शकुंतला मुळ्ये

संध्याकाळचे सहा वाजलेले. दोनदा बेल वाजली, म्हणजे नक्की बाबाच असणार. ‘बाबा आऽऽले’ म्हणत बिट्टने धावत जाऊन दरवाजा उघडला. दरवाजात वसंतकाका- बाबांचे मित्र-  होते. त्यांच्याबरोबर त्यांचा बिट्टएवढाच मुलगा. ‘काका, या ना आत.’ बिट्ट म्हणाला. एवढय़ात बिट्टची आई बाहेरच्या हॉलमध्ये आली. तिने वसंतकाकांना बसायला सांगितलं. खाणं, चहापाणी झालं. बिट्टच्या आईने थोडी विचारपूस केली. ‘बिट्टचे बाबा येतीलच एवढय़ात,’ असं म्हणून ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

वसंतकाका साताऱ्याला राहतात. अधूनमधून ते कामासाठी मुंबईला येतात तेव्हा एखादी रात्र बिट्टकडेच असतात मुक्कामाला. बिट्टला हे काका फार आवडत. ते त्याच्याशी खूप गप्पा मारत. त्याच्यासाठी आठवणीने खारे शेंगदाणे आणत. बिट्टबरोबर खेळतसुद्धा. पण त्यांचं काम होऊन वेळ उरला तर! ‘काका, खूप दिवस राहा ना आमच्याकडे. शिवाय येताना तुमच्या किशोरलाही घेऊन या ना. आम्ही दोघे खूप मजा करू,’ असं तो दरवेळी  काकांना सांगे. तेही हसून ‘हो हो, आणीन हं नक्की.’ असं म्हणत.

तर या वेळी त्यांनी किशोरला आणलं खरं, पण काका आज नेहमीसारखे त्याच्या डोक्यावर टपली मारून हसले नाहीत. ‘काय बिट्टराव, आज काय खेळू या?’ असंही म्हणाले नाहीत. फक्त ‘हा आमचा किशोर. दोघांनी खेळा आता.’ असं ते म्हणाले, तेवढय़ात दरवाजा उघडून बिट्टचे बाबा आत आले. वसंतकाका बाबांशी हळू आवाजात इंग्रजीत बोलले काहीतरी. दोघांचे चेहरे गंभीर झाले. बिट्टला समजलं की, काहीतरी वेगळं आहे आज; कारण तिथेच रेंगाळणाऱ्या बिट्टला बाबा म्हणाले, ‘बिट्ट, तू नि किशोर थोडा वेळ गॅलरीत खेळा. काकांचं महत्त्वाचं काम आहे. नंतर बोलतो तुझ्याशी.’

बिट्टला खूप आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे बाबा आजच त्याच्यासाठी एक गंमत आणणार होते. काय आणणार ते त्याच्यासाठी सरप्राईज होतं. बाबा विसरले की काय! ‘पण बाबाऽऽ’ बिट्ट पुढे बोलणार तेवढय़ात कधी नव्हे ते आईनेही म्हटलं, ‘बाबांनी सांगितलं ते कळलं नाही का तुला? जा, दोघे खेळा जा बाहेर.’ किशोरला घेऊन बिट्ट मुकाटय़ाने गॅलरीत गेला.

रात्री जेवायच्या वेळेला बाबा नि काका घरी आले. जेवताना कोणी कोणाशी बोललं नाही. टॅक्सीत बसून बाबा नि काका कुठेतरी जाऊन आले होते, हे बिट्टने खेळताना पाहिलं होतं. बिट्टला कळेचना, काय झालं ते. मग तो काहीतरी गमतीदार बोलून किशोरला हसवत होता. मात्र किशोरही कावराबावरा झालेला.

आईचं स्वयंपाकघरातलं काम आवरल्यावर बिट्टला राहवेना. ‘आई, आज बाबा नि काका बोलत का नाहीत गं नेहमीसारखं?’ आई म्हणाली, ‘बिट्ट, तू शहाणा आहेस ना? अरे, वसंतकाकांच्या आईला ना खूप बरं नाहीये म्हणून इकडे आणून हॉस्पिटलमध्ये ठेवलंय. काळजीत आहेत तुझे काका. त्यांना एकसारखे प्रश्न विचारत बसू नकोस. बाबा कोणत्या स्पेशालिस्ट डॉक्टरांची अपॉईंटमेंट मिळतेय का ते बघायला उद्या सकाळी लवकर जाणारेत काकांबरोबर. तुझी उद्या सकाळची शाळा आहे ना? झोपा आता तुम्ही दोघेही.’

