‘‘ए आई, आज न मला फक्त रिकामा टिफीन न्यायचाय हं.. नाहीतर तू देशील खाऊ भरून त्यात. फक्त वॉटर बॉटल तेवढी भरून दे. आणि हो.. नॅपकीन पण दे हं. आमच्या तन्वी टीचरनी संध्याकाळच्या शेकोटीसाठी हे सगळं आणायला सांगितलंय.’’ – इति जय.

‘‘हो रे बाळा.. सकाळपासून या तुझ्या सूचना ऐकून ऐकून पाठ झाल्यात मला. आणि हे बघ, या बॅगेत तुझं सामान भरूनही ठेवलंय मी.’’आईने जयला बॅग दाखवत म्हटलं. मे महिन्यात जय मुंबईहून पुण्याला राहायला आल्यावर त्याला सुरुवातीला ही नवीन शाळा फारशी आवडली नव्हती. सतत त्याला मुंबईची शाळा, तिथल्या मित्र-मैत्रिणी सगळ्यांचीच सारखी आठवण यायची. पण गेल्या महिन्यात झालेल्या गॅदिरगनंतर त्याला या शाळेत चालणाऱ्या गमतीजमती आवडायला लागल्या होत्या. त्यातलाच शेकोटी हा मुंबईच्या शाळेत कधी न पाहिलेला प्रकार आज तो प्रथमच अनुभवणार होता. त्याचा उत्साह पाहून आईलाही बरं वाटत होतं.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

‘‘अगं आई, संध्याकाळी तिथे आम्ही ओपन ग्राऊंडमध्ये असणार ना म्हणून टीचरनी स्वेटरबरोबर वुलन कॅपसुद्धा घालून यायला सांगितलंय.’’ जयची आणखी एक सूचना.

युनिफॉर्मवर उबदार स्वेटर घालून आईने हसतच एरवी कधीही डोक्यावर टोपी घालून न देणाऱ्या लेकाच्या डोक्यावर कानटोपी चढवली आणि त्या छोटय़ा एस्किमोला तिने स्कूटीवरून शाळेत सोडलं.

ग्राऊंडवर आधीच जमलेल्या टीचर आणि दोस्तांना बघितल्यावर जयने आईला पाठमोराच टाटा करून दोस्तांकडे धाव घेतली. ‘‘चला, हा जय पण आला.. आता सगळेजण जमले ना.. तेव्हा आधी आपापल्या क्लासमध्ये जाऊन सर्वानी आपल्या बॅग्ज ठेवून या.’’ टीचर म्हणाल्या. त्यानंतर  टीचरनी सगळ्यांना मैदानाच्या कंपाऊंडशी नेले. ‘‘आज आपल्याला शेकोटी करायचीय ना. तेव्हा आता सगळ्यांनी इथल्या सुक्या काटक्या आणि वाळलेली पाने गोळा करायची आणि त्या टोपलीत टाकायची. पुढे काय करायचे ते नंतर सांगते.’’ त्यासरशी सगळेजण उत्साहाने कामाला लागले.

‘‘ए जय, हिरव्या काडय़ा उचलू नकोस रे.. त्या पेटत नाहीत फक्त ब्राऊन कलरच्याच काडय़ा उचल.’’ नेहाचा सल्ला.

‘‘आणि हिरवी पाने पण नको हं. आपले माळीकाका हा हिरवा पाला उद्या गाय, बकरी यांना खायला देतील.’’ क्रिशने अधिक माहिती पुरवली.

‘‘व्वा! छान. भरून गेली की टोपली काटक्यांनी. म्हणजे आता आपली शेकोटी बराच वेळ पेटणार हं. आता सगळ्यांनी प्रार्थनेच्या हॉलमध्ये थोडी गंमत करायचीय,’’ असे म्हणत टीचरनी त्यांना आत नेऊन गोलाकार बसवले. आणि सगळ्यांच्या पुढय़ात हरभऱ्याच्या छोटय़ा जुडय़ा आणि एक कागदी प्लेट ठेवली. एक जुडी स्वत:च्या हाती घेत उंचावून दाखवत म्हणाल्या, ‘‘कोण सांगेल मला, ही कसल्या पानांची जुडी आहे?’’

‘‘हरभरा.’’- पार्थ.

‘‘ शाब्बास.. आता या पानांमध्येच तुम्हाला हिरवे दाणे दिसताहेत ना, ते आता मी १, २, ३.. असे म्हटले की सगळ्यांनी पटापट या जुडीच्या पानातून काढायचे आणि असे सोलायचे. बाजूच्या प्लेटमध्ये सोललेले दाणे ठेवायचे.’’ टीचरने स्वत: दोन दाणे सोलून दाखवले आणि मुलांना सुरूचा इशारा दिला. त्याबरोबर हिरिरीने सगळे कामाला लागले.

‘‘टीचर, आता माझ्याकडच्या पाल्यात दाणेच उरले नाहीत.’’ नेहाने जाहीर केले.

‘‘ हॅट.. तुझे एवढेच जमले दाणे.. माझे बघ तुझ्यापेक्षा जास्ती जमले.’’ जयने तिला खिजवले. त्याबरोबर ‘‘ए, ही काही स्पर्धा नव्हती हं.. तुम्ही सगळीच मूलं स्मार्ट आहात. आता तुम्हाला हे दाणे सोलायला छान जमले ना.. मग आता कधीतरी घरीपण आईला मटार वगैरे सोलायला मदत करायची हं. करणार ना?’’ टीचरच्या प्रश्नाला एकसुरात होकाराचे उत्तर आले. ‘‘आता दुसरी गंमत करायला इकडे बघा.’’

समोर थोडय़ा उंचीवर दोन खांबांना दोरी बांधली होती. त्याला थोडय़ा थोडय़ा अंतरावर मस्त केशरी रंगाची छोटी छोटी ५ गाजरे लटकवली होती. एका वेळी ५ मुलांनी हात मागे ठेवून एका एका गाजराखाली उभे राहून उंच उडय़ा मारून गाजर तोंडात पकडायचा तो खेळ होता. हात वापरायचे नसल्याने माना उंचावून उंचावून सगळ्यांचे प्रयत्न चालले होते. पण कधी उंची कमी पडायची, तर कधी दोरी हलायची. वज्र त्यातल्या त्यात थोडा उंच असल्याने त्याला लगेच जमले. बऱ्याच प्रयत्नांनी आणखी एक-दोन जणांना जमले. बाकीच्यांच्या नुसत्या उडय़ाच चालू राहिल्या. सगळ्यांची ती सर्कस बघून हॉलमधल्यांची खूप करमणूक झाली.

‘‘ टीचर.. मला खूप घाम आलाय. आता स्वेटर काढू का?’’ जयचा हैराण प्रश्न. दमछाक झालेल्या सगळ्यांनीच त्याची री ओढली.

‘‘अंहं, तुमचा आत्ता उडय़ा मारायचा खूप व्यायाम झाला ना म्हणून थंडी पळालीय, पण आता मैदानात उघडय़ावर गेलात की स्वेटरची गरज लगेच पडेल.’’ – टीचर.

सगळे जण मैदानात माळीकाका रचत असलेल्या काटक्यांच्या ढिगाशी पोहोचल्यावर टीचरनी एकमेकांचे हात हाती घ्यायला सांगून त्या ढिगाभोवती थोडय़ा अंतरावर मुलांना रिंगण करायला सांगितले. तन्वी आणि प्राची टीचरही त्या गोलात सामील झाल्या. त्यांनी गाणी सांगायची आणि मुलांनी त्यांच्यापाठोपाठ म्हणायची असे ठरले. दोन गाणी  होईपर्यंत माळीकाकांनी काटक्यांच्या ढिगाला काडी लावून शेकोटी पेटवली. त्याबरोबर व्वॉव.. करत सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. ‘‘काय मग.. इतका वेळ धावपळ, धमाल करून आता भूक वगैरे लागली की नाही.. चला तर मग  सगळ्यांनी पटापट स्वच्छ हात धुऊन आपले रिकामे डबे घेऊन या पाहू.. रोज आपण घरी चार भिंतींच्या आत आणि टय़ुबलाइटच्या प्रकाशात जेवतो ना, आज मात्र या शेकोटीच्या प्रकाशात आणि मोकळ्या मैदानात; पण.. शेकोटीच्या उबेत अंगत पंगत करायचीय हं. बघा कसा हा निसर्गामधला वाळलेला कचरासुद्धा आपल्या उपयोगी पडतोय. आपल्याला अंधारात उजेड आणि थंडीत उब देतोय. चला पटापट.’’ असे टीचरनी म्हटल्यावर एकसाथ सगळ्यांच्या पोटात कावळे कोकलू लागले.

थोडय़ा वेळापूर्वी सोललेले हरभऱ्याचे दाणे तोंडात न पकडता आलेल्या गाजराचे छोटे छोटे तुकडे, मटार पुलाव आणि तीळगुळाची खमंग वडी अशा मेनूवर ताव मारत शेकोटीच्या सोनेरी पिवळ्या प्रकाशात टीचर आणि माळीकाकांसह सर्वाच्या गप्पागोष्टी  इतक्या रंगल्या, की आजूबाजूला मिट्ट अंधार झाल्याचे कुणाला कळलेसुद्धा नाही.

‘‘चला बच्चेकंपनी, गेटकडे बघा सगळ्यांचे आई-बाबा तुम्हाला न्यायला आलेत. आणि आपली शेकोटीसुद्धा हळूहळू विझत चाललीय ना.’’- टीचरनी अशी आठवण करून दिल्यावर नाईलाजाने सगळ्यांना उठावे लागले. सर्व दोस्तांना बाय बाय करत सोमवारी भेटायचे प्रॉमिस देत जय घरी निघाला. पण रस्ताभर त्याचे आई-बाबांना शाळेबद्दल त्याच्या टीचरबद्दल आणि लाडक्या नेहा, क्रिशबद्दल आणि खास आजच्या  शेकोटीबद्दलच्या गंमती सांगणे संपतच नव्हते. तेव्हा जय आता खराखुरा या शाळेत रमला याची आईला खात्री झाली.

अलकनंदा पाध्ये  alaknanda263@yahoo.com