News Flash

बालपण देगा देवा!

साहिल म्हणाला तू खूप छान चित्र काढतोस! बघू?’’, असं म्हणत बाबांनी राजाचं चित्र बघायला घेतलं.

परीक्षा संपली. आता मस्त मे महिन्याची सुट्टी!! साहिल जाम खुशीत होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो आई-बाबांबरोबर त्यांच्या गावच्या वाडय़ावर आठ-दहा दिवस राहायला जाणार होता. साहिलला तिथे सुट्टी घालवायला जाम आवडायचं. जायच्या आदल्या दिवशी तो आणि त्याची आई खरेदी करायला एका दुकानात शिरले. दुकानाच्या दारावर लावलेल्या ‘येथे बालमजूर काम करीत नाहीत’ या पाटीकडे साहिलचं एकदम लक्ष गेलं. खरं तर तो आधीही त्या दुकानात बऱ्याचदा आला होता, पण आज त्या पाटीने त्याचं लक्ष वेधून घेतलं.
‘‘आई, बालमजूर म्हणजे काय गं?’’ त्याने कुतूहलानं विचारलं.
‘‘बऱ्याच ठिकाणी लोक लहान लहान मुलांकडून खूप काम करून घेतात, त्यांना राबवतात, त्यांना खूप वाईट वागणूकही देतात. आणि मुख्य म्हणजे त्यांना शिकू देत नाहीत. त्या मुलांचं बालपणच मुळी हरवलेलं असतं. यालाच बालमजुरी असं म्हणतात. म्हणून मग दुकानांवर अशा पाटय़ा लावल्या जातात, की त्यांच्याकडे कुणी बालमजूर काम करत नाहीत.’’ आईने साहिलला सोप्या शब्दांत समजावण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्याच दिवशी साहिल आणि त्याचे आई-बाबा गावच्या वाडय़ावर पोहोचले. लगेचच जवळच्या मैदानावर साहिल फेरफटका मारायला गेला. मैदानाजवळच्या वडाच्या झाडाच्या सावलीत बसलेल्या एका मुलाकडे त्याचं एकदम लक्ष गेलं. तो मुलगा मान खाली घालून काहीतरी करण्यात गुंग होता. मधल्या झुडपांमुळे साहिलला नीट दिसत नव्हतं. त्याची उत्सुकता वाढली. तो धीर करून त्या मुलाशी बोलायला गेला.
‘‘काय करतोयस एकटा इथे?’’ साहिलच्या बोलण्याने तो मुलगा एकदम दचकला.
‘‘मी नेहमीच इथे बसतो. चित्र काढतोय.’’ तो मुलगा एका देवळाचं पेन्सिल-स्केच काढत होता.
‘‘किती सुंदर चित्र काढलंयस!’’ साहिल म्हणाला.
‘‘गावचं देऊळ हाय.’’ तो मुलगा म्हणाला.
‘‘अरे हो! खरंच की! नाव काय तुझं?’’ साहिलने विचारलं.
‘‘राजा. आन् तुझं?’’ राजानेही लगेच विचारलं.
‘‘साहिल.’’ इतक्यात साहिलचे बाबा त्याला बोलावू लागले, म्हणून तो राजाचा निरोप घेऊन वाडय़ावर पळाला. घरी गेल्यावर त्याने बाबांना राजाबद्दल सांगितलं.
संध्याकाळी साहिल आणि त्याचे बाबा मैदानावर क्रिकेट खेळायला आले तेव्हा राजा त्याच झाडाखाली चित्र काढत बसलेला त्यांना दिसला. ‘‘चल, आपण त्याची थोडी चौकशी करू या..’’ बाबा म्हणाले. त्या दोघांना येताना बघून राजा जरा सावरून बसला. ‘‘तू राजा नं?’’
‘‘व्हय.’’
‘‘साहिल म्हणाला तू खूप छान चित्र काढतोस! बघू?’’, असं म्हणत बाबांनी राजाचं चित्र बघायला घेतलं. सकाळचंच देवळाचं चित्र होतं, आता जवळजवळ पूर्ण झालं होतं.
‘‘सुरेख चित्र काढलंयस! शिकतोस कुठे चित्र काढायला?’’
‘‘दादा, चेष्टा करता काय? शाळेला जायला न्हाईत पैसे, हे कुठून शिकनार?’’
‘‘तसं नाही रे! पण इतकं सुंदर चित्र एक खरा चित्रकारच काढू शकतो, म्हणून विचारलं.’’ यावर राजाला काय म्हणावं काहीच सुचेना.
‘‘घरी कोण कोण असतं तुझ्या?’’
‘‘आई हाय. धाकली बहीन पन हाय.’’
‘‘शाळेत का जात नाहीस?’’
‘‘जायचो आधी, चौथी झालीये. पर सुटली आता. कामाला जायला लागतंय.’’
‘‘का रे?’’
‘‘आई करते मोलमजुरी. तरी पैसे न्हाईच पुरत. म्हणून मला पन काम करायला लागतंय.’’
