28 February 2021

News Flash

जलपरीच्या राज्यात : मोहक जलतरणपटू समुद्री कासव

ग्रीन सी टर्टलला त्यांचं नाव हिरव्या रंगाच्या चरबीमुळे आणि पाठीवरल्या हिरव्या कवचामुळे मिळालेलं आहे.

समुद्री कासवं नि:संशय अतिशय मोहक जलतरणपटू आहेत.

तब्बल १०० दशलक्ष वर्षांपासून जगभरातील महासागरांमध्ये प्रचंड अंतर पोहून जाणारी समुद्री कासवं नि:संशय अतिशय मोहक जलतरणपटू आहेत. जगभरात आढळणाऱ्या सात समुद्री कासवांच्या प्रजातींपैकी पाच भारतात आढळतात. यांपैकी सर्वाधिक आढळणारं समुद्री कासव म्हणजे ऑलिव्ह रिडले जातीचं कासव. समुद्री कासवांची ओळख त्यांच्या आकारानुसार आणि कवचावरील खवल्यांवरून ठरवतात, शिवाय प्रत्येक प्रजातीच्या समुद्री कासवांच्या अन्न आणि खाद्याविषयी सवयीदेखील वेगवेगळ्या आहेत.

दोन फूट लांबी आणि अदमासे ५० किलोंपर्यंत वाढणारी ऑलिव्ह रिडले कासवं भारतातील समुद्री कासवांमध्ये सर्वात लहान आहेत. ही समुद्री कासवं त्यांच्या आरिबाडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एका किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात समूहाने अंडी घालण्याच्या सवयीकरिता प्रसिद्ध आहेत.

लेदरबॅक टर्टल सर्वात मोठं, तब्बल सहा फूट लांब आणि ९०० किलो वजनाचं असतं. ही समुद्री कासवं १०,००० किलोमीटर प्रवास करून दूरदूरवर स्थलांतर करण्याकरिता प्रसिद्ध आहेत. तशीच समुद्रात खोल, अंदाजे १.२ किलोमीटर खोलीपर्यंत बुडी मारण्याकरितादेखील प्रसिद्ध आहेत.

ग्रीन सी टर्टलला त्यांचं नाव हिरव्या रंगाच्या चरबीमुळे आणि पाठीवरल्या हिरव्या कवचामुळे मिळालेलं आहे. ही एकमेव शाकाहारी, वनस्पतीभक्षी समुद्री कासवांची प्रजाती आहे. अदमासे पाच फुटांपर्यंत वाढणारी ही मोठी समुद्री कासवं वजनी ४०० किलोपर्यंत असतात. समुद्री गवत आणि शैवाल हे या मोठय़ा कासवांचं अन्न असतं.

हॉक्सबिल टर्टल मांसाहारी समुद्री कासव आहे. स्पंज, कोलंबी आणि झिंग्यासारखे क्रस्टेशिअन्स, सी अर्चिन्स आणि जेली फिश हे हॉक्सबिल कासवांचं प्रमुख खाद्य असतं. ही कासवं शक्यतो खोल पाण्यात जाणं टाळतात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांलगतच प्रामुख्याने आढळतात.

लॉगरहेड टर्टलला त्याचं नाव भल्याथोरल्या डोक्यामुळे मिळालेलं आहे. जबडय़ाच्या शक्तिशाली स्नायूंमुळे ही कासवं कठीण कवचांचे शिंपले आणि सी अर्चिन्स सहजपणे चिरडून खाऊ  शकतात. सुमारे तीन फूट लांब आणि १०० किलोपेक्षा अधिक वजनाची ही समुद्री कासवं असतात.

तब्बल शंभर दशलक्ष वर्षांपासून जगभरातील महासागरांमध्ये प्रचंड अंतर पोहून जाणारी समुद्री कासवं नि:संशय अतिशय मोहक जलतरणपटू आहेत.

 छायाचित्र : हृषिकेश चव्हाण

ऋषिकेश चव्हाण – rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 3:56 am

Web Title: facts about sea turtles
Next Stories
1 अब्बूंना पत्र..
2 फुलांच्या विश्वात : मधुमालती
3 जीवचित्र : टोरी नो  ई !
Just Now!
X