बिट्ट तसा शहाणा आणि समंजस होता. आता बाबांना काही विचारायचं नाही, हे त्याला कळलं. ‘चल रे किशोर, आपण झोपू या माझ्या खोलीत,’ असं म्हणून तो किशोरला बेडरूममध्ये घेऊन गेला. दोघेही झोपले.

कसल्या तरी आवाजाने बिट्टला जाग आली. तो उठला. हॉलमधील टय़ूबलाइट चालू होती. बाबा, काका आणि आई हॉलमध्ये बसून हळू आवाजात काहीतरी बोलत होते. बिट्टला नवल वाटलं. तो हॉलच्या दरवाजाजवळ उभा राहून कान देऊन ऐकू लागला..

बाबा म्हणत होते, ‘अरे वसंता, आम्ही आहोत ना, पैशांची काळजी नको करूस. डॉक्टरांची फी जास्त असली तरी चालेल. मी कसेही करून आत्ता तुला पैसे देतो. आई बरी होणं महत्त्वाचं आहे रे.’

वसंतकाका डोळे पुसत म्हणत होते, ‘तू देशील ही खात्री आहे, पण मी परतफेड कशी करणार? होते नव्हते ते सगळे पैसे आधीच खर्च झालेत. डोक्यावर उगाच कर्ज नकोय मला.’

त्यांच्या पाठीवर थोपटत बाबा म्हणाले, ‘हे बघ, तुझी आई ती माझीही आईच समजतो मी. माझी आई जर असती तर मी नसता का खर्च केला? आणि मैत्री ती काय मग? माझं ऐक. सकाळी मी सगळी रक्कम जमवतो. परतफेडीचं बघू या नंतर.’ वसंतकाका डोळे पुसत होते. एवढय़ात बिट्टची आई म्हणाली, ‘हे बघा भाऊजी, मलाही तुम्ही भावासारखेच आहात. वेळ आली तर माझे दागिनेही विकू. पण आत्ताची वेळ निभावली पाहिजे ना? जास्त विचार नका करू. आम्हा दोघांचं मित्रमंडळ आहे. त्यांच्याकडेही मागता येतील. शिवाय..’

बिट्टला पुढचे बोलणे ऐकू नाही आले. मात्र त्याच्या लक्षात आले की आई-बाबा काकांच्या आईच्या काळजीत आहेत. त्यांच्या आईच्या खर्चासाठी पैसे कमी पडताहेत म्हणून काकांना वाईट वाटतंय. एवढे मोठ्ठे असूनही त्यांना रडायला येतंय. बिट्टच्या चिमुकल्या मेंदूला फक्त एवढंच कळलं. तो गुपचूप आपल्या बेडरूममध्ये परत आला. दरवाजा बंद करून त्याने आपलं छोटं कपाट उघडून आतली ‘पिगी बँक’ची बुडकुली काढली. हळूच ठोकून फोडली. त्यातल्या काही नोटा आणि रुपया-दोन रुपयांची नाणी वेगवेगळी केली. दप्तरातला पेन्सिलचा पाऊच काढून त्यात ठेवली आणि ‘देवा, काकांच्या आईला लवकर बरं कर!’ असं म्हणून तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला लवकर जाग आली. आई, बाबा, काका सगळे उठून चहा पीत होते. बिट्टने ओळखलं, आता निघतील बाबा आणि काका. त्याने धावत जाऊन पैसे ठेवलेला पाऊच आणला आणि तो काकांना म्हणाला, ‘काका, हे घ्या. तुमच्या आईला लवकर बरं करायला देवाला सांगितलंय मी.’ वसंतकाका थक्कच झाले. बिट्टने कसला पाऊच दिलाय, त्यांना कळेना. त्यांनी तो उघडून आतले पैसे पाहिले. ‘अरे बिट्ट, हे पैसे कशाला?’ त्यावर बिट्ट म्हणाला, ‘तुमच्या आईला बरं वाटायला हवं ना? माझे मला खाऊसाठी मिळालेले पैसे आहेत ते. घ्या तुम्ही. डॉक्टरांना द्यायला लागतात ना पैसे, म्हणून..’

