शेजारच्या राधेकाकूच्या घरातील रोजची भांडणे गोजाकाकू ऐकायची आणि अस्वस्थ व्हायची. तिला वाटायचं, जरा समजावून सांगावं पोरांना- की बाबांनो, भांडू नका. जे आहे ते सगळ्यांनी मिळून खा रे सुखानं. पण काका तिला त्यात पडू देत नसत. ‘तू सांगून कोण ऐकणार आहे तुझं?’ असं म्हणून रोज ते तिला थांबायला भाग पाडत. पण आज मात्र काका घरी नसताना काकू मनाचा हिय्या करून गेलीच मुलांना समजवायला. पण शेवटी अपमानित होऊन आली आणि नेमके काका आले. म्हणाले, ‘मोठी गेली होती कृष्णशिष्टाई करायला! सांगत होतो तर ऐकलं नाही!’  त्यांची लाडकी नात होतीच तिथे. ‘आजोबा, काय केलं म्हणे आजीनं तिथे जाऊन?
आजोबा म्हणाले, ‘अरे बाळा, कृष्णशिष्टाई म्हणजे हितोपदेशच- ज्यात सगळ्यांचं भलं आहे असा उपदेश.’
महाभारतातील कौरव-पांडव यांच्यात समेट होण्याचे कोणतेच चिन्ह दिसेना. युधिष्ठिराने युद्ध टाळण्यासाठी पाच राज्यांऐवजी पाच खेडी दे असे सांगितले, तेही दुर्योधनाला मान्य नव्हते. कौरव-पांडवांचे युद्ध निश्चित झाले, त्यावेळी श्रीकृष्ण थोडेसे अस्वस्थ झाले. कारण यात कुणाचेच भले होणार नाही हे नक्की होते. म्हणून धृतराष्ट्राला व त्याच्या मुलाला- दुर्योधनाला.. कौरवांच्या ज्येष्ठ बंधूला समजावून सांगण्यासाठी ते गेले. पांडवांच्या बाजूला द्रुपद, कृष्ण, विराट यांसह युयुधान, काशीपती, कैकेय, शिखंडी असे अनेक वीर होते. तर भीष्म, द्रोण, कर्ण, कृप, सोमदत्त असे अनेक वीर कौरवांच्या बाजूला होते. पांडवांची सेना सात अक्षौहिणी, तर कौरवांची अकरा अक्षौहिणी एवढी होती. असे असले तरी युद्ध हा योग्य पर्याय नव्हता.
कृष्णाने अनेक प्रकारे समजावले. ‘राजा धृतराष्ट्र, पांडवांनी तुझ्या शब्दाचा मान राखून वनवास भोगला. ठरलेल्या कराराप्रमाणे जे राज्य त्यांनी द्यूतात गमावले ते त्यांना परत देऊन टाक आणि समेट घडवून आण, असा प्रस्ताव मी मांडतो आहे; जो दोन्ही पक्षांना हितकर आहे. नीतिनियमांना धरून आहे. शांतीचा मार्ग आहे. योग्य आहे. सद्गुणांनी युक्त अशा कुरुकुलात कपटामुळे जे घडले ते तुला माहीतच आहे. कुरुकुल हे श्रेष्ठ कुल आहे. युद्धात कुलक्षय होईल. तसेच विनाकारण प्रचंड प्राणहानी होईल. युद्धाचा मार्ग योग्य नव्हे, हे केवळ तुमच्या कुळातील भांडण न राहता पृथ्वीच्या नाशाचे युद्ध बनले आहे. त्यात प्रजेची होळी होईल. राजाने प्रजाहित प्रथम पाहिले पाहिजे. त्यापेक्षा समझोत्याने वागल्यास सगळ्यांचे कल्याण होईल. राजकर्तव्य वा न्यायाला स्मरून निर्णय घ्या. युद्ध टाळा. आणि राज्याचा नाश करण्यापेक्षा कलहाचा नाश करा.’ राजा धृतराष्ट्र किंवा दुर्योधन कुणीही हा प्रस्ताव मान्य केला नाही. कौरव-पांडवांमध्ये घनघोर युद्ध झाले. त्यात कौरव पूर्णपणे नष्ट झाले. असेच भांडण होऊ  नये म्हणून समजवायला गेली होती आजी तुझी, पण तेही कौरवच ठरले.
memphadke@gmail.com

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?