‘‘कुठे काम करतोस?’’
‘‘कारकान्यात.’’
‘‘कसला कारखाना?’’
‘‘रंग बनवायचा.’’
‘‘आणि तिथे काय काम करतोस तू?’’
‘‘डरम उचलायचे, रंग मिसळायला मदत करायची, कचरा काढायचा, भांडी धुवायची. पडेल त्ये काम!’’
‘‘जवळच राहतोस?’’
‘‘व्हय दादा, जवळच झोपडी हाय.’’
‘‘आज कामावर नाही गेलास?’’
‘‘आज महिन्यानंतर मालकाने सुटी दिली हाय.’’ प्रश्नांचा एवढा भडिमार झाल्यामुळे राजा जरा बिचकलाच. बाबांच्या हे लक्षात आलं.
‘‘खेळायला येतोस आमच्याबरोबर?’’ त्यांनी विषय बदलत विचारलं.
‘‘चालंल तुमाला?’’
‘‘हो! का नाही? चल की!’’, असं म्हणत बाबांनी राजाला क्रिकेटची बॅट दिली. राजा एकदम खूश झाला. बराच वेळ तिघांचा क्रिकेटचा खेळ रंगला.
दोन-तीन दिवसांतच साहिल आणि राजाची एकदमच खास दोस्ती झाली. राजाला कामातून वेळ असला की दोघे खूप धम्माल करायचे. क्रिकेट खेळायचे, फुटबॉल खेळायचे.. राजाने तर साहिलला विटी-दांडू, गोटय़ा असे बरेच वेगवेगळे खेळही शिकवले. दोघे मिळून मस्त कैऱ्या, चिंचा तोडायचे, आंबे खायचे. घरी आल्यावर साहिल सगळ्या गमती-जमती आई-बाबांना भरभरून सांगायचा. एक-दोनदा तर तो राजाला त्याच्या घरीसुद्धा घेऊन आला. राजा खूप गुणी मुलगा होता; आई-बाबांनाही जाणवलं!
एक दिवस ते दोघे नदीकाठावर बसले होते. राजा नदी न्याहाळत, बोटाने मातीत काही चित्र कोरत होता. ते पाहून साहिल त्याला म्हणाला, ‘‘तू एकदम मस्त चित्रं काढतोस, राजा.’’
‘‘आरं, मला लहान आस्ल्यापास्नच चित्रं काढायला आवडतात. बा रंगारी व्हता. तिथून रंगांचा संबंध आला. बा सांगेल ते काय बी काम करायचो-बोर्ड रंगवायचो, रस्त्यावरचे पट्टे रंगवायचो. आन् शाळेला पन जायचो.’’
‘‘पण हे देवळाचं चित्र वगैरे?’’
‘‘त्ये नाही सांगता यायचं बाबा, कसं जमतं त्ये!’’
‘‘तुझ्या बाबांना काय झालं?’’
‘‘दोन र्वष झाली, बा अचानक गेला. काम मिळायचं बंद झालं. शाळा सुटली. आईची मजुरी पुरेना. मग या रंगांच्या कारकान्यात कामाला लागलो..’’ हे सांगताना राजाचा गळा दाटून आला.
‘‘तुला कुणी मित्र वगैरे नाहीत?’’
‘‘आता नाही कुनी. हे रंगंच आता माझे दोस्त, अगदी जिवाभावाचे! आरं तुला सांगतो, हे रंगं म्हंजी जादू हाय जादू! निळा आन् पिवळा एकत्र केला की झाला हिरवा. पिवळा आन् लाल मिसळला की बनला केशरी. एकदा का बरश आन पेंसल हातात घेतलं नं, की मग कशा-कशाची म्हनून सुद न्हाई बग.’’, साहिलला राजाच्या निस्तेज डोळ्यांत एकदम चमक दिसली.
‘‘तुझं वय काय असेल रे?’’
‘‘आसंल धा-बारा र्वष. पन यकदम वयाचं काय?’’
‘‘तुला ठाऊक आहे का, तू जे काम करतोस, ती बालमजुरी आहे. खरं तर या वयात तू शाळेत जायला हवंस.’’ साहिलने राजाला काही दिवसांपूर्वी दुकानात वाचलेल्या पाटीबद्दल सांगितलं आणि त्याचा अर्थही समजावला. ते ऐकून राजा एकदम हसला आणि म्हणाला, ‘‘आरं, येडा की खुळा तू? पोटासाठी मजुरी करायला लागनारच ना! आता त्याला तू कायबी नांव दे!’’
‘‘तुला कधी शाळेत जावंसं नाही वाटत का रे?’’
‘‘वाटतं की! मला तर शाळा खूप आवडायची. आमचे मऱ्हाटीचे मास्तर कित्ती छान छान कविता शिकवायचे. काय ते- ‘‘छान किती दिसते, फुलपाखरू..’’ मग दोघांनी मिळून बालकवींची कविता म्हटली. आश्चर्य म्हणजे राजाला ती अख्खी पाठ होती.
