29 May 2020

News Flash

वाळवणाची धमाल

‘आजी, तू आबलोलीला कशाला जाणार आहेस?’ सुटी लागल्याने रतीचं आजीच्या हालचालींकडे पूर्ण लक्ष होतं.

‘आजी, तू आबलोलीला कशाला जाणार आहेस?’ सुटी लागल्याने रतीचं आजीच्या हालचालींकडे पूर्ण लक्ष होतं.
‘अगं, आपण या वर्षी टॉवरमध्ये राहायला आलो, पण आपलं अंगण हरवलं ना! मग वाळवणं कुठे घालणार? आबलोलीला आपल्या घरापुढे मोठं अंगण आहे, ऊन आहे आणि मदतीला सगुणा, शंकरपण आहेत. शिवाय शेजारी मृणालमावशी आहे. म्हणून तिकडून करून आणते थोडंफार.’
‘मीसुद्धा येणार तुझ्याबरोबर. मी आता मोठ्ठी झाले आहे. बारा वर्षांची. त्यामुळे तुला मदतपण करीन.’
भराभर एसएमएसची देवाणघेवाण झाली. रतीच्या बरोबर तिची आते-मामे भावंडंही यायला तयार झाली.
‘ते अगदी खेडं आहे. तिथे हॉटेलमधून जेवणाचं पार्सल आणायची पद्धत नाही. घरी केलेलंच खावं लागेल. आहे कबूल?’
‘होऽऽ’ सगळे एका सुरात ओरडले.
सगळ्या गाडय़ा आबलोलीकडे धावल्या. आजीने शंकरला सगळं वाणसामान आणून ठेवायला सांगितलं होतं. मुलांची काही खात्री देता येत नव्हती म्हणून आजीने लगेचच कामांना सुरुवात केली.
‘चला उजाडलं, आज लवकर उठा. पटापट दूध पिऊन अंगण झाडून टाका. आज मी तुम्हाला मोत्यांचा नाश्ता देणार आहे.’
‘आजी, आमच्या व्यायामशाळेत वार्षिक कार्यक्रम असला की आम्ही अंगण झाडायचो. मला माहिती आहे खराटय़ानं कसं झाडायचं ते. मी झाडेन.’ ‘मला येतं’ याचा आनंद रतीच्या चेहऱ्यावर झळकत होता.’
‘मीपण, मीपण’ करीत अथर्व, रमा, गायत्री, वेदांत, इरा सगळेच धावले. शंकर होताच. अंगण झाडल्यावर खाली जुन्या चटया, त्यावर जाजम आणि वरती प्लॅस्टिकचा कागद पसरला गेला. उडणारा कागद सांभाळताना सगळ्यांची तारांबळ होत होती.
‘वेदांत, तू आणि इरा दगड गोळा करून सगळ्या कोपऱ्यांवर ठेवा.’ अथर्वने लिंबूटिंबूंना आवडीचं काम सांगितलं. गोवर्धन पर्वत उचलून आणावा तसे वेदांत आणि इराने दगड आणून कोपऱ्यांवर ठेवले. सगुणाने आधण पाण्यात साबुदाणा शिजत ठेवला होता. आजी जिरं-मीठ घालून ढवळत होती.
‘आजी, होमिओपॅथीच्या गोळ्याच वाटताहेत.’ रमाने पातेल्यात डोकावून बघितलं.
‘खालीच ओटा असला की किती मस्त वाटतं, सगळं दिसतं ना!’ गायत्री गुडघ्यावर बसत म्हणाली.
‘रती, सगळ्यांना एकेक कुंडा आणि चमचा दे. आधी थोडय़ा चिकोडय़ा कागदावर घालायच्या. कागद भरला की मग उरलेलं खाऊन टाकायचं.’
वेदांत आणि इरा जोरजोरात चमचा वाजवत बसले. पीठ तयार झाल्यावर सगुणाने प्रत्येकाच्या कुंडय़ात थोडं थोडं पीठ घातलं.
‘हे बघा, एक-एक चमचा पीठ घेऊन कडेने गोल चिकोडय़ा घालायच्या. डोंगर करायचा नाही. पसरून घालायच्या. एकदम मध्येच घालायच्या नाहीत. दोन चिकोडय़ांच्या मधे थोडी जागा सोडायची. एका सरळ रेषेत घालायच्या. बघू तुमची भूमिती कशी आहे ते?’ आजीच्या सूचना कानावरूनच जात होत्या.
‘आजी, असं वाकून घालायच्या ना गं!’ गायत्रीला थोडी माहिती होती. अथर्वची तर पंजाब मेलच धावली.
‘माझ्या तर जेम्सच्या गोळ्याच झाल्या.’ इरा फतकल मारून बसली. ‘माझ्यापण.’ वेदांतने जाहीर केलं.
‘माझं पीठ संपलं. मला आणखीन पीठ हवंय.’ रतीला मजा वाटली. हळूहळू कागद भरला.
