वरदा स्वत:च्याच चित्रांकडे अविश्वासाने पाहत होती. ‘हे सगळं मी केलंय?’ या विचारावर ती पुन:पुन्हा येत होती. तिचा विश्वासच बसत नव्हता. खरं तर त्या हॉलमध्ये इतर जे होते म्हणजे- हर्ष, वैभव, मानसी, पूर्वा, मानस, सागर, पूजा, रुचिता हे आणि इतरांचीही परिस्थिती याहून वेगळी नव्हती. आज प्रत्येकजण स्वत:चं टेबल मांडताना, ते सजवताना थोडय़ाफार प्रमाणात याच विचारात होता. प्रत्येकाच्या टेबलवर असलेल्या वस्तू स्वावलंबनातून, स्वप्रतिभेतून नि स्वकष्टातून आकाराला आल्या होत्या. म्हणून टेबलवर समोर असलेल्या स्वत:च्या नावाच्या पाटीचं प्रत्येकाला अप्रूप वाटत होतं. वरदाही ती पाटी निरखून पाहत पुन:पुन्हा तिचा अँगल बदलत होती- वरदा राजन माने.
‘‘ओ वरदा, माव्र्हलस ड्रॉइंग्ज याऽऽर! यु शुड कंटिन्यू इट,’’ हर्षच्या आवाजाने वरदा चांगलीच दचकली.
‘‘या, या. आय मस्ट,’’ तिने चटकन होकार दिला.
‘‘कारण मला समजलंय, ड्रॉइंग म्हणजे माझा श्वासच आहे.’’
‘‘खरं तर आपल्या प्रत्येकालाच आपण स्वत: काय करू शकतो ते समजलंय.’’ रुचिता ‘स्वत:’वर जोर देत पुढे म्हणाली, ‘‘मला ओरिगामी करताना खूप मजा येते.’’
‘‘मला कॅलिग्राफी.’’- हर्ष
‘‘मला टेबल डेकोरेशन.’’- वैभव
‘‘फेस नि नेल पेन्टिंग.’’- वरुण
‘‘रांगोळी नि मेंदी.’’- पूजा.
‘‘पण ही सगळी नीनादीची कमाल आहे, नाही का? या एका महिन्याच्या समर कॅम्पमध्ये तिने हे आपल्याला समजण्यासाठी केवढी मदत केली.’’ वरुण म्हणाला.
‘‘हो, हो नक्कीच,’’ म्हणत साऱ्यांनी माना डोलावल्या.
‘‘ए, पण तुमच्या लक्षात आलं का, नीनादीने आपल्याला स्वातंत्र्य दिलं पण सूट नाही दिली.’’
‘‘म्हणजे?’’ पूर्वीचं वाक्य न कळून मानसी म्हणाली.
‘‘अगं, नीनादीने पहिल्यांदा आपली आवड शोधण्याची पूर्ण मुभा दिली. पण एकदा का आवड समजली, मग मात्र रोज थोडय़ा थोडय़ा सरावाची नि विकासाची सक्ती होती. त्यात ब्रेक नव्हता.’’
‘‘हंऽऽ, बरोबर. म्हणूनच आपल्यामध्ये एवढा अनबिलिव्हेबल चेंज झाला असेल का?’’
‘‘ए, असं काय बघताय? माझी आई म्हणते- अनबिलिव्हेबल चेंज असं.’’
‘‘ओ. के. ओ. के. पण यावरून नीनादीचं एक तत्त्व तुमच्या लक्षात येतंय का?’’ सागर एकदम प्रौढपणाचा आव आणत म्हणाला.
‘‘ते तत्त्व म्हणजे- रोज.. थोडं.. थोडं..’’
‘‘ए, खरंच की!’’ रुचिताने पाठिंबा दिला. ‘‘मी बघ ना रोज थोडी थोडी ओरिगामी शिकत महिन्याभरात टेबल भरून टाकलं.’’ स्वत:च्या टेबलकडे कृतकृत्यपणे पाहत ती म्हणाली.
‘‘ए प्लीज, आता मी पेन्टिंग, मी कविता वगैरे लिस्ट नको हं. प्लीज, प्लीज.’’ पूर्वीच्या या म्हणण्यावर एक बारीकशी हास्याची लकेर उमटली.
‘‘म्हणजे मला काय वाटतं, जे आपल्याला साध्य करायचं आहे ते रोज थोडं थोडं न कंटाळता, न दमता आणि योग्य रीतीने केलं तर ते पूर्णत्वाने साध्य होऊ शकेल.’’ पूर्वाने आपला मुद्दा पुढे मांडला.
‘‘पण एक लक्षात येतंय का तुमच्या?’’ मानस म्हणाला.
