|| श्रीनिवास बाळकृष्णन

१९४९ या वर्षी वॉर्नर ब्रदरच्या ‘फास्ट अँड फ्युरियस’ या फिल्मद्वारे रोड रनर आणि विइल इ कोयोट आपल्या भेटीला आले. चक जोन्स आणि मायकल माल्टिज् यांनी केलेलं हे पात्र कधीच काही बोलत नाही. कसला आवाज काढत नाही. तरीही त्याच्या नावावर असंख्य कॉमिक मालिका, कार्टून फिल्म्स, व्हिडीओ गेम्स लागले आहेत.

आजही यूटय़ूबवर पाहिल्यावर आपलं चांगलं मनोरंजन होईल.  मार्क ट्वेन यांचे पुस्तक ‘रौगिंग इट’वर ‘कोयोट’ ही कार्टूनरेखा आधारित आहे. टीव्ही गाइड ‘इले टाइम्स’ मध्ये ६० महत्त्वाच्या व्हिलन्सच्या २०१३च्या यादीत ‘विइल इ कोयोट’चा समावेश आहे.

उत्तर अमेरिकन संस्कृतीतले कोयोट हे एक पौराणिक पात्र आहे. फोटोत दिसतोय तो कॅनिस लॅट्रॉन हा खरा प्राणी! त्याचे डोके, टोकेरी कान, शेपटी आणि नखे सर्वच मिळतेजुळते. त्यावरून याचं मजेशीर कार्टून केलं आहे. या कार्टूनमध्ये त्याचे नाव ‘विइल इ’ (आपण विली म्हणू) आहे. फोटोत दिसतंय ते याचे ‘रॉच लायब्ररी एम आय टी’ येथे पायऱ्यांच्या समोरील भिंतीवर आदळल्याचे कल्पक म्युरल केले आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येतंय की, ७० वर्षे जुन्या कार्टून विलीची एकूण अवस्था काय असेल. दक्षिण-पश्चिम अमेरिकन वाळवंटात जेवणासाठी घडणारा हा जीवघेणा खेळ. नुसती भागम् भाग!

विद्युतवेगाने धावणारा रोड रनर पक्षी आणि सतत उपाशी,आजारी दिसणारा हा विली! खाण्यासाठी म्हणून तो रोड रनरच्या मागे लागलेला असतो. सतत तोंडावर आपटण्याची नामुष्की या प्रयत्नातून घडत असते. प्रत्येक वेळी तो त्याहून जास्त अगदी दुपटीने प्रयत्न करतो. परंतु रोड रनर अचानक बीप बीप करून विलीला भांबावून सोडतो.

तसा रोड रनर विलीला स्वत:हून क्वचितच काही इजा करतो. त्याला तितकं डोकंही नाही म्हणा. केवळ खाणे आणि धावत राहून आपला जीव वाचवणे हे त्याचे काम! नाहीतर आपला जेरी! वास्तवात रोड रनरचा वेग ताशी ३०-४० किमी आणि विलीचा वेग ताशी ६० ते ७०; परंतु तरीही कार्टूनमध्ये त्याला अजून पकडू शकले नाही, ना खाऊ शकला.

यामुळे विली नेहमीच अपमानित होत गेला. वेगवान असून त्याच्या अयशस्वी होण्याचे कारण मला कळलं नाही. विलीला धूळ चारण्याचे मुख्य काम त्यानेच अकॅमे नावाच्या कंपनीच्या (टेली शॉपिंगने मागवलेल्या) वस्तूंच्या निकृष्ट दर्जामुळे झाले आहे. याने चित्रविचित्र केमिकल, औषधे, यंत्रे इत्यादी मागवलेल्या वस्तू चीन किंवा दिल्लीहून येत असाव्यात. कित्येकदा तर विज्ञानाचा अभ्यास असल्यासारखा स्वत:च अनेक अस्त्र-शस्त्र बनवतो- जे भौतिकशास्त्राच्या नियमातही असतात. तरी नेमक्या महत्त्वाच्या क्षणी उलटी चालतात. नेमकी ती विलीच्याच अंगावर उलटली आहेत.

यात वस्तूंनी दगा दिलाच, पण सर्वाना समान असणाऱ्या गुरुत्वाकर्षणानेही विलीसोबत भेदभाव केला. कार्टून पाहताना विलीच्या ‘कोर्क तंदुरी’च्या आड येणारा हाच मोठा शत्रू आहे याची आपल्यालाही खात्री पटते. तिसरा शत्रू म्हणजे कार्टूनिस्टने केलेली लॉजिकची एशीतशी! जे नियम रोड रनरला, तेच त्याने विलीलासुद्धा लावायला नको का? पण ही पार्शालिटी नडली हो. पण असा भेद का?

रोड रनर पक्षी तर या कार्टूनमध्ये दाणे खाताना (शाकाहारी) दाखवला आहे. वास्तवात तो पाली-सरडे- किडे खातो. आणि विली वास्तवात व इथेही असे छोटे प्राणी-पक्षी खातो; जे सृष्टीच्या अन्नसाखळी नियमात आहे. तरीही आपल्या सर्वाना ती हिंसा वाटून आपण या विलीला व्हिलन ठरवले आहे. आणि म्हणून त्याच्या जिवावर बेतलेली फजिती आपल्याला हसवते. हेच टॉम अँड जेरीलाही लागू आहे. मांजर उंदीर खाणारच! तरी आपल्याला टॉम व्हिलन. कार्टूनमधील असो वा वास्तवातील- प्राण्यांच्या जगण्याकडे आपण माणुसकीच्या चष्म्यातून का बघायचं?

chitrapatang@gmail.com