डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

dr.tejaswinikulkarni@gmail.com

मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या मनाशी मत्री करण्याचा आपला जो प्रवास सुरू केला आहे, त्यात आता एका महत्त्वाच्या स्टेशनवर आपण आलो आहोत, ते म्हणजे परीक्षांचं! अगदी बालवाडीपासून कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या परीक्षा आपण देत आलो आहोत. शाळेत प्रवेश घेण्याकरताही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा व मुलाखती दिल्या असतील. अभ्यासक्रम, पुस्तकं, वह्य़ा, शिक्षक एवढंच काय, अगदी शाळाच जरी बदलली तरी परीक्षा काही आपल्याला चुकणार नाहीत. परीक्षा या आपल्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या अनेक टप्प्यांवर आपल्या समोर येणारच आहेत. या परीक्षांच्या काळात आपण मानसिकदृष्टय़ा बऱ्यापैकी तणावपूर्ण अवस्थेत असतो. अभ्यासाचं ओझं आणि परीक्षांची भीती ही त्या ताणाची दोन मुख्य कारणं. पण जर आपल्याला या परीक्षांशीच मैत्री करता आली तर? किती मस्त! सगळा ताण आणि भीती कुठल्या कुठे पळून जातील. आज याच विषयावर थोडय़ा गप्पा मारूया. चालेल?

परीक्षेशी मैत्री करायची असेल तर अभ्यासाचं अवाजवी ओझं आणि भीती आपल्याला दूर करावी लागेल. मित्रांनो, परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी ‘केवढा हा अभ्यास, कसा उरकणार दोन दिवसांत?’ असं काहीसं टेन्शन येतं का तुम्हाला? वेळ कमी आणि धडय़ांची संख्या मात्र प्रचंड, अगदी आवाक्याबाहेर वाटणारी! ‘आता एवढं करणं कसं शक्य होणार?’ या विचाराने धांदल उडाली आहे का कधी तुमची? ऐन वेळेला करायला ठेवलेल्या अभ्यासामुळे वेळ आणि अभ्यासाचा अंदाज चुकल्यामुळे किंवा आधी अनेकदा अभ्यासाची टाळाटाळ केल्यामुळे असं होतं आपल्यासोबत. पण मंडळी, वाईट वाटून घेऊ नका, कारण हे जवळजवळ सर्वासोबतच होत असतं. माझ्यासोबतही अनेकदा झालं आहे.

अभ्यासाचं ओझं हाताळणं ही खरं तर एक कलाच आहे. शिस्तबद्ध कला हा शब्द जास्त योग्य आहे. तुम्ही कधी मुंग्यांना मातीचे छोटे कण उचलून नेताना पाहिलं आहे? मी अगदी लहान असताना माझ्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गेले होते. तेव्हा अंगणात खेळता खेळता अशीच एक मुंग्यांची रांग माझ्या समोर आली. माझ्या मनातल्या कुतूहलाने मला त्या रांगेचा पाठलाग करायला भाग पाडलं. आम्ही चार-पाच भावंडं मुंग्यांप्रमाणेच रांग करून एकामागोमाग चालू लागलो. मुंग्यांच्या शेजारून. थोडं अंतर गेल्यावर ती रांग एका छोटय़ाशा, पण माझ्यापेक्षासुद्धा जास्त उंचीच्या अशा मातीच्या टेकडीवर जाताना दिसली. जवळ गेल्यावर लक्षात आलं की त्या मुंग्या या मातीच्या टेकडीच्या आत जात आहेत. तेव्हा माझ्या एका दादाची टय़ूब पेटली आणि तो म्हणाला, ‘‘लांब राहा यांपासून सगळे. हे तर मुंग्यांचं वारूळ आहे. त्यांचं घर. हजारो मुंग्या राहतात त्यात. आपण त्यांना त्रास दिला तर त्या चावतील.’’ आम्ही सारे घाबरून लांब निघून आलो. पण मला एक प्रश्न सतावत होता- तो म्हणजे, ‘या इवल्याशा मुंग्यांना एवढं मोठं घर बांधून कोणी दिलं असेल?’ माझ्या दादाने याचं उत्तर तेव्हा मला समजावल्याचं आठवतं. त्याने सांगितलं की, त्या मुंग्या सातत्याने एक एक मातीचा कण आणून स्वत: ते घर बांधतात. आपल्याकडे म्हण आहेना, ‘थेंबे थेंबे तळे साचे’ अगदी तसंच. ‘सातत्य’ या गुणामुळे, एक एक मातीचा कण जोडून मुंग्यांसारखा छोटा जीव एवढं मोठं वारूळ बांधू शकतो, तर आपण वर्षभराचा एवढा सगळा अभ्यास रोज थोडा थोडा करून नक्कीच संपवू शकतो. तोही आनंदाने! हो ना?

यासाठी आपल्याला एकच निश्चय करायचा आहे, की काहीही झालं, तरी रोज थोडा तरी अभ्यास मी करणारच! याबद्दलचं माझं एक गुपित सांगू तुम्हाला? परीक्षा नसताना रोज थोडा थोडा करून केलेला असा अभ्यास, खरं तर जास्त

सोपा आणि मजेशीर वाटतो. त्यामुळे एकदा का ही छान सवय लागली की फक्त ऐन वेळी अभ्यास करायची वेळच तुमच्यावर येणार नाही.

दुसरी काढून टाकण्यासारखी गोष्ट म्हणजे परीक्षेची भीती. थोडा खोलात जाऊन विचार करूयात याचा. डोळे बंद करा आणि स्वत:ला विचारा की, परीक्षेमधल्या नेमक्या कोणत्या गोष्टीची भीती वाटते आहे मला? नेमकी कोणती गोष्ट नकोशी वाटते, काय उत्तर मिळालं का?

अनेकांना परीक्षेपेक्षा जास्त भीती ही परीक्षेच्या निकालांची वाटते. मी नापास झाले/ झालो तर? कमी गुण मिळाले तर? आई-बाबा ओरडतील का? माझ्या बाई काय म्हणतील मला? शेजारचे काका नावं ठेवतील. घरातल्यांना वाईट वाटेल. मला शिक्षा मिळेल का? मला सगळे चिडवतील, अशा प्रकारचे अनेक भीतीयुक्त विचार तुम्हालाही आलेत का कधी? तपासून पाहा. परीक्षेचा निकाल हा खरं तर आपल्या हातात नाही. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सकारात्मक विचार करणं आणि आत्मविश्वास बाळगणंसुद्धा आपल्या हातात आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की सकारात्मक विचारांचा परिणाम हा सकारात्मक कृतीमध्ये आणि पर्यायाने सकारात्मक निकालांमध्ये होतो. आत्मविश्वास म्हणजेच स्वत:च्या प्रयत्नांवर आणि क्षमतेवर असलेला दृढ विश्वास, ‘मी हे नक्की करू शकते/ तो, ही ठाम भावना हे सर्व आपल्याला यशाचा मार्ग खुला करून देतात. त्यामुळे निकालांच्या भीतीला जर आपण सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने रिप्लेस केले तर आपल्यासाठी परीक्षेशी मत्री करणं अगदी सोपं होईल. ही आदलाबदली करण्याची एक सोपी युक्ती तुम्हाला सांगते.

जेव्हा केव्हा परीक्षेची भीती किंवा असे नकारात्मक विचार मनात येतील, तेव्हा स्वत:ला आपण कोणते प्रश्न विचारतो आहोत ते पाहा. ‘माझं कसं होणार आता? मी नापास झाले तर काय? माझ्यासोबत नेहमीच असं कसं होतं? मला का नाही आठवत आहे सगळा केलेला अभ्यास?’ हे सर्व धोकादायक आणि नकारात्मक प्रश्न आहेत.

गंमत म्हणजे, आपला मेंदू फार हुशार असतो. त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. आपण त्याला विचारलं, की मी नापास झालो तर काय होणार, तर याचंही तो उत्तर देतो आणि मी पहिला आलो तर किती मजा येईल, याही प्रश्नाचं तो उत्तर देतो. त्यामुळे आपण विचारतो ते प्रश्न बदलता आले तर आपण ही भीतीदायक परीक्षा सुखकर बनवू शकतो. कोणते सकारात्मक प्रश्न मदत करतील बरं आपल्याला?

‘मी शिल्लक राहिलेल्या वेळात जास्तीतजास्त अभ्यास कसा काय संपवू शकतो?’

‘मी अभ्यास कसा काय उत्तम करू शकेन?’

‘मी शांतपणे पेपरला जाण्यासाठी, थंड डोक्याने न घाबरता तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी काय उपाय करू शकतो?’

‘मी माझा आत्मविश्वास कसा वाढवू शकतो?’

हे आणि असे अनेक सकारात्मक प्रश्न तुम्ही स्वत:च्या मेंदूला विचारून भीतीचा अंश परीक्षांच्या काळातून काढून टाकू शकता. तुम्हीही तुमची सृजनशक्ती वापरून असे छान छान सकारात्मक प्रश्न तुमच्यासाठी तयार करा आणि विचारून पाहा स्वतला. पाहा काय होतंय.

शेवटी ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, जसे की- प्रयत्न, सकारात्मकता आणि आत्मविश्वास, त्याच तर गोष्टी आपण सुधारू शकतो. जे परिणाम, ज्या गोष्टी पूर्णपणे आपल्या हातात नाहीत, जसे की इतर लोक काय विचार करतील, माझा कितवा नंबर येणार, त्यांच्याबद्दल कितीही विचार केला तर तो निष्फळ ठरणार हे नक्की. काय मित्रहो, पटतंय ना?