21 November 2017

News Flash

जलपरीच्या राज्यात : वैचित्र्यपूर्ण सी स्लग

सी स्लग्सच्या या वैशिष्टय़ामुळेच या प्राण्यांचं निरीक्षण आणि अभ्यास निश्चितच कुतूहलपूर्ण होतो.

ऋषिकेश चव्हाण | Updated: September 3, 2017 12:58 AM

मागच्या लेखामध्ये आपण कठीण आवरणधारी मोलस्कांची माहिती घेतली; आज आपण रंगीबेरंगी, मात्र चिमुकल्या मोलस्कांची- म्हणजेच सी स्लग्सची माहिती घेऊ. सी स्लग्स म्हणजे कवच नसणाऱ्या गोगलगायीच. काही सी स्लग्सना मात्र आपल्या सांगाडय़ासारखे शरीरांतर्गत कवच असतात. चित्रविचित्र आकाराचे हे छोटे प्राणी अनेक सागरी अधिवासांमध्ये आढळतात. काही एका सेंटीमीटर एवढय़ा चिमुकल्या आकाराचे असतात, काही अळीसारखे दंडगोल, तर काही बाटल्या साफ करायच्या ब्रशसारखे. अर्थात बॉट्लब्रशसारखे दिसतात.

या छोटय़ा प्राण्यांची खासियत  तुम्हाला माहिती आहे का? समुद्रातल्या विषारी सजीवांवर हे सी स्लग्स आपली गुजराण करतात. एवढंच नाही, तर या वैशिष्टय़पूर्ण खाद्यापासून मिळालेलं विष ते आपल्या शरीरात साठवून स्वत: विषारी होतात. तर सी स्लग्सपैकी काहींनी वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वत:च सूर्यप्रकाशापासून आपलं अन्न बनवण्याची किमया साध्य केलेली आहे.

सी स्लग्स खूपच सुरेख आणि रंगीबेरंगी असतात. त्यांचे स्वत:चे डोळे मात्र हे सौंदर्य टिपू शकत नाहीत. कारण ते फारच आदिम, रंगांधळे असतात. अशा फारच सामान्य डोळ्यांनी सी स्लग्स फक्त प्रकाश आणि अंधारामध्ये फरक करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे समुद्रात वावरतात तरी कसे? तर सी स्लग्स आपल्या ऱ्हायनोफोरस् नावाच्या कीटकांच्या स्पर्शकांसारख्या अवयवांद्वारे आपला मार्ग शोधतात. या स्पर्शकांद्वारे गंधाचा माग काढत ते आपला मार्ग निश्चित करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्राणी उभयलिंगी असतात. प्रत्येक प्राण्याला नर आणि मादी असे दोन्हींचे अवयव असतात. सी स्लग्सच्या या वैशिष्टय़ामुळेच या प्राण्यांचं निरीक्षण आणि अभ्यास निश्चितच कुतूहलपूर्ण होतो.

rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

छायाचित्र : बर्नार्ड पिक्टन

First Published on September 3, 2017 12:58 am

Web Title: facts and information about sea slugs
टॅग Sea Slugs