13 July 2020

News Flash

देवाचा शिक्का

सरोवर नेहमी कमळांनी फुललेलं असायचं, म्हणून या जंगलाचं नाव पडलं- कमळबन.

कौतुकाने हरीण- हरिणीने पाडसांकडे पाहिलं. आईलाही नकळत गाणं सुचलं

एका सरोवराकाठी घनदाट जंगल होतं. पशुपक्षी, झाडंझुडपं, डोंगरदऱ्या, कडेकपाऱ्या, ओढे-नाले यांनी वेढलेल्या या सुंदर जंगलात गुहा, घरटी, बिळं, वारूळं आणि जाळी अशी सर्व पशुपक्ष्यांची घरं होती. या जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुललेलं असायचं, म्हणून या जंगलाचं नाव पडलं- कमळबन.
कमळबनातील गवत मऊ आणि लुसलुशीत होतं. येथे एक हरीणाचे कुटुंब राहत होतं. हरीण- हरिणी आणि त्यांची दोन पाडसं असं ते सुखी कुटुंब होतं. पाडसं एकमेकांशी फारशी भांडायची नाहीत. त्यांच्यात खूपच जिव्हाळा होता. एकदा मऊ मऊ गवत खाऊन हे कुटुंब सरोवराकाठी पाणी प्यायला निघालं. हरीण आणि हरिणी या दोघांच्यामध्ये पाडसं, असं हे कुटुंब रमतगमत चाललं होतं. पाडसं खूप खूश होती. आनंदाच्या भरात त्यांनी गाणी म्हणायला सुरुवात केली.
‘‘मऊ मऊ गवत जसे आईचे हात.
आईचे हात जसे सायीवर भात.’’
कौतुकाने हरीण- हरिणीने पाडसांकडे पाहिलं. आईलाही नकळत गाणं सुचलं-
‘‘आकाशात चांदणी नाचरी, लाजरी
पाडसं माझी कशी साजिरी गोजिरी.’’
हरिणीने पाडसांच्या मानेला प्रेमानं तोंड लावलं. त्यांचा गोड पापा घेतला. कुटुंब मजेत सरोवराकडे चाललं होतं. पौर्णिमेचा चंद्र उगवायला लागला होता. सरोवराचं पाणी चमकत होतं. कमळं छान उमलली होती. त्यांचा सुगंध कमळबनात दरवळत होता. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी, जांभळ्या रंगाच्या कमळांमुळे सरोवर सुंदर दिसत होतं. तेव्हा हरीण म्हणालं, ‘‘मला एका श्लोकाची आठवण होतेय.’’
त्यावर हरिणी म्हणाली, ‘‘म्हणून दाखव ना!’’
शशिना च निशा निशयाच शशी
शशिना निशया च विभाति नभ:
कमलेन पथ: पयसा कमलं
पयसा कमलेन विभाति सर:
चंद्राने रात्र शोभते, रात्रीने चंद्र शोभतो आणि दोहोंमुळे आकाश शोभते. कमळामुळे पाण्याला शोभा, पाण्यामुळे कमळाला शोभा आणि दोहोंमुळे सरोवराला शोभा.
त्यावर हरिणी म्हणाली, ‘‘म्हणजेच सहवासामुळेच एकमेकांचे जीवन खऱ्या अर्थाने फुलते.’’
अशा गप्पा, गाणी, गोष्टी करत हरिणाचे कुटुंब सरोवराजवळ आले. मजामस्ती करतानाही त्यांच्यात जंगली सावधपणा होता. मनात जंगली पशुची भीती होतीच. तेवढय़ात त्यांना एका मोठय़ा झाडाच्या मागून दोन डोळे चमकताना दिसले. हरीणाच्या कुटुंबाला कळून चुकले, की आता चौघांपैकी एकाला मरावे लागणार.
हरिणी म्हणाली, ‘‘तुम्ही तिघे पुढे व्हा. मी मागून येते.’’
हरीण म्हणाले, ‘‘नको नको तुम्ही तिघे पुढे व्हा मी मागे राहतो.’’
पाडसं म्हणाली, ‘‘नको नको, तुम्ही दोघे पुढे राहा. आम्ही दोघे मागे राहतो. म्हणजे तुमचं एखादं बाळ तरी वाचेल.’’
वाघाने त्यांचं संभाषण ऐकलं. तो समोर आला. हरीणाचं कुटुंब थरथर कापायला लागलं.
वाघ म्हणाला, ‘‘घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता! सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे. एकमेकांविषयी अपार प्रेम आहे. अशा कुटुंबाला देवाचा शिक्का असतो. जा सुखी राहा,’’ असं म्हणून वाघ निघून गेला.

– शुभदा सुरंगे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 12:05 am

Web Title: loksatta child story 2
Next Stories
1 गणिती शब्दकोशांचा खजिना
2 डोकॅलिटी
3 कागदी कोनफूल
Just Now!
X