माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुम्ही जगातल्या सात आश्चर्याबद्दल खचितच ऐकलं असेल. आजच्या या लेखातून मी तुम्हाला महासागरातील आश्चर्याची सफर घडवणार आहे. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत- शिखर कोणतं तुम्हाला ठाऊक आहे? तुमचं उत्तर माऊंट एव्हरेस्ट असेल तर ते साफ चुकीचं आहे. हवाई बेटांजवळच्या समुद्राखाली दडलेलं माऊनाकीआ हे तब्बल ३३,००० फूट उंच पर्वतशिखर माऊंट एव्हरेस्टपेक्षाही ४,४०० फूट उंच आहे. पृथ्वीवरची सर्वात लांब पर्वतरांगदेखील महासागराच्या पोटात दडलेली आहे. तब्बल ५६,००० किलोमीटर लांब पसरलेली ही पर्वतरांग मिड ओशिएनिक रिज अर्थात मध्य-महासागरी पर्वतरांग या नावाने ओळखली जाते. आपल्याला ठाऊक असलेला सर्वात महाकाय प्राणीदेखील समुद्रातच आढळतो. पूर्ण वाढलेला ब्लू व्हेल अर्थात देवमासा आदमासे १०० फुटांपर्यंत वाढतो- एस. टी.च्या तीन बसच्या लांबीइतकी ही लांबी आहे आणि तब्बल २०० टनांपर्यंत- म्हणजेच २० पूर्ण भरलेल्या ट्रकइतकं यांचं वजन असतं.

ग्रेट बॅरिअर रीफ अर्थात ग्रेट बॅरिअरच्या प्रवाळभित्ती पृथ्वीवरील सर्वात मोठी रचना आहेत. तब्बल २,६०० किलोमीटर लांबीच्या परिसरामध्ये या प्रवाळभित्ती पसरलेल्या आहेत. कलॉसल स्क्वीडचा डोळा पृथ्वीवरील सर्वात मोठा डोळा आहे. अकरा इंच व्यासाचा हा डोळा जेवणाच्या ताटाइतक्या व्यासाचा असतो.

आपण शाळेमध्ये शिकतो, की वनस्पतींपासून आपल्याला प्राणवायू मिळतो. मात्र नॅशनल जिऑग्राफिकच्या एका अभ्यासानुसार तब्बल ७०% प्राणवायू महासागरी वनस्पतींद्वारे तयार केला जातो. प्लवक, केल्प आणि शैवाल प्लवकांचा समावेश प्राणवायू तयार करणाऱ्या महासागरी वनस्पतींमध्ये होतो.

(छायाचित्र : सारा अ‍ॅकरमन, क्रिएटिव्ह कॉमन्स २.०.  हेलिकॉप्टरमधून टीपलेलं ग्रेट बॅरिअर रीफ आणि त्यापुढे चिमुकल्या दिसणाऱ्या बोटींचं दृश्य.)

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद