17 February 2019

News Flash

अडनिडय़ा वयाची आव्हाने

टी नेज म्हणजे १२-१३ वर्षांनंतरची पुढची काही वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातली जबरदस्त असतात.

|| मुक्ता चैतन्य

टी नेज म्हणजे १२-१३ वर्षांनंतरची पुढची काही वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातली जबरदस्त असतात. खूप नव्या गोष्टी आपल्याला समजत असतात. आपण जे आजूबाजूला बघत असतो, अनुभवत असतो त्याचे अर्थ आपल्याला लावता यायला लागतात. आपण आता मोठे झालो आहोत, ही भावनाही मनात निर्माण होते आणि आपल्याला जामच भारी वाटत असतं. हे मी लिहितेय कारण कधीतरी मीही या वयातून गेले आहे. तुमच्या हातात आहेत  तशी गॅजेट्स आमच्याकडे नव्हती, पण टीव्हीवर चालणारे व्हिडीओ गेम्स, ‘मारिओ’ तोवर आला होता आणि सुट्टी लागली की व्हिडीओ कॅसेट्स मिळणाऱ्या पार्लरमध्ये जाऊन आम्हीही व्हिडीओ गेम्स आणायचो. काळ-वेळ विसरून खेळायचो. तर मी, म्हणजे आमची पिढी टीन्समध्ये गेली तेव्हाच हे सगळं सुरू झालंय. पण तेव्हा इंटरनेट नव्हतं. ऑनलाइन गेम्स, अ‍ॅप्स, स्मार्टफोन्स यातलं काहीही नव्हतं. त्यामुळे आमची झेप सुटीत तासावर मिळणाऱ्या व्हिडीओ गेम्सपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे अर्थात धोके कमी होते आणि फायदेही आजच्यासारखे पुष्कळ नव्हते.

पण तुमचं तसं नाहीये. तुमच्या हातात तुम्हाला समजायला लागण्याआधीपासून स्मार्टफोन आहे, टॅब आहे. त्यावर तुम्ही भटकत असता. आता या सगळ्याचा तुमच्या वयाशी काय संबंध, असा विचार तुमच्या मनात येईल. तर सांगते. हे वय असतं ना ते एकदम गमतीशीर असतं. खूप गोष्टींची जाणीव नव्याने व्हायला लागलेली असते. शरीर तर बदलत असतंच, पण मनही बदलत असतं. अनेक अनपेक्षित विचार मनात यायला लागतात. प्रचंड कुतूहल वाटत असतं. स्वत:चं मत आलेलं असतं. आपण नक्की लहान आहोत की मोठे, हे आजूबाजूच्या मोठय़ांच्या वागण्यातून नक्की समजत नसतं. जाम कन्फ्युजन असतं. अशा वेळी काही वेळा ‘मी कुणालाच आवडत नाही.’, ‘माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही.’ ‘मला कुणीच समजून घेत नाही.’, ‘मी कुणालाच नकोय,’ असले विचार यायला लागतात. खरं तर असे विचार मनात यावेत असं काहीही आई-बाबा किंवा इतर मोठे वागले नसले तरीही हे विचार मनात येतात. कारण या वयात आपली दखल घेतली जावी, आपण जे काही करतोय त्याचं कौतुक व्हावं, त्याविषयी आई-बाबांनी बोलावं असं सारखं वाटतं असतं. आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की तुमच्या मनात असे नको नको ते विचार यायला लागतात.

आता हे सगळं जेव्हा तुमच्या मनात चालू असतं ना तेव्हा तुम्ही ऑनलाइनही असता. कदाचित अनोळखी लोकांशी चॅटिंग करत असता. आता होतं काय की ती माणसं मुळातच वाईट आहेत, ते अशा वेळी मग तुमच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही हळवे झालेले असता, त्यामुळे तुमचाही त्यांच्यावर विश्वास बसतो. आपल्याला ‘तीच’ व्यक्ती फक्त समजून घेऊ शकते असं काहीतरी वाटायला लागतं. आणि गडबड होते. कारण जी व्यक्ती तुम्हाला असं सांगते की, ‘आई-बाबांपेक्षा किंवा घरातल्या कुणाही मोठय़ा व्यक्तीपेक्षा मीच कसा तुला अधिक समजून घेतोय, तू माझंच ऐक, आई-बाबांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस..’ ती अनोळखी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते. कारण आपल्या आई-बाबांइतकं आपल्याला कुणीही ओळखत नसतं.

