16 November 2018

News Flash

फुलांच्या विश्वात : कोरांटी

वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात.

पावसाळ्यात अनेक वनस्पती उगवतात आणि फुलांद्वारे आपल्या रंगांची उधळण करतात. ‘न मुलं न औषधं’ या उक्तीप्रमाणे सगळ्याच वनस्पतींमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. आपल्याला मात्र त्याची माहिती नसते आणि आपण त्याला निरुपयोगी समजून दुर्लक्ष करतो. अशीच एक पावसाळ्यात उगवणारी अत्यंत महत्त्वाची वनस्पती म्हणजे ‘कोरांटी.’

कोरांटी भारतीय वंशाची एक सदाहरित झुडुपवर्गीय वनस्पती आहे. तिची उंची साधारण १.५ मीटपर्यंत असू शकते. कोरांटीच्या आपल्याकडे अनेक प्रजाती आढळतात. या सगळ्या बारलेरिया ((barleria) या जिन्समधील आहेत.

वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात. पिवळी, सफेद, जांभळी, गर्द गुलाबी, तांबडी या वेगवेगळ्या रंगांची फुले येणारी कोरांटी आपल्याकडे आढळते. यातील पिवळ्या आणि गर्द गुलाबी रंगांची कोरांटी जंगलात आढळते. त्यांना काटे असतात म्हणून ‘काटे कोरांटी’ या नावानेदेखील ती ओळखली जाते.

सगळ्याच रंगाच्या कोरांटीची फुले दिसायला अतिशय सुंदर असतात. पाच पाकळ्या असणाऱ्या या फुलाला सुगंध नसतो. परंतु याचे रंग इतके गडद असतात की रंगांमुळे कीटक या फुलांकडे आकर्षित होतात. पिवळ्या रंगाच्या कोरांटीच्या फुलाच्या तळाशी गोड द्रव पदार्थ असतो. फुलात दोन पुंकेसर आणि एक स्त्रीकेसर असतो. ते लांब असल्यामुळे फुलाच्या बाहेर डोकावत असतात.

फिक्कट पिवळी कोरांटी दातदुखीवर गुणकारी असून ती वेगवेगळ्या प्रकारच्या दंतमंजन, टुशपेस्ट तसेच दातदुखीवरील औषधांत वापरली जाते. याची पाने, फुले, खोड, बिया सगळ्याच भागांचा वेगवेगळ्या औषधात वापर होतो. पिवळ्या रंगांची कोरांटी वज्रदंती म्हणूनदेखील ओळखली जाते. ताप, श्वसनाचे विकार, सांधेदुखी यांसारख्या अनेक विकारांत पिवळी कोरांटी गुणकारी आहे.

कोरांटीची पाने गर्द हिरवी आणि आकाराने लहान असतात. ही पानेदेखील औषधात वापरली जातात. जंतुनाशक या गुणामुळे वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये याचा वापर केला जातो. कोरांटीच्या वेगवेगळ्या प्रजातींची शास्त्रीय नावे पुढीलप्रमाणे-

पिवळी कोरांटी-  barleria prionitis

सफेद कोरांटी  barleria cristata

जांभळी कोरांटी  barleria repens

कोरांटीच्या फुलांचे गजरे, वेण्यादेखील केल्या जातात. याच्या सुंदर गडद रंगाच्या फुलांमुळे याची शोभेची वनस्पती म्हणूनदेखील लागवड केली जाते. कोरांटीच्या रोपांची निर्मिती बियांपासनू तसेच छाटकलमाद्वारेही केली जाते. कमी पाण्यात वाढणारी ही वनस्पती असून, कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये ही सहज वाढते.

आपल्या अंगणामध्ये सगळ्या रंगाच्या कोरांटीची रोपे असावीत हे माझं नेहमीचं स्वप्न. गावाकडील मंडळी जैविक कुंपण म्हणूनदेखील याचा विचार करू शकतात. काटे असल्यामुळे जनावरे आत येणार नाहीत आणि सुंदर शोभिवंत फुलेदेखील मिळत राहतील. थोडे पाणी उपलब्ध असेल तर वर्ष- दोन र्वष ही वनस्पती सहज टिकते. शहरातील मंडळी मोठय़ा कुंडीमध्ये हिची लागवड करू शकतात. सध्या जंगल परिसरात कोरांटी फुललेली दिसते. दिवाळीपासून याला फुले यायला सुरुवात होते, ते पुढे मार्च-एप्रिलपर्यंत फुले येतात. तिचं सौंदर्य पाहायला हवं. मग काय बच्चे मंडळी, ही थोडी वेगळी अन् रंगरूपाने सुंदर अशी कोरांटी आपल्या हरित धनात सामील करून घेणार ना!

bharatgodambe@gmail.com

First Published on November 26, 2017 12:17 am

Web Title: barleria prionitis barleria cristata barleria repens