‘‘मग आता नाही का जाता येणार तुला शाळेत?’’ साहील विषय सोडायला तयार नव्हता.
‘‘कसं सांग? कारकान्यात खूप काम आसतं दिवसभर. मालक रात्री पन कामाला बोलावतो खूपदा. सुटीच देत नाही. आन् कधी चुकून माझी सुटी तर लागलीच वरडतो, मारतो पन. मग वेळ कसा मिळणार शाळेला जायला आन् आभ्यासाला?’’
साहिलला काय बोलावं कळेना. राजाच्या ते लक्षात आलं. ‘‘आरं, तू इतकं विचारलंस, हेच खूप हाय माझ्यासाठी. जास्त काळजी नको करू. चल निघू आता. आज रात्री पन कामाला जायचंय..’’ राजा उभा राहात म्हणाला. एकमेकांचा निरोप घेऊन दोघे आपापल्या दिशेने पांगले.
पण त्यांच्या त्या बोलण्यानंतर साहिल मात्र फारच बेचैन झाला. घरी आल्यावर तो कळकळीने म्हणाला, ‘‘बाबा, मला मित्र आहेत, शाळा आहे. खेळ आहे. पण राजा? तो माझ्याच वयाचा आहे. पण त्याला रोज कित्ती काम करावं लागतंय! शाळेतही जाता येत नाही, खेळताही येत नाही..’’
यावर बाबा म्हणाले, ‘‘साहिल, आपल्या आजूबाजूला असे खूप राजा आहेत ज्यांना शाळेत जाता येत नाही आणि अशी मजुरी करावी लागते. आज तुला अचानकपणे असा एक राजा भेटला, म्हणून तुला हे इतकं जाणवतंय. तू किंवा तुझे मित्र, इतके सुरक्षित राहता नं, की आपल्या घराबाहेर असंही एक जग आहे, त्याची तुम्हाला कल्पनाही नसते.’’
‘‘आपण काही मदत करू शकू का राजाची?’’ आईने विचारलं.
‘‘नक्कीच. आपल्या गावातल्या शाळेत साहिलच्या आजोबांच्या नावाने आपण दरवर्षी पाच गरजू मुलांना स्कॉलरशिप देतो. त्यातलीच एक आपण राजाला देऊ शकतो. तो खरंच चांगला मुलगा आहे आणि मुख्य म्हणजे त्याची शिकण्याची इच्छा आहे. कशी वाटतेय कल्पना?’’ बाबा विचार करत म्हणाले.
‘‘ग्रेट आयडिया!’’ साहिल खूश होऊन म्हणाला. आईलासुद्धा हा पर्याय पटला.
दुसऱ्या दिवशी साहिल आणि त्याचे आई-बाबा राजाच्या घरी गेले. राजा कारखान्यावर जायला निघत होता. त्याची आई स्वयंपाक करत होती. धाकटी बहीण जवळच खेळत होती. त्या लहानशा झोपडीमध्ये राजाने एका भिंतीवर अख्खं कला दालनच थाटलं होतं, डोळे दिपून टाकणारं! डोंगर-दऱ्या, हिरवीगार शेतं, प्राणी-पक्षी, गावची जत्रा.. काय काय म्हणून राजाने त्याच्या रंगांच्या जादूने घडवलं होतं!
साहिलच्या आईने राजाच्या आईला त्यांचा विचार सविस्तरपणे समजावला. तिचा आणि राजाचा विश्वासच बसेना.
‘‘दादा, खरंच मला पुना शाळेला जाता येईल?’’ राजाने कळकळीने विचारलं.
‘‘हो, बेटा.’’ बाबा त्याला आश्वस्त करत म्हणाले.
‘‘दादा, पन हे सगळं तुम्ही का करताय?’’ राजाने विचारलं.
‘‘तुझी ही चित्रकला म्हणजे तुला देवाने दिलेला आशीर्वाद आहे! तो वाया जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं.’’ बाबा राजाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.
‘‘आणि काय रे राजा? आपण मित्र नं? मग असं का विचारतोस?’’ साहिल पटकन म्हणाला.
‘‘पन मालक न्हाई मला सोडायचा असा.’’ राजाने शंका व्यक्त केली.
‘‘मी बोलेन तुझ्या मालकांशी. तू आता एक करायचं. मन लावून शिकायचं, भरपूर खेळायचं आणि तुझी ही रंगांची जादू आहे नं, ती अजून खुलवायची.’’ साहिलचे बाबा राजाला जवळ घेत म्हणाले.
हे ऐकून राजा रडतच साहिलच्या बाबांच्या पाया पडला. साहिलने त्याला घट्ट मिठी मारली, तसं त्याच्या चेहऱ्यावर मनापासून हसू उमटलं, जणू त्याचं हरवलेलं बालपण त्याला पुन्हा गवसलं होतं..
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:05 am

Web Title: moral story for kids 2
टॅग : Kids Story
Next Stories
1 गंमत विज्ञान : रंगांचा खेळ
2 डोकॅलिटी
3 सौरऊर्जेची शक्ती!
Just Now!
X