‘आजी, आता पुरे. खूप भूक लागलीय.’ अथर्वने ओटीवर पाय पसरले. आजीने सगळ्यांना आपापल्या कुंडय़ात पीठ खायला दिलं. त्यात थोडं ताक घातलं. सगळी तोंडं खाण्यात गुंतली. ‘आता पुरे’ म्हणेपर्यंत सगुणा वाढत होती. शेवटी एकमेकांचं बघून कुंडासुद्धा चाटूनपुसून लख्ख झाला.
‘आता ओटीवर पत्ते खेळता खेळता चिकोडय़ांकडे लक्ष ठेवा!’
‘आता त्या केव्हा वाळणार!’ वेदांत चिकोडीला हात लावत म्हणाला. चिकट झालेली बोटं तो चाटतच राहिला.
उन्हं उतरताक्षणी सगळे चिकोडय़ांकडे धावले. ‘ही माझी आहे ती मी खाणार.’ गायत्रीने जाहीर केले. सगळ्यांनी तोच कित्ता गिरवला.
‘आजी सगळ्या चिकोडय़ा संपल्या.’ रतीला काळजी वाटली.
‘बरं झालं, डब्यात ठेवायच्या ऐवजी सगळ्यांनी पोटात ठेवल्या. नेण्यासाठी घालू हं पुन्हा.’ आजी हसत म्हणाली.
दुसऱ्या दिवशी बटाटय़ाचा कीस घालायचा होता.
‘आजी, आम्ही सोलतो बटाटे,’ रती, गायत्री, अथर्व सोलायला बसले. वेदांत, इरा नुसतेच बटाटय़ांना हाताळत राहिले.
‘एकेकानं हळूहळू किसा हं, बोटं संभाळा, एकाच जागी किसू नका.’ आजीने आधीच मुलांना सावध केलं.
थोडं किसल्यावर रतीचा उत्साह ओसरला. तिने ‘हुश्श’ करत किसणी पटकन् रमाला दिली. किसता न येण्याजोगा उरलेला बटाटय़ाचा तुकडा तोंडात टाकायला वेदांतला आवडलं.
‘ए, मला जरा मोठा तुकडा दे नं.’ इरा कुरकुरली. हळूच किसलेल्या ओल्या किसावर धाड पडली.
‘आजी, अगं सगळे ओला कीस खाऊन टाकताहेत. मग चिवडा कसा करणार आपण?’ रमाने शंका उपस्थित केली.
‘उद्या पुन्हा बटाटे उकडू..’ असं म्हटल्यावर तिला खुदकन् हसायला आलं.
मुलांसाठी सगुणाने थोडय़ा कैऱ्या किसून मीठ, तिखट, साखर घालून उन्हात छुंदा करायला ठेवला होता.
दुसऱ्या दिवशी उडदाच्या पापडाचा बेत होता. आजूबाजूच्या घरांतून मुलांनी उडय़ा मारत पोळपाट-लाटणी आणली. पाटय़ावर पीठ कुटून सगुणाने दोऱ्याने लाटय़ा केल्या. ‘ए, थांब, मीपण करू का?’ रतीला गोल लाटय़ा पाडायला जमलं. वेदांतने पटकन् लाटी तोंडात टाकली. ‘हे बघ, असा पापड लाटायचा.’ आजीने प्रात्यक्षिक दाखवलं. मुलांची ‘सर्कस’ होत होती. ‘पलीकडचे दिसेल इतके पातळ लाटा.’- आजीने सूचना केली.
‘आजी, माझा कसा झालाय?’ रमाने विचारलं.
‘हिचा सिलोन झालाय, तर रतीचा ऑस्ट्रेलिया झालाय.’ अथर्वने चिडवण्याची संधी सोडली नाही.
‘मी बघ कसा भारत करतो,’ अथर्वने तोंडात लाटी टाकतच हात चालवला. वेदांत आणि इरा सगुणाने लाटलेले पापड वाळत टाकण्यात गुंग झाले होते. लाटी तोंडात चिकटल्यामुळे तोंडं बंद होती. ओले, अर्धवट वाळलेले सगळे नमुने चाखून झाले.
पापड झाल्यावर कुरडयांचा नंबर लागला. सगुणाने तीन दिवस गहू भिजत टाकून, वाटून चीक शिजवला. सोऱ्या फिरवताना रती आणि अथर्वची दमछाक झाली. वेदांत आणि इरा सोऱ्यातून ‘मॅगी’ कशी पडते हे बघायला चक्क आडवे झाले. सगुणाने हसून पटापट कुरडया घातल्या. चीक, ओल्या कुरडयांवर सगळ्यांनी ताव मारला. मिश्र डाळींचे सांडगे घालायला सर्वाना आवडले. वाळल्यावर कुडुम कुडुम तोंडं हलत राहिली. समाधानाचा ढेकर देत मित्रांना कसं टुक् टुक् करायचं या विचारात ओटीवर सगळे कलंडले.
सुचित्रा साठे lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 1:04 am

Web Title: inspirational story for kids
टॅग Kids Story
Next Stories
1 ‘आनंदाची बाग’, ‘मजेदार कोडी’, ‘पंख पाखरांचे’, ‘एकदा काय झालं!’
2 आभाळाचा फळा
3 प्रिय.. ‘मे’
Just Now!
X