छोटूला अभ्यासाचा खूपच कंटाळा. तो स्वत:हून काही अभ्यासाला बसत नसे. बळजबरीनं मारूनमुटकून स्वारी अभ्यासाला बसायची. सगळाच बळजबरीचा कारभार. त्याचे आजोबा- बंडोपंत त्या दिवशी दाढी करायला बसले. त्यांचं दाढी करायचं काम सावकाश चालायचं. दाढी करताना मिशीमधले आणि भुवयांमधले पांढरे केस बारकाईनं शोधून ते कात्रीनं उडवून द्यायचे. त्या शोधकार्यात त्यांचा बराच वेळ जायचा. त्यामानानं प्रत्यक्ष दाढीला वेळ कमी लागत असे. आजी छोटूला मिस्कीलपणे म्हणायची, ‘‘छोटू! तुझ्या आजोबांची दाढी मिनिटभर आणि मिशी-भुवई तासभर.’’ छोटूला त्याच्या आईनं बंडूनानांच्या जवळ अभ्यासाला बसवलं आणि सांगितलं, ‘‘नाना! तुमची दाढी होईपर्यंत छोटूला अभ्यास करायला लावा.’’

बंडूनाना म्हणाले, ‘‘छोटू, काढ बघू तुझं पुस्तक आणि वर्गात काय अभ्यास सुरू आहे तो  मोठय़ानं वाच बघू.’’ छोटूनं विज्ञानाचं पुस्तक काढलं आणि तो आर्किमिडीजचं प्रकरण वाचू लागला.

‘‘लाकडी ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो. कारण लाकडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे. पण लोखंडाचा खिळा पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवला तर तो मात्र बुडतो, कारण लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे.’’

तेवढय़ात बंडूनानांनी दाढीचं कोरडं स्वच्छ ब्लेड जवळच्या मगातल्या पाण्याच्या पृष्ठभागावर अलगद ठेवलं, तर ते मात्र पट्टीच्या पोहणाऱ्याप्रमाणे चक्क पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागलं. नंतर बंडूनानांनी एक लोखंडी टाचणी घेतली. ती अलगद मगातील पाण्याच्या पृष्ठभागावर ठेवली. ती देखील पाण्याच्या पृष्ठभागावर डोकं ठेवून दिमाखदारपणे तरंगू लागली. (याकरिता ब्लेडचा आणि टाचणीचा वरचा पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा असणं आवश्यक आहे.) बंडूनानांनी छोटूला ती गंमत दाखवली. त्यामुळे छोटूला आश्चर्य वाटलं. बंडूनाना छोटूला म्हणाले, ‘‘काय छोटूभैया! हे कसं झालं?’’

‘‘खरंच आजोबा! हे कसं झालं? मला वाटतं ब्लेडची आणि टाचणीची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असली पाहिजे.’’ छोटू म्हणाला.

‘‘नो नो छोटूभैया! त्यांची घनता लोखंडाच्या खिळ्याच्या घनतेएवढीच आहे, कारण ब्लेड आणि टाचणी लोखंडाचीच आहे.’’ नाना म्हणाले.

‘‘मग आजोबा! लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो, पण ब्लेड आणि टाचणी लोखंडाची असूनही पाण्यावर तरंगताहेत. याचा अर्थ आर्किमिडीज खोटा ठरला, असं तर नाही ना?’’ छोटूने शंका विचारली.

‘‘नाही छोटू! आर्किमिडीज शंभर टक्के खरा आहे. आणि तू जे बघतो आहेस ते देखील सत्यच आहे. तेव्हा या विसंगतीमागची वैज्ञानिक सुसंगती मी तुला सांगतो. ब्लेड आणि टाचणीच्या तरंगण्याचा संबंध त्यांच्या घनतेशी अजिबात निगडित नाही. बघ मी तुला आणखी एक गंमत दाखवतो.’’ बंडूनानांनी मगातील पाणी हलवलं. तेव्हा मात्र ब्लेड आणि टाचणी बुडून तळाशी गेले. नंतर मात्र ते पुन्हा वर येऊन पूर्वीप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले नाहीत. बंडूनाना म्हणाले, ‘‘छोटूभैया, ब्लेड आणि टाचणीची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असती, तर ते पुन्हा लाकडी ठोकळ्याप्रमाणे आपोआप वर येऊन तरंगू लागले असते. याचाच अर्थ हा की, त्यांच्या तरंगण्याचा संबंध त्यांच्या घनतेशी निगडित नाही. ओके?’’

‘‘हो आजोबा! पटलं, पण मग त्याचं कारण काय आहे? उगाचच मला टेंशन देऊ नका.’’ छोटू म्हणाला.

‘‘टेंशन नको असं म्हणू नकोस. कारण ब्लेड आणि टाचणी पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगले, याचं कारण ‘टेंशन’च आहे बरं! आणि या टेंशनला म्हणतात ‘सरफेस टेंशन’  किंवा पाण्याचा ‘पृष्ठीय ताण’. याचं स्वरूप ताणलेल्या रबराप्रमाणे असतं. त्यामुळेच हे सरफेस टेंशन टाचणी, ब्लेड अशा हलक्या पदार्थाचं वजन पेलू शकतं. त्याचं स्वरूप काहीसं दुधावरच्या सायीप्रमाणे असतं. सायीच्या पृष्ठीय पापुद्रय़ावर हलका पदार्थ कसा विसावू शकतो? तसंच होतं ब्लेड आणि टाचणीच्या बाबतीत, समजलं!’’ नानांनी समजावून सांगितलं.

‘‘पण आजोबा! तुम्ही मगातलं पाणी हलवल्यावर ब्लेड आणि टाचणी पाण्यात का बुडाली?’’ छोटूने कुतूहलाने विचारलं.

‘‘अरे, एखादी लहान मुलगी तिच्या लहान भावाला कसंबसं कळत-लोंबकळत कडेवर घेते खरी, पण त्यानं वेडेवाकडे हातपाय झाडले, तर मात्र ती त्याचं वजन पेलू शकत नाही. आणि तो खाली पडतो. तसंच झालं ब्लेड आणि टाचणीच्या बाबतीतही.’’ नानांनी सांगितलं.

‘‘हो आजोबा! आता मात्र समजलं.’’ छोटूच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

‘‘शाब्बास छोटूभैया!’’ नानांनी शाबासकी दिली.

तेवढय़ात आतून आजीचा आवाज ऐकू आला, ‘‘अहो ऽऽ! किती वेळ दाढी करत बसणार आहात? आवरा लवकर. अंघोळ, पूजा करायची आहे. जेवायला उशीर नको व्हायला.’’

छोटू मिस्कीलपणे हसत म्हणाला, ‘‘आजोबा, आजीच्या शब्दांचं, ऑर्डरचं वजन पेलण्याकरता तुमच्या मनाचं सरफेस टेंशन बळकट ठेवा.’’

नाना म्हणाले, ‘‘थँक यू छोटूभैया! कभी कभी टेंशन भी अच्छा होता है!’’अन् दोघंही टेंशनविरहित होऊन हसू लागले.