दोस्तांनो, नुकत्याच झालेल्या संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने तुम्ही कुरकुरीत तिळगूळ आणि खुसखुशीत गुळपोळ्या यांच्यावर चांगलाच ताव मारला असेल. पण संक्रांत म्हटली की अजून एका गोष्टीची आठवण होते आणि ती म्हणजे आकाशात उंच उंच उडणाऱ्या नानाविध रंगांच्या, आकाराच्या पतंगांची. पण तुम्हाला माहीत आहे का? या पतंगालासुद्धा इतिहास आहे.
पतंगाचा शोध लागला सुमारे २००० वर्षांपूर्वी  चीन या देशात. आजही अमेरिकेतील वॉिशग्टन शहरातील नॅशनल एअर अ‍ॅण्ड स्पेस म्युझियममध्ये ‘द अर्लिएस्ट एरोक्राफ्ट ऑफ हय़ुमन बीइंग्स आर द काइटस् अ‍ॅण्ड रॉकेटस् ऑफ चायना’ असे वाक्य कोरलेला एक पुरातन चिनी पतंग जतन केला आहे.
सुरुवातीच्या काळात (२०० ख्रिस्त पूर्व) २०० बी. सी. च्या सुमारास चीनमध्ये शत्रुसन्याला घाबरवण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रथम पतंगांचा वापर केला गेला. नंतर शत्रुसन्याच्या छावणीपर्यंतचे अंतर मोजण्यासाठी, सन्याला निरनिराळे संदेश पोहोचवण्यासाठी पतंगांचा उपयोग केला जात असे. दहाव्या-बाराव्या शतकात दुष्ट शक्तींचा नाश केल्याचे द्योतक म्हणून चीनमध्ये पतंग उडवण्याची प्रथा सुरू झाली. तसेच उंच आकाशात असलेल्या पूर्वजांना आपल्या भावना पोहोचवण्यासाठी ही पतंग उडवण्याची पद्धत होती. म्हणून चिनी पतंग मासा, ड्रॅगनफ्लाय, फुलपाखरू, क्रेन पक्षी, फिनिक्स पक्षी अशा पवित्र मानलेल्या प्राणी आणि पक्ष्यांचे असत. अठराव्या शतकात बेन्जामिन फ्रँक्लीन या शास्त्रज्ञाने काही संशोधनांमध्ये पतंगाचा उपयोग केला होता. एकोणविसाव्या शतकात ऑस्ट्रेलियातील लॉरेन्स हारग्वे यांच्या प्रयत्नाने पतंगाला आजच्यासारखा  चौकोनी आकार मिळाला आणि यातूनच प्रेरणा घेऊन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला राइटबंधूंनी पहिले विमान बनविले.
भारतात मात्र सुरुवातीपासूनच तत्कालीन राजे-महाराजे यांनी पतंगांचा उपयोग खेळाची हौस आणि स्वत:च्या सत्ताप्रदर्शनासाठी केला. पतंग उडवण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींना राजे आपल्या पदरी बाळगत असत. कालांतराने सामान्य जनतेतही हा शौक लोकप्रिय होऊ लागला.
मित्रांनो, गंमत म्हणून जर तुम्ही घरीच पतंग बनवणार असाल तर तुम्हाला हव्या त्या आकाराचा काडय़ांचा सांगाडा करून त्यावर रंगीबेरंगी कागद चिकटवू शकता. त्यावर चित्रेही रंगवू शकता. पतंग बनविण्याचे काम वरवर पहाता जरी सोपे वाटले तरी त्यातही बरीच अवधाने बाळगावी लागतात.
आपल्या देशातील गुजरात राज्यात अहमदाबाद येथे
दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव साजरा केला जातो. याची सुरुवात १९८९ पासून झाली. प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारीला अन्य राज्यांतील तसेच परदेशी पतंगप्रेमी पर्यटक खास या उत्सवासाठी अहमदाबादेत दाखल होतात. अहमदाबादेतील सरदार पटेल मदान किंवा पोलीस मदानावरचे आकाश दिवस उजाडल्यापासून मावळेपर्यंत रंगीबेरंगी, देशी-विदेशी पतंगांनी फुलून जाते. आपापसातील जात, धर्म, गरीब, श्रीमंत, वय सगळे भेद विसरून प्रत्येक जण फक्त पतंगांची मजा घेत असतो. पतंग उडवण्यापेक्षा एकमेकांचे पतंग काटण्यात लोकांना खरी मजा येते. यासाठीच पतंगाची दोरी म्हणजेच ‘मांजा’काचेचा भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. उघडय़ा मदानात, शेतांमध्ये, इमारतीच्या गच्च्यांवरून हा मजेशीर खेळ सुरूच असतो. तर रात्रीच्या वेळी आकाशांत प्रकाशमान दिव्यांचे पतंग(तुक्कल) सोडले जातात.  
या उत्सवादरम्यान अहमदाबादेतील पतंग बाजार भागात अनेक आकारांचे, रंगांचे पतंग विकण्यासाठी जातात. देश-विदेशातील पतंग कारागिरांना या निमित्ताने काम मिळते आणि आपल्या देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. सरत्या हिवाळ्याला निरोप आणि येणाऱ्या उन्हाळ्याचे स्वागत हा हेतूही या उत्सवामागे असतो.
२०१३ हे या पतंग उत्सवाचे पंचविसावे वर्ष असल्याने अहमदाबाद शिवाय गुजरात राज्यातील अन्य गावांतूनही अशाच उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील अनेक देशांचे  प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.  
अहमदाबाद शहराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथील पतंगांचे संग्रहालय भारतातील पहिले तर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या संग्रहालयात अनेक दुर्मीळ पतंग पाहायला मिळतात. या संग्रहालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली. २२ फूट १६ फूट लांबीचे भव्य पतंग, काही पतंगांवर गरबा नृत्याची दृश्ये चितारली आहेत. काहींवर आरशाची सजावट केलेली दिसते. तर काहींवर राधा-कृष्णाची चित्रेही दिसतात. पोलिथिन, नायलॉन, कापड अशा वेगवेगळ्या वस्तूंपासून बनलेले पतंग तसेच षटकोनी आकाराचे रोकोकू हे जपानी पतंगही येथे पाहायला मिळतात. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे ४०० कागदांपासून बनलेला पतंग.
तर मित्रांनो, मोकळ्या हवेत निरभ्र आकाशात पतंग उडवण्याची मज्जा घ्यायलाच हवी नाही का? या कलेत कौशल्य मिळवायचे असेल तर वाऱ्याची योग्य दिशा ओळखता यायला हवी. उंच झाडे, विजेच्या तारा, खांब यांचे अडथळे पार करीत पतंग उडवायला खूप सराव हवा. ठरलं तर मग, नक्की जाऊ या पतंग उडवायला!