एक दिवस राजू नदीवरून रमतगमत शाळेतून घरी येत होता. त्याला नदीत एक सोनेरी मासा दिसला. त्याने तो पकडला आणि धावतपळत घरी आणला. राजूने मासा एका पाण्याच्या भांडय़ात  ठेवला. आई म्हणाली, ‘सोनेरी मासा आहे म्हणून त्याचे नाव ‘सोनू’ ठेवू.’ राजू आता सारखा सोनूजवळच बसायचा. शाळेत जाताना त्याला रोज चुरमुरे, फुटाणे, कणकेचे छोटे गोळे द्यायचा. आईच्या हातचे कणकेचे गोळे सोनूलाही खूप आवडत.
राजू शाळेतून घरी आला की सोनू जोरजोरात कल्ले हलवायचा, सोनूला खूप आनंद व्हायचा. बघता बघता पंधरा दिवस लोटले. सोनू मोठा झाला. त्याला ते भांडे पुरेनासे झाले. मग आईने मोठे भांडे आणले. सोनूचा रंग अजूनच चमकू लागला. त्याचे कल्ले थोडे मोठे झाले, खवले मोठे दिसू लागले. दुसरे भांडेही त्याला लहान पडू लागले. आईने तिसरे मोठे भांडे दिले. बघता बघता महिना लोटला. सोनू मोठा होत होता. आई म्हणाली, ‘राजू, आता याला नदीत सोडायला हवं.’ काकुळतीला येत राजू म्हणाला, ‘आई काहीतरी कर ना! मी नाही सोनूला सोडणार’. सोनू जोरात कल्ले हलवू लागला. ‘बघ आई, त्यालाही नाही जायचंय!’ राजू म्हणाला.
राजू दिवसभर विचार करत होता. तो आज जेवलादेखील नव्हता. सोनूचं काय करावं त्याला प्रश्न पडला होता. आई म्हणाली, ‘राजू, तू त्याला रोज नदीवर भेटायला जात जा. त्याला रोज चणे, चुरमुरे, कणकेचे गोळे देत जा.’ राजू जड अंत:करणाने सोनूला सोडायला गेला. राजूने सोनूला नदीत सोडले. तो रडतरडत सोनूला म्हणाला, ‘सोनू, नीट राहा, स्वत:ची काळजी घे, कुणाच्या जाळ्यात पकडला जाणार नाहीस याची दक्षता घे. जातो मी, तुला रोज भेटायला येईन.’
बघता बघता सहा महिने लोटले. राजू रोज सोनूला भेटायला जायचा. त्याला चणे, चुरमुरे, कणकेचे गोळे द्यायचा. एक दिवस राजू सोनूला भेटायला गेला तर सोनू रडायला लागला. राजूने विचारलं, ‘काय झालं?’ सोनू म्हणाला, ‘आज मी मरता मरता वाचलो. शहरातून मुलांची ट्रिप आली होती. त्यांनी प्लॅस्टिकचे ग्लास, पिशव्या नदीत फेकल्या. त्यातली एक पिशवी माझ्या घशात अडकली. माझा जीव गुदमरला, पण इतक्यात एक चमत्कार झाला. एक ग्रीन मॅन आला. त्याने माझ्या घशात अडकलेली पिशवी काढली आणि मी वाचलो. राजू आश्चर्याने म्हणाला, ‘ग्रीन मॅन? कोण आहे हा ग्रीन मॅन?’ ‘तो बघ तिकडे झाडाखाली उभा आहे.’ राजूने मागे वळून पाहिलं. ग्रीन मॅन लांब पाय टाकत राजूकडे येत होता. राजू म्हणाला, ‘ग्रीन मॅन, आज तू माझ्या सोनूला वाचवलंस. तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत.’ तो म्हणाले, ‘उपकार कसले, ते माझं कर्तव्यच आहे.’ राजू म्हणाला, ‘मला स्पायडर मॅन, सुपरमॅन माहीत आहेत, पण ग्रीन मॅन माहीत नव्हता.’ त्यावर ग्रीन मॅन म्हणाला, ‘ऐक माझी कथा. मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. आमची थोडीशी शेती आहे. मी रोजच शेतावर जातो. आमच्या शेतावर एक बाभळीचं झाड आहे. एक दिवस माझ्या मनात काय आलं कुणास ठाऊक? मला वाटलं काय करायचंय हे काटेरी, खुरटे झुडूप, म्हणून कुऱ्हाड उचलली आणि झाडावर मारणार इतक्यात आकाशवाणी झाली. ‘थांब! हे झाड तुला खुरटं आणि काटेरी वाटतंय ना, पण ते फार गुणी आहे. त्याच्यात लवणशीलता असल्यामुळे नापीक जमिनीवरसुद्धा उगवतं आणि नापीक जमीन शेतीलायक सुपीक बनवतं.’ मी हातातली कुऱ्हाड  टाकून दिली. पुन्हा आवाज आला, ‘आजपासून तू ग्रीन मॅन आहेस. पर्यावरणाचा तोल ढासळला आहे. प्रदूषण खूप झालं आहे. तुला निसर्गाचं रक्षण करायचं आहे. हा तुझा हिरवा पोशाख. यावर नदी, जंगल, झाडे, ओढे, प्राणी यांची चित्रे आहेत. त्यांचे तुला रक्षण करायचे आहे. हा काटेरी मुकूट तू डोक्यावर घाल, तो तुझे रक्षण करेल. हा पोशाख घाल आणि चल कामाला लाग.’ मी हिरवा पोशाख घातला. मुकूट नीट बसवला आणि इकडेच आलो. माशाच्या घशातली पिशवी काढली, त्याला वाचवलं.’
