25 February 2021

News Flash

पहाटेची मज्जा

नेहमी नऊ वाजेपर्यंत बिछान्यात लोळणाऱ्या ओमने अशी सुंदर पहाट प्रथमच पाहिली होती.

काळ्या अंधारातून हळूहळू प्रकाशमान होणारे लाल-केशरी सूर्यिबब आणि त्यामागोमाग पालटणारा आकाशाचा रंग ही जणू एखाद्या चित्रकाराने आपल्या ब्रशने साकारलेली जादूच वाटत होती.

रूपाली ठोंबरे – rupali.d21@gmail.com

काल खूप दमल्यामुळे लवकर झोपल्याने आज ओम पहाटे सहा वाजताच उठला. नेहमी नऊ वाजेपर्यंत बिछान्यात लोळणाऱ्या ओमने अशी सुंदर पहाट प्रथमच पाहिली होती. काळ्या अंधारातून हळूहळू प्रकाशमान होणारे लाल-केशरी सूर्यिबब आणि त्यामागोमाग पालटणारा आकाशाचा रंग ही जणू एखाद्या चित्रकाराने आपल्या ब्रशने साकारलेली जादूच वाटत होती. पहाटेचा गारवा तर एकदम हवाहवासाच वाटणारा होता. पक्ष्यांचा नुसता किलबिलाट. जणू त्यांची शाळाच भरली होती. खिडकीतून हे सारे पाहताना ओमला खूप मज्जा येत होती. इतक्यात बागेत जाणाऱ्या आजोबांना पाहून ओमने विचारले,

‘‘आजोबा, तुम्ही आता कुठे निघालात?’’

आजोबा म्हणाले, ‘‘मी रोज या वेळेला बागेत जातो. तू येतोस का फिरायला?’’

‘‘फिरायला? आत्ता?’’

ओमचा प्रश्न ऐकून आई म्हणाली, ‘‘हो. एक दिवस सकाळी जाऊन तर बघ! खूप मज्जा वाटेल तुला. हवा तर तुला खेळायला चेंडू घेऊन जा.’’

हे ऐकून ओमने टुणकन् उडी मारली आणि धावत जाऊन तयारी करून चेंडू घेऊन तो दाराशी हजर झाला. खाली पोचल्यावर ओमला आजोबांचे बरेच मित्र फिरायला आलेले दिसले. आजोबांचे बोट धरून ओमने बागेत तीन-चार फेऱ्या मारल्या. फिरताना पानांवरील दंवबिंदू, नुकतीच उमललेली फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे अशा असंख्य गोष्टी तो पाहत होता. या सगळ्यांबद्दल त्याच्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले होते. चालता चालता आजोबा त्याच्या मनात येणाऱ्या अनेक शंकांचे निरसन करत होते. काही वेळाने आईसुद्धा आली आणि म्हणाली, ‘‘ओम, आता आपण मैदानात जाऊ. थोडा वेळ चेंडूने खेळू तिथे.’’

‘‘आई, पण मी एकटाच कसा खेळू?’’

ओमच्या या निरागस प्रश्नावर आई नुसतीच हसली आणि त्याला घेऊन मैदानात गेली. मैदानात पाहतो तो काय, त्याच्याएवढी लहान मुले नव्हती, पण खूप सारे मोठे दादा वेगवेगळे खेळ खेळताना त्याला दिसले.

थोडा वेळ ओमने त्यांचा खेळ पहिला आणि नंतर स्वत:सुद्धा चेंडूने खूप खेळला. आई होतीच सोबतीला. जवळपास दोन तास उलटून गेल्यावर सगळे घरी परतले. घडय़ाळात पाहिले तर फक्त आठ वाजलेले. ते पाहून ओम आनंदाने म्हणाला, ‘‘आज दिवस किती मोठा वाटतो आहे ना? इतका वेळ खेळूनही आत्ताशी आठच वाजलेत. अजून कित्ती तरी वेळ आहे मज्जा करायला. आणि कित्ती छान वाटते आहे ना आज? आई, तू मला उद्यापण सहा वाजताच उठव. रोज लवकर उठून खेळायला जाईन मी.’’

त्यावर आजी म्हणाली, ‘‘व्वा व्वा ओम, शाब्बास! सकाळी लवकर उठणे ही फारच छान सवय आहे. पण त्यासाठी रोज रात्री लवकर- म्हणजे दहा वाजताच झोपायला हवे. संत तुकारामांनी म्हटलेच आहे- ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे..’

‘‘काय? दहा वाजता? म्हणजे मला रात्री लवकर जेवावे लागेल. गृहपाठही संध्याकाळीच पूर्ण करून मग खेळायला जावे लागेल.’’ ओम स्वत:शीच पुटपुटला.

आज ओमला संपूर्ण दिवसच काहीसा वेगळा भासत होता. रोज ११ वाजेतो अंघोळीसाठी त्रास देणारा ओम आज पटापट प्रात:र्विधी आटोपून लवकर न्याहारी करत होता. सकाळी ठरवल्यानुसार दिवसभर पटापट सर्व कामे उरकत होता. दुपारचे जेवण, झोप, गृहपाठ, खेळायला जाणे, रात्रीचे जेवण सारेच आनंदाने होत होते. दिवस कसा संपला हे त्याचे त्यालाही कळले नाही. उद्या लवकर उठायचे असे मनाशी पक्के करून रात्री दहा वाजताच तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी पहाटे हाक मारताच ओम लगेचच उठून बसला. सर्व तयारी करून आजोबांच्या आधीच तो दारापाशी हजर झाला. त्याला पाहून आजोबा म्हणाले, ‘‘व्वा व्वा ओम! तू तर आमच्या आधीच नंबर लावलास! खूप छान. आणि काय रे, आज एकदम ही बॅट घेऊन?’’

त्यावर ओम हसत सांगू लागला, ‘‘मी काल प्रथम आणि मनीतला सकाळी लवकर उठून फिरायला जाण्याची मज्जा सांगितली. आणि आज तेही येणार आहेत. मी त्यांना बागेतली मज्जा दाखवणार आहे. मग आम्ही थोडा वेळ क्रिकेट खेळणार आहोत. खूप मज्जा येईल.’’ त्याचा तो उत्साह पाहून घरात सर्वानाच त्याचे भारी कौतुक वाटत होते. पाठीवर बॅटची बॅग सांभाळत आजोबांचे बोट धरून बागेच्या दिशेने जाणाऱ्या ओमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कितीतरी वेळ आई तशीच दारापाशी उभी राहिली. खूप मागे न लागता अगदी सहज एक चांगली सवय ओमच्या अंगवळणी पडते आहे, याचे समाधान त्या माऊलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 1:05 am

Web Title: early morning fun dd70
Next Stories
1 शिक्षणाचं मोल
2 किडय़ाची खोड मोडली
3 एकदा काय झाले..
Just Now!
X