गुगल आल्यापासून आपल्या शाळेचे प्रॉजेक्ट सोपे झाले आहे. हो की नाही? अगदी निबंध लिहायचा असला तरी गुगलवर सर्च केलं की रेडिमेड निबंधापासून ते पॉइंट्सपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. अर्थात आपल्यापकी काहीजण अशी मदत घेत नसणार. नियमाला अपवाद असतोच. पण तरीही प्रॉजेक्टससाठी गुगल सर्रास वापरतो. अगदी शाळेच्या प्रॉजेक्टस्च्या थीम्स असणाऱ्या वेबसाइट्सचाही वापर होतो. पण कधीतरी शाळेचा एखादा निबंध, एखादा प्रॉजेक्ट गुगलची मदत न घेता करून बघा बरं! हल्ली आई-बाबांच्या तोंडून एक शब्द तुम्ही वरचेवर ऐकला असेल तो म्हणजे ‘सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन’ किंवा ‘सोशल मीडिया डिटॉक्स’. याचा अर्थ काही काळासाठी ऑनलाइन जगतापासून जरा दूर जायचं. सोशल मीडिया वापरायचा नाही. गुगल वापरायचं नाही. फोनचा उपयोग फक्त कॉल्स घेणं आणि करणं इतकाच करायचा किंवा फोनच वापरायचा नाही. आता मला सांगा, डिटॉक्सची गरज फक्त मोठय़ांना असते का? आपण निबंध लिहायला जर गुगलची मदत घेणार असू तर डिटॉक्स आपल्यालाही गरजेचं आहेच ना!

पुढचा निबंध, शाळेचा प्रॉजेक्ट करताना मुद्दामहून ठरवून गुगल वापरू नका. मग बघा, कशी मजा येते. कधीतरी असंही करून बघायला काय हरकत आहे? यातही वेगळं चॅलेंज आहेच की!

या काही गोष्टी नक्की लक्षात घ्या.

  • एकतर तुमच्या मनात हे जे काही विचार येत असतात, ते वयामुळे येतात. तर आई-बाबांशी मोकळेपणाने बोला. त्यांना तुमच्या मनातले विचार सांगा. आपलं किती प्रेम असतं आई-बाबांवर.. मग उगाच कशाला गरसमज करून घ्यायचा, नाही का?
  • अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग शक्यतो करूच नका. चुकून केलंत तरीही तुमच्या वैयक्तिक बाबी त्यांना सांगण्याची गरज नाही. चुकून सांगितलं तरीही त्यांनी दिलेले सल्ले ऐकू नका.
  • आपलं मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी चुकीची गोष्ट चॅटिंग करताना समोरच्या माणसाने सांगितली तर आपलं मन आपल्याला सांगतं, ‘हे चूक आहे, करू नकोस.’ ते ऐका. त्याकडे दुर्लक्ष करून ती गोष्ट करू नका.
  • ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, माय स्पेस अशा सगळ्याच साइट्सवर प्रायव्हसी सेटिंग असतं. पण बहुतेकदा आपण ते वापरत नाही. आपली माहिती मग सगळ्यांसाठी खुली असते. ती कुणीही बघू शकतं. आपले फोटो डाऊनलोड करू शकतं. त्यामुळे या सोशल नेटवìकग साइटवर काय माहिती द्यायची, कुठले फोटो अपलोड करायचे याचा नीट विचार करा. तुमच्या माहितीचा आणि फोटो, व्हिडीओज्चा दुरुपयोग होता कामा नये. इतपत काळजी तर नक्कीच घेतली पाहिजे.

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

 

First Published on July 29, 2018 12:04 am

Web Title: internet is useful for the students