ग्रीन मॅन आपली कथा सांगत असताना नदीच्या मध्यातून एक स्त्री रडत रडत येऊ लागली. तिच्या अंगावर प्लॅस्टिकचे कागद चिकटले होते. तिच्या साडीची लक्तरे झाली होती. तिच्या तोंडावर काळे डाग पडले होते. राजूने आणि ग्रीन मॅनने विचारलं, ‘तू कोण आहेस?’ ‘ओळखलं नाहीत ना मला. मी तुमची लोकमाता, जीवनदायी नदी आहे.’ ‘तुझे हे इतके ओंगळवाणे रूप कसे झाले?’
‘ऐका माझी कहाणी.. प्लॅस्टिकचा अतिवापर, कारखान्यातील घातक रसायनेमिश्रितपाणी, शहरांतील, गावांतील गटारातले पाणी माझ्यात सोडले जाते.  प्लास्टिक, निर्माल्य, सर्व घाण माझ्या प्रवाहात सोडतात. माझे पाणी दूषित होते. पाण्यात असलेले जलचर, मासे यांची प्रचंड हानी होते. त्यामुळे कित्येक माशांच्या जाती नष्ट झाल्या आहेत. पावसाळ्यात मी अगदी फणफण करत वाहते, याचे कारण माहीत आहे का? माझ्या काठावरील माती, वाळू यांच्या प्रचंड उपशामुळे माझा काठ उद्ध्वस्त होत आहे. म्हणून मला पूर येतो. पूर ओसरला की रोगराई, साथीचे रोग होतात. माझी बाळं म्हणजे ओढे, तलाव यांना बुजवून मोठमोठय़ा गगनचुंबी इमारती बांधल्या जातायत. त्यामुळे पाणी झिरपण्याचं प्रमाण कमी झालंय. जंगलतोडीमुळे मातीची धूप होते. माझी खोली कमी होते आणि त्यामुळे मी पाणी वाहून नेणारा फक्त प्रवाह बनले आहे. माझ्या काठावरील पाणथळ कमी झाले आहे. कोटोन संपले आहे. पाणी आणि जमीन यांच्या सीमारेषेवरील दलदलीचा, गाळाने भरलेला उथळ पाण्याचा काठ राहिला आहे. येथेच मासे, जलचर अंडी घालतात. पण काठ उद्ध्वस्त झाल्यामुळे मासे, जलचर कमी झाले आहेत. अजून सांगण्यासारखं खूप आहे,’ नदी म्हणाली.
नदीची ही कहाणी ऐकून गणपतीची मूर्ती नदीतून वर आली. राजूला आणि ग्रीन मॅनला आश्चर्य वाटलं. दोघांनी त्याला नमस्कार केला. ते म्हणाले, ‘तू आमचा सुखकर्ता, दु:खहर्ता. तू आमचा तारक.’ ‘कसला झालो आहे तारक, मी तर मारक झालो आहे. प्लॅस्टर ऑफ परिसच्या मूर्ती बनवता, त्यांना कृत्रिम रंग लावता, अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. निर्माल्य, प्लास्टिकच्या वस्तू, सजावटीचा थर्माकोल सर्व नदीत फेकता. त्यामुळे अक्षरश: चोवीस तासाच्या आत मासे, जलचर मरतात. तेच दूषित पाणी तुम्ही पीता. मी कसला तारक मी तर मारक.’
हे सर्व ऐकून ग्रीन मॅन आणि राजू चिंतित झाले. ग्रीन मॅन म्हणाला, ‘राजू काहीतरी केलं पाहिजे.’ ‘ग्रीन मॅन, तू एकटा अपुरा आहेस. या कामी सर्वाचे सहकार्य हवे. आपण लोकांच्यात जागृती करू या. प्लास्टिकचा वापर करायचा नाही. निर्माल्य नदीत टाकायचे नाही. ‘एक गाव एक गणपती,’ याचं महत्त्व सर्वाना पटवून देऊ. घातक रसायने नदीत सोडायला अटकाव करू.’
दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि घोषणा केली- ‘चला कामाला लागू, झाडे वाचवू, नद्या वाचवू, जंगले वाचवू, पर्यावरण वाचवू, प्रदूषण कमी करू.’