05 March 2021

News Flash

नभांगणाचे वैभव : खग्रास सूर्यग्रहण

चंद्रग्रहणाचे खंडग्रास, खग्रास असे प्रकार असले तरी सर्व निरीक्षकांना ते एकाच प्रकारचे दिसते. सूर्यग्रहणाचे मात्र असे नसते.

| September 22, 2013 01:03 am

चंद्रग्रहणाचे खंडग्रास, खग्रास असे प्रकार असले तरी सर्व निरीक्षकांना ते एकाच प्रकारचे दिसते. सूर्यग्रहणाचे मात्र असे नसते. आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचतो, की अमुक दिवशी ‘खग्रास’ सूर्यग्रहण आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, ज्यांना कोणाला ते ग्रहण दिसते ते खग्रासच दिसते. एकच सूर्यग्रहण काही लोकांना खंडग्रास दिसते तर काही लोकांना खग्रास दिसते. कारण ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागात चंद्राची विरळ सावली पडते तेथील निरीक्षकांना ग्रहण खंडग्रास स्वरूपाचे दिसते. ज्या भागात चंद्राची दाट सावली पडते, त्या भागातील निरीक्षकांना ग्रहण खग्रास स्वरूपात दिसते. मात्र चंद्राच्या दाट सावलीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा पट्टा अगदी थोडय़ाच रुंदीचा भाग व्यापतो म्हणून आपल्या स्वत:च्या भूप्रदेशातून (गावातून) खग्रास ग्रहण दिसणे, ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. खग्रास ग्रहणात सूर्यिबब पूर्ण झाकले जाते आणि त्यामुळेच सूर्याकडून येणाऱ्या वर्णपटाचा अभ्यास करणे किंवा अन्य संशोधन शक्य होते. अतीव सुंदर आविष्कारामुळे केवळ शास्त्रज्ञच नव्हे तर सामान्यलोकही खग्रास ग्रहण जेथून दिसेल त्या ठिकाणी जाण्याची धडपड करतात. सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर संपूर्ण सूर्यिबबाला झाकू शकत नाही. सूर्य आणि निरीक्षक यांच्यामध्ये चंद्र आला तरी सूर्यिबबाची बांगडीसारखी कडा मोकळी राहते.
या ग्रहणाला कंकणाकृती ग्रहण म्हणतात. म्हणजे सामान्यपणे एखादे सूर्यग्रहण खंडग्रास आणि खग्रास किंवा खंडग्रास आणि कंकणाकृती असे दिसू शकते. चंद्राची विरल सावलीही पृथ्वीच्या सर्व (भू) भागाला व्यापू शकत नाही. त्यामुळे काहीजण सूर्यग्रहण पाहात असूनसुद्धा त्याच वेळी काहींच्या आकाशात सूर्य नेहमीसारखा तळपत असतो.
लोलक किंवा ग्रेटिंगसारखे साधन वापरून प्रकाशाचे पृथक्करण करणे शक्य होते. प्रकाशाचे पृथक्करण केल्यास त्या रंगपट्टय़ात काळ्या किंवा चमकदार उभ्या रेषा दिसतात. अशा वर्णपटाच्या अभ्यासातून कितीतरी शोध लागले आहेत. हेलिअम हे मूलद्रव्य सूर्यावर आहे हे १७ ऑगस्ट १८६८ या दिवशी झालेल्या व भारतातून दिसलेल्या ग्रहणामुळे कळले. सौरज्वाळांच्या (Prominances)  वर्णपटात हॅड्रोजनच्या रेषा आढळल्या आहेत. खग्रास अवस्थेत सूर्यिबबाभोवती जो झळाळता भाग दिसतो त्यास किरीट किंवा प्रभामंडल म्हणतात. हा भाग आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत असलो तरी या भागाचे तापमान १० लाख अंश सेल्सिअस एवढे प्रचंड आहे, हे वर्णपटामुळेच कळले. किरिटाच्या वर्णपटातील एक रेषा आयनी भवन झालेल्या लोखंड या मूलद्रव्याच्या अणूमुळे मिळाली. लोखंडाच्या २६ इलेक्ट्रॉनपकी १३ इलेक्ट्रॉन अतितापमानामुळे निघून जातात. तेव्हाच अशी रेषा मिळू शकते. दूर वरून येणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश किरण सूर्याच्या आकर्षणामुळे किंचित विचलित होतो, हे आइन्स्टाइनचे विधान २९ मे १९१९ च्या खग्रास ग्रहणात सिद्ध झाले. भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी केरळ आणि तामिळनाडूला २६ डिसेंबर २०१९ रोजी मिळणार आहे. खग्रास सूर्यग्रहण जम्मू काश्मीर भागात २० मार्च २०३४ रोजी दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 1:03 am

Web Title: khagrasa solar eclipse
Next Stories
1 आर्ट कॉर्नर : रिसायकल वॉलसर्कल
2 आर्ट गॅलरी
3 गणिताशी मैत्री
Just Now!
X