‘‘तू सांगितल्याशिवाय कसं येणार?’’ हर्षने त्याची टपली उडवलीच. पण तिकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला, ‘‘गायक, नर्तक, अभिनेते, वादक हे सगळे रोज रियाज करतात. म्हणजे असंच करतात नं.’’
‘‘हो, रे, माझी आई रोज एक-एक पोळी शिकत पोळ्या करायला शिकली म्हणे.’’ – रुचिता.
‘‘आणि माझ्या आत्यानेही रोज थोडं-थोडं वीणकाम करत एवढय़ा सुंदर वस्तू बनवल्यात ना!’’ – मानसी.
‘‘हो, आपण शाळेतही वापरू शकतो ना रे हे तत्व?’’
अभ्यासू मानसने असं विचारल्यावर भुवया उडवून वगैरे खाणाखुणांची थोडीफार देवाणघेवाण झाली; पण त्याच्या ते गावीही नव्हतं. तो पुढे बोलतच होता-
‘‘म्हणजे बघा हं, आपण काय करतो की, काही वेळा पंधरा दिवस वगैरेसुद्धा शाळेच्या अभ्यासाकडे लक्ष देत नाही नि मग सबमिशन्स, ओरल्स किंवा एक्झाम्स आल्या की वह्य़ा पूर्ण करणे, पाठांतर करणे, आकृत्या काढणे, पुस्तकं वाचणे, नोट्स काढणे ह्य़ांचा अतिरेक करतो. त्यामुळे आपल्यावर ताण येतो. ताण आल्यामुळे काम व्यवस्थित पूर्ण होत नाही. त्यातून ताण वाढतो. त्यामुळे तब्येतीच्या कुरबुरी होतात. घरातल्यांवर चिडचिड, राग राग होतो. उगाचच भांडणंही होतात इतरांशी. हे सगळं टाळण्यासाठी हे ‘रोज थोडं थोडं’चं सूत्र मस्तच आहे असं नाही वाटत?’’
‘‘हो.. रे..!’’ सगळ्यांनाच हळूहळू पटलं होतं. ‘‘सूत्र, नियम, तत्त्व- रोज थोडं थोडं पाठ केलं तर बोजा पडणारच नाही.’’ एकेकाचं डोकं चालू लागलं होतं.
‘‘संस्कृतचं पाठांतर?’’
‘‘संस्कृत कशाला, कोणतेही पाठांतर- मराठी इंग्रजीचंसुद्धा.’’
‘‘नवीन शब्दांचा संग्रह.’’
‘‘नकाशालेखन, वाचन.’’
‘‘अवांतर वाचन.’’
‘‘भूमितीची प्रमेय.’’
बापरे, अनेक ठिकाणी हे वापरता येईल. प्रत्येकाला समजून चुकलं.
‘‘ए, आता शाळा सुरू झाली की हे वापरायचं हं. ओऽऽके, डऽऽन!’’ रुचिता म्हणाली.
त्यावर सर्वानीच अंगठे उंचावत ‘‘डन’’ असं म्हटलं. पण हर्ष मात्र कोपऱ्यातल्या टेबलाजवळून जोरात ‘‘डन’’ असं ओरडला तेव्हा सगळ्यांनी चमकून तिकडे पाहिलं, तर त्याने कॅलिग्राफी वापरून एक पाटीच तयार केली होती, ‘रोज.. थोडं. थोडं..’
वरदाने पुढे होत चटकन ब्रश चालवत त्याला एक सुंदर बॉर्डर काढली.
उद्घाटनानंतर जेव्हा त्या पाटीबद्दल सर्वानी नीनादीला सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अरे, हे आपल्या पूर्वजांनीच सांगितलंय, ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, एवढंच! आणि ते तुम्ही आचरणात आणणार याबद्दल तुमचं कौतुक आणि शुभेच्छा!’’
‘‘माझे संस्कृतचे सर आम्हाला शाळेत असताना चाणक्य नीतिशास्त्रातला एक श्लोक सांगायचे नेहमी-
शनैर्थ: शनै: पन्था: शनै: पर्वतमारुहेत।
शनैर्विद्या च धर्मश्च व्यायामाश्च शनै: शनै:।।
म्हणजे द्रव्याचा उपयोग, प्रवास, पर्वतारोहण, विद्याप्राप्ती, धर्माचरण आणि व्यायाम हे हळूहळू म्हणजे रोज थोडं थोडं करावं. आणि तेच मी लक्षात ठेवलंय- शनै: शनै:।’’
त्यावर सगळे हसत म्हणाले, ‘‘शनै: शनै:। रोज.. थोडं.. थोडं..’’