खरं तर बिट्ट अवघा सहा वर्षांचा होता. त्याचं हे वागणं बघून बाबा नि काका बघतच राहिले. बाबांनी त्याला जवळ घेऊन म्हटलं, ‘बिटुडय़ा, तुझे पैसे ठेव तुझ्याकडे. आम्ही मोठी माणसं आहोत ना? आम्ही बघू काय करायचं ते. तू आता तयार हो अन् शाळेत जा बघू. आज सकाळची शाळा आहे ना तुझी? आम्ही निघतोय आता. तू शाळेतून आलास ना की बोलतो तुझ्याशी.’

बिट्ट हिरमुसला. आपण आता चांगले पहिलीत गेलोय. तरीसुद्धा बाबा आपल्याला खूप लहान समजतात. विचारू संध्याकाळी. असा विचार करून तो शाळेच्या तयारीला लागला. किशोर शांत झोपलेला होता.

आईला टाटा करून तो शाळेच्या बसमध्ये चढला. बाबा आणि काका हॉस्पिटलमध्ये गेले.

दुपारी तीन वाजता बिट्ट शाळेतून आला; तेव्हा बाबा नि काका आईशी बोलताना दिसले. वसंतकाकांच्या आईला थोडं बरं वाटत होतं. पैशांची व्यवस्था झाली होती. एका डॉक्टरांच्या ओळखीमुळे कमी पैशात काम होणार होतं. आईने त्याला खायला देताना हे सगळं सांगितलं. बिट्टला खूप छान वाटलं. बाबांशी बोलताना काका नेहमीसारखे हसरे दिसत होते.

दुसऱ्या दिवशी कसली तरी सुट्टी होती शाळेला. बिट्ट नि किशोर झोपून उशिरा उठले. स्वत:चं सगळं आवरून तो दूध प्यायला स्वयंपाकघरात आला आणि ओऽऽहो.. बिट्टसाठी तिथे ‘गंमत’ होती. त्याला खूप दिवसांपासून हवी असलेली ‘ट्रायसिकल’! नवी.. कोरी.. बिट्ट एकदम खूश झाला. मऽऽस्त. मज्जाच;’ तो ओरडला.. आणि एकदम लाजला. कारण बाबा, आई, वसंतकाका नि किशोर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

‘बिट्ट, गम्मत आवडली ना तुला?’ बाबांनी विचारलं. बिट्टने मान डोलावून ‘होऽऽ’ म्हटलं. ‘पण बाबा..’ बिट्टने बोलायला सुरुवात करताच बाबा म्हणाले, ‘तुझं खाऊच्या पैशांचं पाऊच आहे ना, त्यात थोडी भर घालून आपण किशोरलाही ट्रायसिकल घेऊ या. कोणता रंग आवडेल तुला किशोर?’’

वसंतकाका आणि किशोर- दोघांनाही काय बोलावं ते सुचेनाच. मग आईच म्हणाली, ‘किशोर तुझा मित्र झालाय ना आता. जा दोघेही बाबांबरोबरच. त्याच्या आवडीचा रंग घेऊन या आणि खेळा.’

वसंतकाकांनी पुढे येऊन बिट्टला जवळ घेतलं. ‘किती शहाणा मुलगा आहेस रे तू! येत्या मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही सगळे साताऱ्याला या. आपण खूप मज्जा करू. आणि हो, तुझे खाऊचे साठलेले पैसे तू आपणहून दिलेस हे तर आम्ही कध्धीच विसरणार नाही. तुझा तो पाऊच तुझ्याकडेच ठेव. हॉस्पिटलमध्ये द्यायला जमवलेले पैसे होते ना, त्यातल्या उरलेल्या पैशांनी किशोरला ट्रायसिकल घेऊ. ठीक ना?’

दोघा मित्रांनी मान डोलावली. ‘वसंतकाकांच्या आईला पूर्ण बरं वाटेपर्यंत त्यांनी आमच्याकडेच राहिलं पाहिजे,’ या अटीवर बिट्टने आपला पाऊच परत घेतला.

lokrang@expressindia.com