|| मेघना जोशी

काही वर्षांपूर्वी आमच्या शेजारी एक ताई राहायची. ती सतत म्हणायची, ‘अशी..च!’ एवढं सतत, की आम्ही तिला ‘अशी..च!’ असं चिडवायला सुरुवात केली होती. म्हणजे पाहा हं, ती गाणं सुंदर म्हणायची, पण गाण्याचा क्लास किंवा परीक्षा, स्पर्धा अनेकदा चुकवायची. आणि कुणी विचारलं, ‘का गं गेली नाहीस?’ की उत्तर ठरलेलंच असायचं -‘अशी..च!’ ही ताई झाली एक प्रतिनिधी, पण  ‘असा..च!’ किंवा ‘अशी..च!’ असं उत्तर देणारे अनेक असतात.

‘अरे, तू तर चांगलं चित्र काढतोस, का नाही काढलंस?’ किंवा ‘गाणं सुंदर म्हणतोस, का नाही गायलास?’ याचं उत्तर तयार!- ‘असा..च!’ चांगलं पोहोणारे, खेळणारे, नाचणारे, गाणारे वगैरे भावी कलाकार या हितशत्रूमुळे स्वत:च्या कलेला अक्षरश: सुरुंगच लावतात. त्याचबरोबर ‘गृहपाठ का केला नाही? सूत्रं पाठ का केली नाहीत? दिलेलं काम का पूर्ण झालं नाही?’ एवढंच का. ‘काल शाळेत का आला नाहीस?’ याचं ‘असा..च!’ किंवा ‘अशी..च!’  असं उत्तर देणारेही  अनेक असतात. पण मित्रांनो, जर का तुम्ही या प्रकारात मोडत असलात तर मात्र वेळीच स्वत:ला त्यातून बाजूला काढा. कारण कोणतीही गोष्ट न करण्याचं जेव्हा समर्पक कारण आपल्यापाशी नसतं तेव्हा ती असते टाळाटाळ. आणि टाळाटाळ हा प्रगतीतला बिब्बा आहे. तुमचे वडीलधारे, मित्र, शिक्षक, मार्गदर्शक दोन-चारदा तुम्हाला या कारणामागची चूक समजावून सांगतील. पण एकदा का त्यांच्या लक्षात आलं, की ही तुमची सवय आहे- की ते तुम्हाला तुम्ही ‘असा..च! किंवा अशी..च!’ आहात म्हणून सोडून देतील आणि दुसऱ्या कुणाला तरी आपुलकीचा, सहकार्याचा किंवा मदतीचा हात पुढे करतील. त्या हाताच्या आधाराने इतरांची होत असलेली प्रगती पाहत तुम्ही मात्र ‘असा..च! किंवा अशी..च!’  तिथेच अडकून पडाल.

बघा बरं, असं चालेल का? नाही ना? म्हणूनच आजपासून असं ठरवा- जर एखादी गोष्ट मी करू शकत नसेन तर माझ्याकडे त्यासाठीची किमान पाच किंवा त्यापेक्षा जास्त सर्वाना पटणारी अशी कारणं असतील. (तीही अगदी खरीखुरी. ओढूनताणून शोधलेली नकोत.) जर का मी अशी कारणं देऊ  शकत नसेन तर मी कामात सहभागी होईन. ‘असा..च!’ किंवा ‘अशी..च!’ असं उत्तर देत टाळाटाळ मात्र करायची नाही.

अरे, थांबा, थांबा. का उगाच कारणं शोधण्यात शक्ती वाया घालवताय? चला! उठा, लागा कामाला!

joshimeghana231@yahoo.in