महासागरातील महामार्गावरून प्रवास करत करत आपण आता किनारपट्टीजवळच्या समुद्रामध्ये येऊन पोहोचलो आहोत. जमिनीजवळ वेळारेषेपासून खोल समुद्रामधील महाद्वीपीय जलसीमेपर्यंतचा चिंचोळा भाग किनारी समुद्रांचा मानला जातो. जागतिक महासागरांच्या १७ टक्के भाग किनारी समुद्रांचा आहे.

जागतिक लोकसंख्येच्या अंदाजे ४० टक्के, म्हणजेच चार अब्ज लोक किनारपट्टीपासून १०० किमोमीटरपेक्षा कमी अंतरावर वास्तव्य करतात. किनाऱ्याजवळील सागरामध्ये मासेमारी आणि खनिज तेल व वायू उत्खनन याद्वारे मोठय़ा प्रमाणात अन्न व ऊर्जेचे उत्पादन घेतले जाते.

किनारी समुद्रांमध्येदेखील निरनिराळ्या परिसंस्था असतात. जमिनीलगत प्रथम असतात सागरी गवतांची कुरणं. वालुकामय आणि चिखलाच्या सागरी तळांवर ही कुरणं आढळतात. फुलांनी बहरणाऱ्या या वनस्पती समुद्रामध्ये साधारणपणे १० मीटर, तर क्वचित कधी ४० मीटर खोलीपर्यंतही आढळतात. या वनस्पती हिरव्या पाठीचे सागरी कासव अर्थात ग्रीन सी टर्टल, समुद्री गाय अर्थात डय़ुगाँग आणि कितीतरी माशांच्या प्रजातींचे अन्न असतात.

चिखलाच्या समुद्री तळांवर तुम्हाला पाहायला भारी आवडतात असे शिंपले दिसतात. त्यांच्या सोबतीनेच तारा मासे, रे मासे, फ्लाउण्डर मासे, समुद्री किडे आणि इतरही निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. मात्र, आपल्या शहरा-गावांतील प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडल्याने या भागांमध्ये प्रदूषण होतं. कालांतराने मोठय़ा प्रमाणात प्रदूषकं इथे साठून राहतात. यामुळे इथले वनस्पती आणि प्राणीजीवन नष्ट होतं. नैसर्गिक जीवनाच्या अभावामुळे या मृतप्राय परिसंस्थांमध्ये अल्गी म्हणजेच शेवाळाची अतोनात व नैसर्गिक परिसंस्थांकरता हानिकारक वाढ होत जाते.

माझ्या छोटय़ा वाचकमित्रांनो, आत्ता कुठे आपण समुद्रातील जीवनाची ओळख करून घेत आहोत. यापुढच्या लेखात महासागरी महामार्गावरून प्रवास करत आपण उष्णकटिबंधातील रंगीबेरंगी सागरी किनाऱ्यांना भेट घेऊ.

ऋषिकेश चव्हाण

श्रीपाद – rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद