|| सोनाली वाघमारे

तात्या खूप खोडकर मुलगा. अभ्यासातपण त्याला सगळे ‘ढ’ म्हणत. चौथीच्या वर्गात असतानाची गोष्ट. १५ ऑगस्टचा दिवस होता, सगळेजण झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला शाळेत आलो होतो. झेंडावंदनाची सगळी तयारी झाली होती. पण झेंडा फडकवताना झेंडय़ाची दोरी चक्रीत अडकल्यामुळे दोरी वर-खाली होत नव्हती. आता काय करणार? ‘कोणी तरी झेंडा लावलेल्या खांबावर चढा आणि दोरी सोडवा,’ असे सर म्हणाले. पण कोण चढणार? तात्या लगेच पुढे आला आणि ‘मी चढतो,’ असं सरांना म्हणाला. तो झेंडा बांधलेल्या खांबावर सरसर चढला. दोरी सोडवली आणि सर्रकन खाली आला. सरांनी त्याला अलगद उचलून घेतलं. तात्या सरांकडे पाहून खुदकन हसला. तात्या खूश दिसत होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

सरांनी झेंडावंदनासाठी टोपी घातली होती, झेंडावंदन झाल्यावर सरांनी ती टोपी काढून तात्याला घातली आणि म्हणाले, ‘‘आजचा हिरो तात्या आहे. ही टोपी मुला बक्षीस म्हणून दिली.’’ त्या दिवसापासून तात्या पार बदलून गेला. रोज वेळेवर शाळेत येत होता. टोपी घातल्याशिवाय तात्या घराबाहेर पडत नव्हता. सगळे त्याला ‘टोपीवाला तात्या’ म्हणू लागले. तात्या अभ्यास करू लागला. वर्गात सगळे काम तात्या एकटाच करी. रोज तोच वर्ग झाडे. फळा पुसून वार, तारीख टाकून ठेवी. चटया टाकून ठेवी. घरी जाताना तो चटया घडी करून ठेवी. त्याने कधीच या कामात आळस केला नाही. तो शाळेत सगळ्यांचा लाडका विद्यार्थी झाला होता. त्याने परीक्षेत चांगले मार्कस्ही मिळविले.

१ मेच्या दिवशी सगळ्या गावासमोर निकाल देताना सरांनी पुन्हा तात्याचे नाव घेतले आणि या वर्षीचा सगळ्यात आदर्श विद्यार्थी म्हणून त्याचे नाव घोषित केले. टोपीचा मान तात्याने राखला म्हणून तात्याला सरांनी उचलून घेतले त्यावेळी तात्याला रडू आवरले नाही. सरांनी त्याला स्वत:चं पेन बक्षीस म्हणून दिलं. तात्या आमच्या वर्गात आहे. पहिला नंबर तोच घेतो आणि रोज टोपी घालून येतो.

(जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोवरी)