट आहे. पण शाळेतून बनवायला नाही सांगितलं असं काही. आमचा आम्हीच केला.’’

समीक्षाच्या प्रश्नावर रोहितकडून अगदी अपेक्षित प्रतिप्रश्न विचारला गेला.

‘‘तुम्हीच? का?’’

‘‘दिवाळी सुरू होण्यापूर्वी हा ओम एके दिवशी फटाकेच हवेत म्हणून खूप खूप रडला. अगदी हट्टच केला होता. तेव्हा आईनं ओमला समजावताना फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. तेव्हा ‘प्रदूषण’ हा एक नवा शब्द ओमच्या शब्दकोशात जमा झाला आणि त्याबद्दल माहिती मिळवण्यास त्याने सुरुवात केली. असे नवे काही शोधायचे आणि शिकायचे हा तर आमच्या ओमचा आवडता छंद. असे काही शोधण्यातही मज्जा येते रे. मग मीपण त्याला मदत करू लागले. तेव्हा मोठय़ांकडून, काही पुस्तकांमधून, बाबांचा कॉम्प्युटर घेऊन गुगलमधून आम्ही दोघांनी प्रदूषणाबद्दल- त्याची कारणे, ते थांबवण्यासाठी करता येणाऱ्या उपायांबद्दल बरीच माहिती मिळवली. ती पाहून आईनं आम्हाला ही माहिती लिखित स्वरूपात संकलित करून ठेवण्याची कल्पना सांगितली आणि आम्हाला आवडली ती संकल्पना. म्हणूनच आईनं खास ओमसाठी ही रंगीत पानांची वही आणून दिली.’’

समीक्षा उत्साहाने ती सर्वासमोर दाखवत होती. सर्व जण मिळून ओमचं कौतुक करत होते, ते पाहून मग ओमलाही खूप आनंद झाला. त्यानेसुद्धा समीक्षा दीदीसोबत प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती पुरवण्यास सुरुवात केली.

‘‘हे सर्व शोधत असताना मी कधी अभ्यास करतो आहे असं वाटलंच नाही. उलट गंमत वाटत होती. रंगीत पानांवर गोळा केलेली भली मोठी माहिती संक्षिप्त स्वरूपात लिहिणं हे तर महाकठीण. पण दीदीनं मदत केली त्यात. हे करताना खूप सारी नवी चित्रं, नवे शब्द शिकलो मी. प्रत्येक नव्या धडय़ासोबत काही नवे शिकायला मिळत होतं. रात्री जेवल्यावर त्यातली गंमतजंमत आई-बाबांना सांगताना खूप मज्जा यायची. आणि बरं का, त्यामुळे मला रोज शाबासकीसुद्धा मिळायची.’’

सायली आणि रोहित कुतूहलानं हे सर्व ऐकत होते.

‘‘खूप छान कल्पना आहे रे ही तर. मलाही असंच काही तरी करावंसं वाटत आहे. पण आता वेळच नाही.’’ रोहित दु:खी होत म्हणाला. त्यावर समीक्षानं त्याला समजावलं, ‘‘अरे रोहित, या सुट्टीत नाही करता आलं तर काय झालं. पुढच्या सुट्टीत कर ना. आणि सुट्टीतच कशाला, इतर दिवसांत रोज थोडा वेळ देऊनही असं काहीतरी नक्कीच साध्य करता येईल. फारफार तर १० दिवसांत होणारा प्रोजेक्ट दोन महिन्यांत पूर्ण होईल. पण एक नवे ध्येय पूर्ण झाल्याचं समाधान आणि आनंद मिळेल. त्यासाठी फक्त एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास हवा. आणि हो रोहित, अजाणतेपणी होणाऱ्या चुका तू पुढच्या वेळी नक्कीच सुधारू शकतोस. जसे, त्या मूकप्राण्याला नको रे पुन्हा असा त्रास देऊस.’’

रोहितने शरमेने होकारार्थी मान हलवली आणि पुढच्याच क्षणी प्रोजेक्ट पाहता पाहता रोहितच्या मनात घोंगावत असणारा एक प्रश्न त्यानं चटकन् विचारून विषय बदलण्यात यशस्वी झाला.

‘‘अरे ओम, पण तुझ्या प्रोजेक्टचं नाव ‘नवा मित्र’ असं का आहे?’’

‘‘हा एक छान प्रश्न आहे रोहित. कारण या प्रोजेक्टमुळेच आम्हाला आमचा एक नवा मित्र मिळाला आहे म्हणून.’’

‘‘नवा मित्र? कोण?’’

समीक्षाच्या स्पष्टीकरणावर रोहितला असा प्रश्न न पडेल तर नवलच ना?

‘‘ही माहिती मिळवताना आम्हाला झाडांचं महत्त्व समजलं. प्रदूषणयुक्त हवा घेऊन प्राणवायू देणाऱ्या झाडांबद्दल एक विशेष आपुलकी मनात निर्माण झाली आणि त्याच आपुलकीतून आम्ही एक रोपटं बागेत लावलं. सुरुवातीला किती इवलंसं होतं ते. त्याची तांबूस पानं आमच्याशी हवेच्या तालावर संवाद साधायची आणि मग एक गट्टी जमली त्याच्यासोबत. आज बरोबर आठ दिवस झाले असतील त्याची संगत होऊन. हो की नाही ओम?’’

‘‘हो हो. तो माझा सर्वात प्रिय मित्र आहे.’’

‘‘किती छान, मलाही असे मित्र हवे आहेत.  मीपण असा एखादा मित्र जरूर माझ्या घरी आणेन. एखादा गुलाब किंवा चाफा किंवा प्राजक्त.. कसं वाटेल?’’ सायली असं म्हणाली आणि त्यापाठोपाठ रोहितदेखील सामील झाला.

‘‘आणि मीपण. पण मी ना असे फुलांचे झाड नाही लावणार. मी आंब्याचं झाड लावेन, म्हणजे काही दिवसांत मी आंबे खाऊ शकेन.’’

हे ऐकून सारे हसायला लागले. सर्वाकडे चिडून प्रश्नार्थक मुद्रेने पाहणाऱ्या रोहितला उद्देशून समीक्षा म्हणाली, ‘‘अरे रोहित, फळं किंवा फुलं काही अशी लगेच मिळत नाहीत. त्यासाठी आधी त्या झाडाला जोपासावं लागतं. खत, पाणी, हवा, ऊन अशा अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. मग जाऊन ते झाड आपल्याला फळे, फुले, आधार सर्व सर्व देतात. आणि तुझ्या झाडाला आंबे लागायला तर अजून खूप वष्रे लागतील. पण तरी तू झाड मात्र नक्की लाव. त्या झाडाची फळं चवीच्या आनंदासोबत एक वेगळंच समाधान देतील.’’

सर्वाना ते पटलं. इतक्यात ओम एक बाटली भरून पाणी घेऊन आला.आणि ते सर्व जण ओमच्या नव्या मित्राला भेटण्यासाठी बागेच्या दिशेने घराबाहेर पडले.