छोटय़ा मित्रांनो, पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. जंगलं जास्त गर्द झाली आहेत आणि ओसाड भाग पावसाळी हिरवाईने नटले आहेत. आज आपण घाटातून जाणार आहोत- मुंबई ते पुणे! डेक्कन क्विनने जायचं का कार किंवा बसने, ते तुम्हीच ठरवा. कसंही गेलो तरी डोळ्यांना सुखावणारा निसर्ग असणारच आहे.
मुंबई व नवी मुंबईची गर्दी मागे टाकून एक्स्प्रेस- वेला लागलो की थोडय़ाच वेळात हिरवीगार भातशेती दिसू लागते. वाऱ्यावर गवताची पाती हळुवारपणे डोलत असतात. मध्येच ताड, आंबा, करंज यांसारखे वृक्ष आपलं सौंदर्य मिरवीत थाटात उभे असतात. रस्त्याकडेला लावलेली गुलमोहर, काशीद, बहावा व संकासुराची झाडं शोभून दिसतात. तामणच्या झाडांना आलेली जांभळी फुलं आणि जागोजागी तेरडा, सोनकी व गौरसारख्या पावसाळी वनस्पतींची नाजूक फुलं आपलं लक्ष वेधून घेतात. डाव्या बाजूला दूरवर प्रबळगडचा हिरवा डोंगर व बाजूची ‘श्’ आकाराची िखड बघताबघता ढगांत लपून जातात. ढग दूर झाले तर त्यामागचं जंगल असलेलं माथेरानचं पठार दिसतं.
खालापूर टोलनाक्यापुढे बोर घाट सुरू झाला की विराट सह्याद्रीचं दर्शन घडतं. आकाशाला भिडणारे डोंगरकडे, दाटलेले काळे ढग, सोबत पाऊस आणि उंचीवरून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे वातावरण अधिकच रम्य बनवतात. काही ठिकाणी वृक्षतोड झाली असल्याने मातीने गढूळ झालेले धबधबे दिसतात. पण विस्तारलेले रस्ते व सगळीकडे माणसांचा वावर असताना घाटात अजूनही जंगल आहे. चिंब झालेली ऐन, काटेसावर, पळस बोर, चांदण, कराई, सुरमाड, उंबर, हिरडा व बेहेडासारखी झाडं धुक्यात स्तब्ध उभी असतात. मध्येच खालच्या दरीतलं टुमदार खोपोली शहर दिसतं. घाटरस्त्याच्या कडेला भिजलेली माकडं घोटाळत असतात, पण आपण वन्य प्राण्यांना खायला देणं योग्य नाही. घाट संपत आला की उजव्या बाजूला नागफणी सुळका लागतो. खंडाळ्याच्या काही भागात बऱ्यापकी झाडी दिसते, तर लोणावळ्याला घरं व हॉटेलांची फार गर्दी झालीय. मळवलीनंतर पावसाळी हिरवळीने आच्छादलेला सपाट प्रदेश लागतो. पंचपाकळीच्या झेंडूसारख्या दिसणाऱ्या आकर्षक केशरी फुलांचे ताटवे दोन्ही बाजूंना उगवलेले दिसतात. उजवीकडे लांबवर लोहगड-विसापूर किल्ल्यांचे बलाढय़ डोंगर खुणावतात. या मावळपट्टय़ात घाटापेक्षा पाऊस कमी असतो, पण गार वारा जास्त जाणवतो. कामशेतजवळ इंद्रायणी नदी दुथडी भरून हिरव्या काठांमधून वाहत असते. तळेगावपासून डोंगरांवरील रान विरळ होत जातं आणि आपण दुसऱ्या महानगरात प्रवेश करतो.
दोन्ही बाजूने ही महानगरं सतत वाढतच आहेत. त्यामधली हिरवाई भविष्यात दिसायला हवी असेल तर वस्तू व साधनांची नासाडी थांबवून जबाबदारीने निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे.